पुणे : ‘गेरा डेव्हलपमेंटस्’ या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने ११ जानेवारी २०१८ रोजी डिसेंबर २०१७चा ‘गेरा पुणे रेसिडेंशिअल रिअॅलिटी रिपोर्ट’ सादर केला. या रिपोर्टनुसार पुणे शहरातील न विकल्या गेलेल्या जागांची संख्या ही ३४.२९ टक्क्यांवरून कमी होत २८.४३ टक्क्यांवर आली आहे. बाजारपेठेतील न विकल्या गेलेल्या जागांची संख्या कमी झाली असली, तरी बाजारपेठेत नवीन प्रकल्पांमध्येही कमतरता दिसून आली. पुण्यात एकूण सुरूवात करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये ३७ टक्क्यांची घट दिसून आली. पुरवठ्यातील ही कमतरता २०१६मध्ये होतीच, पण ती प्रॉपर्टी बाजारपेठेत २०१७मधील काही नवीन कायदेशीर नियमांमुळे होतांना दिसली.
या रिपोर्ट विषयी आपले मत व्यक्त करतांना गेरा डेव्हलपमेंटस् चे व्यवस्थापकीय संचालक रोहीत गेरा यांनी सांगितले, ‘२०१७ हे वर्ष भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेच्या इतिहासातील एक अनोखे वर्ष ठरले; कारण यामुळे पूर्ण बाजारपेठच बदलून गेली.
वर्षाची सुरूवात ही नोटाबंदीच्या पार्श्वभुमीतून झाली आणि देशभरांत असा समज झाला की, किंमती ३० ते ४० टक्क्यांनी कमी होतील. यामुळे नवीन विक्री थांबली. म्हणूनच नवीन घर घेण्यासाठी शोध सुरू केला आहे अशांनी शोध थांबवला. त्याचबरोबर ‘रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट’(रेरा) सुरू झाल्याने, ग्राहकांना प्राथमिकतेतून घरे देणे विकासकांनी सुरू केले. त्यामुळे आता नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी भांडवलही उभे करणे कठीण बनले. रेराची पूर्ण अंमलबजावणी केल्याने प्रत्येक प्रकल्पासाठी विकासकांना अधिक भांडवल लागू लागले आहे.’
या रिपोर्ट नुसार हे ही समोर आले आहे की, नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. प्रिमियम आणि प्रिमियम प्लसमधील नवीन प्रकल्पांमध्ये मात्र वाढ होतांना दिसते. गेल्या सहा महिन्यांत (जुलै १७ ते डिसेंबर १७) २००३ नवीन प्रिमियम प्लस विभागातील घरांचे प्रकल्प सुरू झाले. प्रिमियम विभागात सुध्दा ५३३२ नवीन घरांचे प्रकल्प सुरू झाले. नवीन पुरवठ्यातील कमतरता ही बजेट आणि व्हॅल्यू विभागात दिसून आली.
भौगोलिकदृष्ट्या पाहता पुण्यात विविध विभागांमध्ये नवीन प्रकल्प सुरूवातीतही घट दिसून आली. पुण्यातील मुख्य शहरांत विक्री साठी उपलब्ध असलेल्या एकूण अपार्टमेंट्समध्ये ११ टक्के घट ही विक्रीच्या तुलनेत दिसून आली. अन्य विभागांत नवीन घरांच्या सुरूवातीत जवळजवळ ३० ते ५० टक्के घट दिसून आली. ही घट किंमतीतही दिसते. निवासी घरांच्या किंमती या सलग चार सहामाहीत घसरतांना दिसत आहेत.

रिअल इस्टेटच्या कमी होणाऱ्या किंमतींविषयी बोलतांना गेरा म्हणाले, ‘नवीन पुरवठा नसल्याने आणि बाजारपेठेतील दीर्घकालीन मंदीमुळे किंमतींवर असाच दबाव राहील. तरीही बँकांनी व्याजदरांत केलेल्या कपातीमुळे खरेदीदारांमध्ये वाढ होईल आणि मला खात्री आहे की यामुळे २०१८ मध्ये मानसिकतेत चांगला बदल होऊ शकेल.’
या रिपोर्ट नुसार असे दिसून येते की बाजारपेठेत एकूणात विक्रीत घट झालेली आहे. गेल्या तीन वर्षांतील माहितीनुसार असे दिसून येते की, बजेट आणि व्हॅल्यू या विभागातून (२०१७ मध्ये ६८ टक्के) जास्त विक्री होत आहे.