Next
भर्तृहरीचे नीतिशतक – उत्तरार्ध
BOI
Sunday, May 26, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’प्रमाणे भर्तृहरीचे ‘नीतिशतक’ आजही उपयुक्त ठरणारे आहे. जुन्या काळात राजेलोक शासक होते, तर आज मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. बाकी नीतिविषयक उपदेश जसाच्या तसा लागू आहे. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरात आज ‘नीतिशतका’बद्दलच्या लेखाचा उत्तरार्ध...
.........
भर्तृहरीच्या नीतिशतकातील काही विभागांची माहिती आपण पूर्वार्धात घेतली. आज उर्वरित विभागांची माहिती घेऊ या.

‘शील’ : वैभव हे सौजन्याने खुलते; शौर्य वाणीच्या संयमाने, तर ज्ञान शांतीने शोभते; विद्या विनयाने, धन सत्पात्री दान दिल्याने, तप हे राग-नियंत्रणाने, सत्ता क्षमावृत्तीने आणि धर्माचरण सरळ व्यवहाराने शोभते. तथापि, या सगळ्यांचे प्रमुख, महान भूषण आहे ते शील. त्याशिवाय इतर सर्व व्यर्थ! शीलामुळे सर्व संकटे सौम्य होतात. सत्य हे वाणीचे भूषण, बारीक कंबर हे सुंदर तरुणीचे भूषण, ब्राह्मणाचे भूषण विद्या आणि क्षमावृत्ती - सर्व मानवजातीचे भूषण हे उत्त शीलच! शील सोडून जगणे व्यर्थ!

‘माणसांच्या तऱ्हा - नाना प्रकारच्या प्रतिक्रिया’ : ज्ञान हे सज्जनांचा गर्व, अभिमान नष्ट करते, तर तेच दुर्जनांत वृथाभिमान आणि गर्व निर्माण करते. एकांत साधकाला मुक्तीकडे नेतो आणि कामातुर लोकांना भोगाची संधी मिळते. रुचिभेदाप्रमाणे कोणी नीतीचे आचरण करतो, तर कोणी श्रृंगारात रमतो, कोणी वैराग्याचा आश्रय करतो. एकाच जीवनात हे तिन्ही प्रकार अनुभवता येतात. कनिष्ठ स्तरातील व्यक्ती विघ्ने येतील या भीतीने कार्याचा आरंभच करत नाहीत. मध्यम लोक आरंभ करतात; पण विघ्न येताच हातीचे कार्य सोडून देतात. जे उत्तम आहेत, ते मात्र शेकडो विघ्ने आली तरी हाती घेतलेले कार्य तडीला नेतातच. स्वार्थ सोडून परहित साधतात ते साधुपुरुष. स्वार्थाला विरोध होत नसेल तर परहिताची कामे करतात ते मध्यम जन; मात्र जे स्वार्थ नसतानाही परहिताचा नाश करतात, त्या लोकांना काय नाव द्यावे हे समजत नाही. (अधम की नीच?)

‘शूरवीर, धीर’ : नीतिमंत लोक निंदा करोत वा स्तुती, संपत्ती येवो अथवा जावो; मरण आज आले काय वा युगानंतर - धीराचे पुरुष न्याय्य मार्ग कधीच सोडत नाहीत. ते संकटांनी ग्रासले, तरी त्यांचे धैर्य ढळत नाही (केला जरी पोत बळेचि खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे - वामन पंडित). ज्या धैर्यवान पुरुषाला स्त्री फशी पाडू शकत नाही, क्रोध ज्याच्या हृदयाला जाळत नाही आणि जो विषय-जाळ्यांत अडकत नाही, तो त्रिभुवन जिंकू शकतो. सूर्याप्रमाणे शूर व्यक्तीही पृथ्वी पादाक्रांत करते. वीरांच्या पायांशी विजयलक्ष्मी लोळण घेते. 

