Next
‘३ फेसेस’च्या निमित्ताने...
BOI
Saturday, December 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


'इरानियन' किंवा 'पर्शियन' सिनेमानं अगदी सुरुवातीपासूनच सिनेमात नाविन्याची कास धरली होती. परंतु दुर्दैवानं उर्वरित जगात मानाचा ठरलेला पर्शियन सिनेमा त्याच्या मायभूमीत मात्र रुजला नाही. तिथे त्याला फार काळ आश्रय मिळाला नाही. अशा प्रतिकुलतेतही तग धरून राहिलेल्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे जफर पनाही. त्यांच्या अलिकडेच आलेल्या '३ फेसेस' या सिनेमाबद्दल अनिरुद्ध प्रभू यांनी लिहिलेला हा लेख...  
.................................
मध्य दुनियेतल्या सिनेमानं जागतिक सिनेसृष्टीला बऱ्याच अर्थानं प्रगल्भता दिली. पाश्चिमात्य मुक्त विचारसरणीचा प्रभाव आणि पौर्वात्य जगातली पारंपरिक मूल्यं या दोन्हींचा समन्वय तिथल्या स्थानिक मातीमध्ये घट्ट रोवला आहे. त्यातून एक नवी दृष्टी सिनेमाला मिळाली. इराणमधला सिनेमा हा याच श्रृंखलेचा पाईक आहे. इरानियन किंवा पर्शियन सिनेमानं अगदी सुरुवातीपासूनच सिनेमातील कथा-कथन पद्धतीत नाविन्य दाखवण्याची कास धरली होती. तेव्हापासूनच त्याची पाळमुळं घट्ट रोवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळेच आज आपण विशेषत्वानं आणि प्रगल्भतेनं या इरानियन सिनेमाकडे पाहत आहोत. परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा स्थानिक कट्टर शक्तींना विरोध करण्यात कमी पडल्यानं म्हणा, उर्वरित जगात मानाचा ठरलेला पर्शियन सिनेमा त्याच्या मायभूमीत मात्र रुजला नाही. तिथे त्याला फार काळ आश्रय मिळाला नाही. 

दिग्दर्शक जफर पनाहीकाही तथाकथित प्रवाही अपवादांच्या व्यतिरिक्त असलेलं अस्सल सोनं नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत राहिलं. कट्टर शक्तींचा राज्यकर्त्यांवर असलेला प्रभाव, कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींमध्ये सातत्यानं होणारे हस्तक्षेप आणि तिथली असंवेदशील परिस्थिती या सगळ्यांचा मोठा परिणाम सिनेमावर झाला. अनेकांना ही घुसमट सहन झाली नाही. याच कारणामुळे मखलबाफ, किरोस्तामी यांसारखे अनेक प्रतिभावंत दिग्दर्शक देश सोडून पाश्चिमात्य देशांच्या आश्रयाला गेले अन् तिथून काम करू लागले. असं असलं तरी त्यातील काही दिग्दर्शक मायभूमीत राहून जमेल तसा विरोध करत काम करत राहिले. त्यातल्या बहुतांश लोकांना त्याची किंमतही मोजावी लागली. त्यातलंच एक नाव म्हणजे जफर पनाही, जे आज पर्शियन सिनेमातलं एक मोठं नाव समजलं जातं. 

आजतागयत जवळपास २४ प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या जफर यांना २०१०मध्ये राजसत्तेविरुद्ध जनतेला भडकवण्याच्या आणि पर्यायानं देशद्रोहाच्या आरोपाखाली  कुटुंबासह अटक झाली. त्यांनी इराणमधल्या सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर सिनेमाच्या माध्यमातून उघडपणे भाष्य  केल्याची ही पावती होती. २०१०पासून पुढची २० वर्षं त्यांच्यावर सिनेमा लिहिणं-बनवणं, जाहीर वक्तव्य करणं आणि देशाबाहेर जाणं यांवर बंदी घातली गेली. त्यामुळे त्यांचे तेव्हापासून आजपर्यंतचे एकूण चार चित्रपट अनधिकृत आहेत. त्या सिनेमांना इराणमधल्या शासकीय संस्थेची परवानगी नाही. असे असले, तरी पायरसी आणि अन्य मार्गांनी हे चित्रपट जगभर पोहोचले, महोत्सवांत दाखवले गेले. त्यांचा अलिकडेच आलेला सिनेमा '३ फेसेस' या वर्षी ‘इफ्फी’मध्ये दाखवला गेला.

