Next
कवी बी, पुरुषोत्तम दारव्हेकर, ह. रा. महाजनी
BOI
Friday, June 01, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘चाफा बोलेना चाफा चालेना’ या अजरामर गीताचे कवी नारायण गुप्ते, ‘कट्यार काळजात घुसली’चे लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, ‘लोकसत्ता’चे माजी संपादक ह. रा. महाजनी, लेखक अण्णासाहेब साळुंखे, समीक्षक रमेश धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने, कादंबरीकार पठारे आणि कथाकार शरणकुमार लिंबाळे यांचा एक जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 

नारायण मुरलीधर गुप्ते 

एक जून १८७२ रोजी जन्मलेले नारायण मुरलीधर गुप्ते हे ‘कवी बी’ म्हणून मराठी काव्यक्षेत्रात मानाचं स्थान प्राप्त असणारे केशवसुतांचे समकालीन ज्येष्ठ कवी. त्यांच्या अनेक दीर्घकविता लोकप्रिय आहेत. ‘चाफा’, ‘डंका’, ‘तीव्र जाणीव’ या त्यांच्या कविता विशेष लक्षवेधी होत्या. 

‘प्रणती मम सख्याच्या पूज्य पादद्वयासी, विजय सतत चिंती आपुली लीन दासी. कितीक दिवस झाले! आपले पत्र नाही, म्हणुनी बहुत चिंताग्रस्तचित्ता असे ही’ अशी सुरुवात असणारी ‘प्रणयपत्रिका’ ही कविता ऐन कुमार वयात लिहून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ हे त्यांचं अजरामर भावगीत! ‘फुलांची ओंजळ’ आणि ‘पिकले पान’ असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 

३० ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचं निधन झालं.

(कवी बी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘चाफा बोलेना’ या त्यांच्या गाजलेल्या गीताबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......... 

पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर
 
एक जून १९२६ रोजी भंडाऱ्यामध्ये जन्मलेले पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर हे नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. सायन्सपाठोपाठ कायद्याचीही डिग्री घेतलेल्या दारव्हेकरांनी सुरुवातीला दिल्ली दूरदर्शनवर आणि नंतर आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर नोकरी करताना आपली नाट्यकलेची आवड जोपासली.

रंजन कला मंदिर या आपल्या संस्थेतर्फे त्यांनी अनेक नाट्यस्पर्धा गाजवल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ हे त्यांनी लिहून दिग्दर्शित केलेलं नाटक मराठी संगीत रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरलं आहे. त्यांनी ‘नटसम्राट’, ‘अश्रूंची झाली फुले’ , ‘चंद्र नभीचा ढळला’ यांसारख्या नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केलं होतं.

अबोल झाली सतार, घन:श्याम नयनी आला, वऱ्हाडी माणसं, नयन तुझे जादूगार, असं त्यांचं लेखन गाजलं आहे. 

२० सप्टेंबर १९९९ रोजी त्यांचं निधन झालं. 

(पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

हणमंत रामचंद्र महाजनी 

एक जून १९०७ रोजी जन्मलेले हणमंत रामचंद्र महाजनी हे समाजवादी विचारसरणीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसत्ता दैनिकाचे ते १८ वर्षं संपादक होते. 

रविवारची चिंतनिका, संगीत शाकुंतल, परी तू जागा चुकलासी, गुन्हेगाराची कैफियत, ईश्वराची आत्महत्या, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१८ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांचं निधन झालं. 
........

डॉ. अण्णासाहेब हरी साळुंखे

एक जून १९४३ रोजी जन्मलेले डॉ. अण्णासाहेब हरी साळुंखे हे विचारवंत लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी चार्वाकदर्शनाचा सखोल अभ्यास केला आहे. ते महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे सदस्य आहेत. 

बेळगावच्या विचारवेध साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाला आहे. हिंदू संस्कृती आणि स्त्री, वादांची वादळे, विद्रोही तुकाराम, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 
.......
डॉ. रमेश वामन धोंगडे

एक जून १९४३ रोजी जन्मलेले डॉ. रमेश वामन धोंगडे हे समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. सामाजिक भाषाविज्ञान, शैली वैज्ञानिक समीक्षा, शतकाची विचारशैली (चार खंड), आत्मलक्ष्यी समीक्षा, बावनकशी अक्करमाशी, दलित आत्मचरित्रे, दिल्या घराची मराठी, मराठी भाषा आणि शैली, तेंडुलकरांची नाटके, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(रमेश धोंगडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........

लक्ष्मण बापू माने

एक जून १९४९ रोजी जन्मलेले लक्ष्मण बापू माने हे सामाजिक चळवळीमधले कार्यकर्ते आणि संशोधक-लेखक म्हणून ओळखले जातात. ‘उपरा’ या आत्मवृत्ताने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

बंद दरवाजा, क्रांतिपथ, उद्ध्वस्त, भटक्याचं भारूड, का कराचं शिकून, खेळ साडेतीन टक्क्यांचा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(लक्ष्मण माने यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
............... 

रंगनाथ गबाजी पठारे

एक जून १९५० रोजी जन्मलेले रंगनाथ गबाजी पठारे हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिजात मराठी भाषा समितीवर त्यांनी काम केलं आहे. 

दिवे गेलेले दिवस, चक्रव्यूह, अनुभव विकणे आहे, शंखातला माणूस, सत्त्वाची भाषा, आस्थेचे प्रश्न, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

‘ताम्रपट’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसंच त्यांना दमाणी पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे.
 
(रंगनाथ पठारे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........

डॉ. शरणकुमार हणमंता लिंबाळे  

एक जून १९५६ रोजी जन्मलेले डॉ. शरणकुमार हणमंता लिंबाळे हे कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. 

अक्करमाशी, बारामाशी, हरिजन, रथयात्रा, गावकुसाबाहेरील कविता, उत्पात, उपल्या, दलित ब्राह्मण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(शरणकुमार लिंबाळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link