‘राजा, राजनीती, सेवक, मंत्री इत्यादी’ : वाईट सल्ला (मंत्री) मिळाल्याने राजाचा नाश होऊ शकतो. त्याचप्रमाणे, विषयांशी संग ठेवल्याने संन्यासी, फाजील लाड केल्याने मुले, अध्ययन न केल्याने ब्राह्मण, वाईट मुलामुळे कूळ, दुष्टांशी नम्र झाल्याने सज्जन, अनीतीने समृद्धी आणि अतिदान दिल्याने संपत्ती नष्ट होते. प्रजा संतुष्ट असेल, तरच राजाला नाना प्रकारची समृद्धी प्राप्त होते. राजनीती ही स्थळ-काळानुसार वेश्येसारखी अखंड रूप पालटत असते. राजाश्रयाने माणसाला पुढील सहा गोष्टी साध्य करता आल्या पाहिजेत. लोकांनी आपली आज्ञा पाळणे, कीर्ती मिळवणे, विद्वानांचे पालन करणे, दान देता येईल एवढी संपत्ती मिळवणे, सर्व प्रकारचे उपभोग मिळवणे, मित्रांना संरक्षण देणे. (या गोष्टी जमल्या नाहीत, तर त्या राजाश्रयाचा काय उपयोग?) सेवा/सेवकधर्म हा अत्यंत गहन, अवघड असून, योग्यांनाही तो अगम्य असतो. (धनी कशामुळे खूश होईल वा नाखूश, हे नोकराला कधीच कळत नाही.) शहाण्या, प्रामाणिक नोकराचा अपमान राजाने केला, की कोणीही सुज्ञ सेवक त्याच्या जवळ फिरकत नाही. शहाणे राज्यकारभारापासून दूर राहिले, की राज्यात अनीती वाढते आणि अखेरीस ते नष्ट होते.

‘विधिलिखित, दैव, माणसाची अगतिकता’ : दैवात असलेले धन वाळवंटातही मिळेलच; नसेल तर कुठेच मिळणार नाही. (तुमच्या) घटात जेवढे पाणी मावते, तेवढेच भरले जाणार. मग ते विहिरीतून काढा किंवा समुद्रातून. इंद्राकडे बृहस्पतीसारखा नेता, वज्रासारखे शस्त्र, देवगण हेच सैन्य, स्वर्गासारखा किल्ला, विष्णूचे पाठबळ, ऐरावत हत्ती - इतके सगळे बळ असूनही युद्धात पराभव स्वीकारावा लागतो. दैवापुढे पौरुष फिके पडते. दुर्दैवी माणूस कुठेही गेला, तरी आपत्ती त्याची पाठ सोडत नाही. विधीने कपाळावर जे लिहिले, ते पुसून टाकण्यास कोणीही समर्थ नाही. मेघ जरी रोज पाऊस पाडत राहिला, तरी चातकाच्या मुखात पाण्याचे केवळ दोन-तीन थेंबच पडतात. रानात टाकलेले अनाथ बालकही जगते, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही घरातल्या घरातही माणूस मरतो.

‘चांगली-वाईट संगत’ : सत्संगतीमुळे बुद्धीचे जडत्व जाते, सत्य बोलण्याची सवय होते, मान वाढतो, मन प्रसन्न होते, कीर्ती दशदिशांत पसरते. दुष्टांची मैत्री नष्ट करणारी, तर सज्जनांची मैत्री दीर्घकाळ टिकणारी, सतत वाढणारी असते. चांगला मित्र हा आपल्या जवळच्या मित्रास पापापासून परावृत्त करतो; हिताचा मार्ग दाखवतो, दुर्गुण झाकून गुण प्रकट करतो; संकटात सोडत नाही आणि गरजेच्या वेळी साह्य करतो. तापलेल्या लोखंडावर पाणी पडले, तर क्षणार्धात त्याची वाफ होते. तेच थेंब कमळाच्या पानावर पडले तर मोत्यासारखे दिसतात आणि स्वाती नक्षत्रावर तसेच चार थेंब शिंपल्यात पडले तर त्यापासून उत्तम मोती तयार होतात. अधम, मध्यम, उत्तम ही अवस्था संगतीमुळेच प्राप्त होते. सज्जनांची मैत्री नेहमीच शांती आणि आनंद देते.

