Next
जनसेवेपायी काया झिजवावी...
सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी जनसेवेसाठी चालवतो रिक्षा
संदेश सप्रे
Monday, August 20, 2018 | 01:07 PM
15 1 0
Share this article:

स्वतःच्या रिक्षासह रमेश खातू...संगमेश्वर : सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असे म्हटले, की कुटुंबासोबत शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतात; पण देवरुखजवळच्या साडवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या गावात एक वेगळाच सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतो. रमेश गणपत खातू (७९) असे त्यांचे नाव. आपल्या नोकरीच्या कालावधीत तर त्यांनी प्रामाणिकपणे जनसेवा केलीच; मात्र सेवानिवृत्तीनंतरही ते जनसेवेसाठी आपली काया झिजवत आहेत. पुरेसे पेन्शन असल्यामुळे त्यांना उत्पन्नासाठी काहीही करण्याची गरज नाही; मात्र अडल्या-नडलेल्यांना, रुग्णांना, गरिबांना, गरजूंना मदत करता यावी, म्हणून ते या वयातही रिक्षा चालवत आहेत. आधी समाजसेवा आणि मग व्यवसाय असे त्यांचे ब्रीद आहे.

महसूल विभागात लिपिक म्हणून खातू नोकरीला लागले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले. अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करताना त्यांनी आपल्या सेवाकाळात कुणाचेही काम अडवले नाही. आपल्या नोकरीच्या माध्यमातून ते समाजासाठी जेवढे जमेल तेवढे करत राहिले. तरीही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या मनात होती. म्हणूनच सेवानिवृत्त झाल्यानंतर ते रिक्षाचालक बनले. अडल्या-नडलेल्यांना मदत करत स्वतःचा छंद म्हणून ते हा व्यवसाय करत आहेत. 

रमेश खातू यांचा जन्म १९४०चा. संगमेश्वर तालुक्यातील माखजन हे त्यांचे मूळ गाव. गरीब घराण्यात जन्म झालेल्या खातू यांनी बाविसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण केले. १६ जानेवारी १९६४ रोजी ते गुहागर तालुक्यात महसूल विभागात लिपिक म्हणून रुजू झाले. मुलाला सरकारी नोकरी मिळाल्याचा आई-वडिलांना आनंदच झाला. १९६९मध्ये त्यांचा विवाह झाला. अवघ्या १०० रुपये पगारापासून त्यांची नोकरी सुरू झाली. अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्यांनी नोकरी केली आणि संसारही सांभाळला. त्यांना दोन मुली आहेत. सरतेशेवटी बढती मिळून ते नायब तहसीलदार झाले. या पदालाही त्यांनी योग्य न्याय दिला. १९९९मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

नोकरीचा कालावधी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून व्यतीत केला. सेवानिवृत्त झाल्यावरही ते जनतेची कामे करत राहिले. शेगावचे गजानन महाराज, पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी यांचे निस्सीम भक्त असलेल्या रमेश यांनी ‘शेगावला जाईन, तर स्वतःचे वाहन घेऊनच,’ असा पण केला होता. दरम्यानच्या काळात मुलींची लग्ने झाली. पत्नी आजारी पडली. पत्नीने स्वतःच्या वाहनाने गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचा हट्ट धरला आणि खातू यांनी रिक्षा विकत घेतली.

देवरुख ते शेगाव हे अंतर १४०० किलोमीटरचे आहे. जाऊन-येऊन सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास; पण पत्नीची इच्छा आणि स्वतः बोललेला नवस मनाशी ठेवून त्यांनी हेच अंतर सहा दिवसांत कापत त्यांनी पत्नीची इच्छा पूर्ण केली. यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, बेळगाव, इंदापूर या मार्गाने रिक्षाने दौरे करून पत्नीला हवे त्या ठिकाणी फिरवले. २०१५मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

आज वयाच्या ७९व्या वर्षीही ते एखाद्या युवकाला लाजवेल असे ड्रायव्हिंग करतात. शिवाय नित्य दिनक्रमही कोणाच्याही मदतिशिवाय करतात. हाती असलेली रिक्षा केवळ पैसे मिळवण्यासाठी न ठेवता कोण अडला-नडला असेल त्याला घरी नेऊन सोडणे, रुग्णालयात येणाऱ्या आणि अडचणीत असलेल्या रुग्णांना प्रसंगी मोफत सेवा देणे, गोरगरीब लोकांना ये-जा करण्यासाठी मदत करणे आणि त्यातून जमेल तेव्हा मिळाले, तर एखादे व्यावसायिक भाडे स्वीकारणे हा खातू यांचा नित्यक्रम आहे. सुरुवातीला त्यांनी रिक्षा स्टँडला लावली होती; मात्र भाडे मिळविण्यासाठी तेथे होत असलेली चढाओढ पाहून ते तेथून लांब झाले. आज खातू काकांना गाठायचे असेल, तर एखादे रुग्णालय किंवा सार्वजनिक ठिकाणी शोधावे लागते.

याबद्दल रमेश खातूंना विचारले असता, ‘पैसे मिळवण्यासाठी मला काहीही करण्याची गरज नाही. अनेक लोक मला तुम्ही कुठल्या पदावरून रिटायर झालात आणि आज काय करताय, असे विचारतात; मात्र मी माझी नोकरी किंवा पद माझ्या कपाळावर चिकटवून थोडाच आलो होतो? जे काही करतोय ते तुमच्या-आमच्यासाठी, असे म्हणून मी माझे काम करतोय. मी आज हट्टाकट्टा उभा आहे, तो या रिक्षाच्या जिवावर. त्यामुळे मरेपर्यंत हे काम सोडणार नाही,’ अशी भावना ते व्यक्त करतात. 

खातू यांना आज १२ हजार रुपये पेन्शन मिळते. पोटासाठी पुरेसे उत्पन्न असतानाही ते समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने रिक्षा चालवतात. पैशांसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची गर्दी असलेल्या आजच्या जगात खातू यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे.

संपर्क :
रमेश खातू : ९४२३८ १७९२७
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhyes About 93 Days ago
i. Wish ,
0
0
Balkrishna Gramopadhye About 93 Days ago
i wish , this had occurred to me Hope , others. Will. Follow. You . May. You. Enjoy
0
0
Dhamaskar Salim About 245 Days ago
रमेश काकांना माझ्या मनापासून नमस्कार लई भारी
0
0
Anil shivram jadyar About 298 Days ago
Khup sunder . aapale avirat kary asech chalu rahude.
0
0
उदय कुलकर्णी ( पुणे ) About 302 Days ago
खातू काका असेच जनतेची सेवा सुरू राहू द्या. धन्यवाद. देव तुम्हाला खूप आयुष्य देवो हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
1
0
Raghunandan D. Bhadekar About 302 Days ago
आपल्या कार्याला माझा सलाम.
1
0
अमित सामंत About 302 Days ago
अभिमान आहे तुमचा
1
0

Select Language
Share Link
 
Search