Next
‘टिळकांनी १०० वर्षांपूर्वीच दिला होता ‘स्वदेशी’चा मंत्र’
BOI
Thursday, August 02, 2018 | 06:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘सध्या ‘मेक इन इंडिया’चा बोलबाला आहे; मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १०० वर्षांपूर्वीच्या काळात ‘स्वदेशी’चा मूलमंत्र दिला होता. त्यामुळे त्यांना ‘मेक इन इंडिया’चे जनक म्हणायला हवे. त्यांच्या विचारांतूनच त्यांची दूरदृष्टी कळते,’ असे विचार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी व्यक्त केले.

पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दर वर्षी देण्यात येणारे लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक यंदा डॉ. के. सिवन यांना जाहीर झाले होते. ते त्यांना प्रदान करण्याचा सोहळा टिळक पुण्यतिथीदिनी (एक ऑगस्ट २०१८) पुण्यात झाला. त्या सत्काराला उत्तर देताना डॉ. के. सिवन बोलत होते. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. के. सिवन यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

‘आधुनिक स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञान विकसित व्हावे, असा लोकमान्य टिळक यांचा दृष्टिकोन होता. ‘इस्रो’ ही संस्था त्यातूनच प्रेरणा घेऊन काम करत आहे. देशातील ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ‘इस्रो’तर्फे संशोधन हाती घेतले जात आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘जीपीएस’च्या साह्याने भारत जोडला जाईल. त्यातून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार होईल,’ असा विश्वास डॉ. के. सिवन यांनी व्यक्त केला.

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना देशात सुरू असलेल्या विकासाचे गुणगान डॉ. के. सिवन यांनी केले. भारत गरीब नसून, कितीतरी बाबतीत श्रीमंत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘या देशातील तरुणांनी संशोधनामध्ये काम केले, तर आपल्याला परदेशी तंत्राची मदत घ्यावी लागणार नाही. जास्तीत जास्त तरुणांनी देशहित समोर ठेवून पुढे आले पाहिजे. तरच आपण संशोधनात मोठी झेप घेऊ शकू,’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक-मोने, डॉ. प्रणती टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या ‘लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ आणि ‘लोकमान्य टिळक आणि प्रसारमाध्यमे’ या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी झाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link