Next
हर्षवर्धन पाटील यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा : मुख्यमंत्री फडणवीस
BOI
Wednesday, September 11, 2019 | 05:52 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देश मजबूत करू शकतात आणि देशाचे भवितव्य घडवू शकतात, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) मुंबईत केले. 

माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या आणि आमदार प्रसाद लाड, आमदार राज पुरोहित, आमदार किसन कथोरे, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. आणि प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक समस्यांना तोंड दिले आणि सकारात्मक पद्धतीने धाडसाने निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली निश्चित दिशेने काम केल्यामुळे राज्यातील भाजप महायुती सरकारने अडचणींतून मार्ग काढला. आपल्या समस्यांवर हेच सरकार तोडगा काढू शकते व आपल्याला न्याय देऊ शकते, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जशी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनतेची भावना होती, तशीच सकारात्मकता जनतेमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुती सरकार मोठ्या बहुमताने विजयी होईल.’

ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विचारांच्या पक्षात प्रवेश करून हर्षवर्धन पाटील यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला बळकटी मिळेल.’

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘हर्षवर्धन पाटील यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांनी दीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रशासनामध्ये आपल्या कार्यपद्धतीने ठसा उमवटला आहे. त्यांचा योग्य सन्मान भाजपकडून केला जाईल.’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणे हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसात घटनेचे कलम ३७० रद्द करण्यासोबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्त्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. भाजपमध्ये प्रवेश करताना मी कोणतीही अट घातलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडीन.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search