Next
चंद्रा यांच्या अध्यक्षपदाचे दुसरे वर्ष
प्रेस रिलीज
Wednesday, February 21, 2018 | 04:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टाटा समूहाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील पहिले पारशी नसलेले अध्यक्ष एन. चंद्रशेखर २१ फेब्रुवारी रोजी कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण करत आहेत. यापूर्वीच्या अध्यक्षांच्या उचलबांगडीमुळे सुरू झालेल्या गोंधळातून समूहाला बाहेर काढण्यात यश आल्याने चंद्रशेखर यांना खूपच समाधान वाटत असून, त्यांच्या दुसर्‍या वर्षाची सुरुवातही चांगली होण्याची शक्यता आहे. कारण लवकरच टाटा समूह आपले आतापर्यंतचे सर्वांत मोठे संपादन (अधिग्रहण) करेल अशी शक्यता आहे.

चंद्रा या नावाने ओळखले जाणारे के. चंद्रशेखर टाटा समूहाचे नेतृत्व करणारे तिसरे टाटा नसलेले अध्यक्ष आहेत. २४ ऑक्टोबर, २०१६ रोजी यापूर्वीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदच्युत करण्यात आल्यामुळे समूहात एकप्रकारची कटुता निर्माण झाली होती. मीठ ते सॉफ्टवेअर अशी व्याप्ती आणि १०५ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न असलेल्या (यातील ६५ टक्के वाटा बाहेरून आलेल्या उत्पन्नाचा) टाटा समूहाच्या अत्यंत कठीण काळात चंद्रा यांना नेतृत्वाची धुरा वाहण्यास सांगण्यात आले.  

टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होईपर्यंत चंद्रा हे टाटा समूहाची प्रमुख कंपनी टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी होते. या कंपनीचे बाजारातील मूल्य सर्वोच्च- सहा ट्रिलियनच्या जवळ जाणारे आहे. सहा ट्रिलियनचा टप्पा (एम-कॅप) कंपनीने गेल्या डिसेंबर महिन्यात तसेच जानेवारी महिन्यात अनेकदा ओलांडला आहे.

‘एक वर्षाच्या काळात, चंद्रा यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या बळावर आव्हानात्मक परिस्थितींवर मात करत सर्व व्यवसायांमध्ये हेच यश प्राप्त करून दाखवले आहे. टाटा टेलीसर्व्हिसेस-एनटीटी डोकोमो वादासारख्या वारसाहक्कासंदर्भातील वादांचे निराकरण, टाटाच्या देशांतर्गत कार्यात्मकतेचे पुनरुज्जीवन आणि टाटा स्टीलच्या युरोपातील खर्चिक प्रकल्पांतून गुंतवणूक काढून घेणे आदी कामांमुळे त्यांचे पहिले वर्ष उत्तम ठरले,’ असे बॉम्बे हाउसमधील विश्वसनीय सूत्राने सांगितले.

त्यांच्या सर्वांत मोठ्या यशांपैकी एक म्हणजे अडचणीत असलेल्या भूषण स्टील या कंपनीचे संपादन टाटा स्टील करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सध्या एनसीएलटीमध्ये असलेल्या या दिल्लीस्थित कंपनीच्या संपादनासाठी टाटा स्टीलने ३६ हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

चंद्रा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे गेल्या फेब्रुवारीत हाती घेतली. त्यावेळी समूहाला आव्हानांचा वेढा पडला होता. मिस्त्री यांना चार वर्षांच्या कार्यकाळानंतर मंडळाने ज्या पद्धतीने पदावरून दूर केले, त्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये वाईटसाईट चर्चा सुरू होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, एनसीएलटी आणि दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

तोट्यातील व्यवसाय ते पदच्युत अध्यक्ष मिस्त्री यांच्या कुटुंबाकडे टाटा सन्सची १८.६ अर्थात सर्वांत मोठी भागधारणा असल्याने निर्माण झालेली परिस्थिती अशी अनेक प्रकारची आव्हाने चंद्रा यांच्यापुढे होती. मिस्त्री यांच्या कार्यकाळात टाटा समूह ज्या संकटांमध्ये फसला होता, ती संकटे सोडवण्याच्या स्पष्ट उद्देशाने चंद्रा यांनी काम सुरू केले.

त्यांनी काढलेले काही उल्लेखनीय तोडगे म्हणजे जपानमधील आघाडीची दूरसंचार कंपनी डोकोमोसोबत झालेला १.२ अब्ज डॉलर्सचा तोडगा आणि आपल्या तोट्यातील दूरसंचार व्यवसायाची भारती एअरटेलला केलेली विक्री; तसेच युरोपमधील मोठ्या तोट्यात असलेला स्टील व्यवसाय अंशत: विकून जर्मनीच्या थायसेनक्रुप कंपनीत त्याचे विलीनीकरण करणे. पूर्वी सरकारद्वारे चालवली जाणारी व्हीएसएनएल कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या टाटा कम्युनिकेशनची जमीन वेगळी काढून घेण्यास दिलेली मंजुरी हे चंद्रा यांचे आणखी एक यश.

चंद्रा यांनी आणखी एका महत्त्वाच्या बाबीवर भर दिला आहे आणि ती म्हणजे १५० वर्षे जुन्या समूहात तरुणांचा सहभाग वाढवणे. टाटा सन्सच्या पातळीवर झालेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये समूह मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून सौरभ अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समूहाच्या मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून आरती सुब्रमणियन यांची नियुक्ती झाली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इन्फ्रा क्लस्टरच्या प्रमुखपदाची जबाबदारी बनमाली आग्रावाला यांच्याकडे देण्यात आली आहे. समूहाचे जनरल कौन्सेल म्हणून शुवा मंडल यांची, तर समूहाच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञ म्हणून गोल्डमॅन फेम रूपा पुरुषोत्तमम यांची निवड झाली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search