‘ईश्वरकृपा, पूर्वपुण्याई, कर्म, संचित’ : ईश्वर प्रसन्न झाल्यामुळे धन्य झालेल्या पुरुषाला - सद्वर्तनी पुत्र, सच्छील पत्नी, संतुष्ट मालक, प्रेमळ मित्र, प्रामाणिक नोकर, क्लेशरहित मन, सुंदर शरीर, स्थिर वैभव आणि विद्याविभूषित चेहरा हे सर्वकाही प्राप्त होते. प्रारब्ध (पूर्वकर्म) देईल तेच फळ माणसाला मिळते आणि बुद्धीही आपल्या कर्मानुसारच काम करते. तथापि, सुज्ञ व्यक्तीने नीट, विकारपूर्वक कर्म केले पाहिजे. हेच आत्मस्वातंत्र्याचे तत्त्व आहे. प्रारब्ध टळत नसेल, तरी त्याचे पळ सुसह्य, सुगम करण्याचे साधन म्हणजे आज चांगले कर्म करणे, जे आपल्या हातात आहे. देवाला वंदन करावे, तर तो विधीच्या आधिपत्याखाली असतो. विधीला नमन करावे, तर तोही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार योग्य ते फल देत असतो. मग त्या कर्मालाच वंदन केलेले उत्तम! स्वरूप, कुल, शील, कष्टमय सेवा यांचे फल कधीच तत्काळ प्राप्त होत नाही. आधीच्या तपश्चर्येमुळे जे संचित भाग्य असेल, तेच झाडाप्रमाणे योग्य वेळी फल देते. पूर्वी केलेली पुण्ये व्यक्तीचे अरण्य, रणांगण, आग, महासागर, दुर्गम पर्वत इत्यादी ठिकाणी रक्षण करतात. कशाही प्रकारचे, कितीही प्रयत्न केले, तरी पूर्वकर्मांचे फल कधीही टाळता येत नाही. पूर्वपुण्याई असलेल्या माणसाशी सर्व जण सौजन्याने वागतात. त्याला जंगलसुद्धा महानगरीसारखे सुखकर होते. पूर्वपुण्य संपले, की सर्व प्रकारचे वैभव तत्क्षणी नष्ट होते.

‘प्रयत्न, उद्यम, निरलसता’ : धैर्यवान पुरुष हे लक्ष्य प्राप्त होईपर्यंत, कुठल्याही मोहाला किंवा आकर्षणाला बळी न पडता, प्रयत्न सोडत नाहीत- कार्यापासून ढळत नाहीत. थोर लोक, सुख-दु:खाची पर्वा न करता, संकल्पित कार्य चालू ठेवतात, वाटेतल्या संकटांना जुमानत नाहीत. आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे आणि उद्यमशीलता जिवलगासारखी. कार्य त्याला यशाकडे नेते. तेव्हा सत्कर्मरूपी देवतेचीच सदैव पूजा करावी. कुठलेही बरे-वाईट कर्म करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा नीट विचार करावा. घाईत केलेले काम अनिष्ट परिणामांमुळे आयुष्यभर मनस्ताप देते. जो मानवजन्म लाभलेला आहे, त्यात शुभकर्मे करून कृतार्थता प्राप्त करावी.

‘संकीर्ण’ : मलय पर्वतावरील सर्व प्रकारची झाडे चंदनासारखीच होऊन जातात. त्यांनाही सुगंध येतो, म्हणून ती चंदन म्हणूनच विकली जातात. तद्वत गुणी आणि वैभवशाली माणसाने सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना आपल्यासारखेच करून सोडले पाहिजे. ज्या वस्तूची आवडच नाही, ती सुंदर असली तरी तिचे आकर्षण वाटत नाही. चंद्र हा रमणीय असला, तरी सूर्यविकासी कमळाला त्याची ओढ कशी वाटेल! योग्य दान न देणाऱ्याला लक्ष्मी हसते, जमीन ‘माझी’ म्हणणाऱ्याला भूमी हसते, युद्धाला भिणाऱ्या राजाला मृत्यू हसतो. (कारण भित्र्याला वीरमरण नसते.)

नीतिशतक इथे संपले. भर्तृहरीचे मूळ संस्कृत श्लोक आणि वामन पंडितांची मराठी समश्लोकी रचना यांच्यात अनेक सुंदर सुभाषिते आलेली आहेत. ती शतकानुशतके लोकप्रिय ठरलेली आहेत. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’प्रमाणे ‘नीतिशतक’ आजही उपयुक्त ठरणारे आहे. जुन्या काळात राजेलोक शासक होते, तर आज मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. बाकी नीतिविषयक उपदेश जसाच्या तसा लागू आहे. शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश असला पाहिजे.

भारतीय ‘अक्षर’वाङ्मयात ‘नीतिशतका’सह ‘शतकत्रयीं’चा निश्चितच समावेश आहे. 

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कौटिल्याच्या अर्थशास्त्राविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘भर्तृहरीकृत शतकत्रयी’चे ल. गो. विंझे यांनी केलेले मराठी रूपांतर ‘ई-बुक’ स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. तसेच शतकत्रयीसंदर्भातील अन्य काही पुस्तके आणि ई-बुकही तेथे उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search