सिनेमाच्या नावावरूनच काही प्रमाणात सिनेमाच्या कथेचा अंदाज येऊ शकतो. ३ फेसेस अर्थात तीन चेहरे म्हणजेच तीन माणसं आणि त्यांच्याभोवती फिरणारी कथा, असा हा सिनेमाचा आराखडा आहे. इराणमध्ये प्रसिद्ध असलेली एक अभिनेत्री, ‘बेहनाज’, जिला तिच्या नावाचा उल्लेख असलेली एक व्हिडिओ क्लिप मिळते. ज्यामध्ये एक मुलगी आत्महत्या करते. बेहनाज जफर पनाहींना घेऊन त्या मुलीच्या शोधात बाहेर पडते. नंतर ती मुलगी नक्की आत्महत्या करते का? त्या मुलीचं नेमकं काय म्हणणं असतं? या सगळ्याच्या उलगड्यासाठी सिनेमा पाहणं उत्तम ठरेल.  

मुळात पनाहींच्या सिनेमामधल्या कथा या उगाच धक्का देणाऱ्या नसतात. पनाही त्यांच्या साध्या सरळ कथेसाठी ओळखले जातात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. हा सिनेमासुद्धा याला अपवाद नाही. त्या मुलीला शोधण्याचा प्रवास सुरू होतो आणि इप्सित स्थळी संपतो, पण या सगळ्यांत अनेक गोष्टी उलगडत जातात.

चित्रपटातील पात्रांना जसा इराण अजून जास्त दिसत- समजत जातो, तसाच तो आपल्यालाही समजत जातो. गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव, परंतु पाहुण्यांबाबतची आदराची भावना यांसारख्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असलेल्यासारख्याच सामान्य असल्याच्या जाणवतात. तिथल्या समाजावर असलेली कट्टर शक्तींची पकड मात्र ठळकपणे लक्षात येते. 'मर्जियाह' अर्थात त्या व्हिडिओमधल्या मुलीला अभिनेत्री व्हायचं असतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू असतात. एखाद्या मुलीने सिनेमात किंवा टिव्हीवर काम करणं धार्मिक आधारांच्या विरुद्ध आहे, म्हणून तिला प्रचंड विरोध केला जातो. त्यात तिचं लग्न ठरवलं जातं. या सगळ्या प्रकारामुळे घुसमट होऊन ती बेहनाझशी संपर्क करू पाहते. मर्जीयाह हे तिथल्या स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीचं एक प्रतिक आहे. 

मुळात ‘३ फेसेस’ या नावातच असलेले तीन चेहरे, पनाही प्रतिक म्हणून वापरतात. एक चेहरा अर्थात ‘मर्जियाह’चा आहे, जो शोषित वर्गाचा चेहरा आहे. दुसरा पनाहीचा स्वतःचा चेहरा, जो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन परिणाम भोगत आहे आणि तिसरा चेहरा बेहनाज जाफरी हिचा आहे. बेहनाझ ही रीबेल आहे. ती मुस्लिम आहे, स्त्री आहे अन् त्याहीपेक्षा एक अभिनेत्री आहे. हे सगळं तिथल्या प्रस्थापित कट्टर व्यवस्थेला अमान्य आहे आणि त्यांच्या मते व्यवस्थेच्या विरोधात आहे. हे तीन चेहरे एकत्र केले, की इराणमधली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था, त्याच्यावर असलेले धार्मिक प्रभाव आणि त्यांची घट्ट रुजलेली पाळेमुळे असा तिथल्या एकूण परिस्थितीचा आलेख लक्षात येतो. हा आलेख बंधन, दडपशाही आणि विरोध या तीन गोष्टींच्या आधारावर अवलंबून आहे. परंतु तो फक्त इराणपुरता मर्यादित नाही, तर थोड्या फार फरकानं सगळीकडे तसाच आहे. काही ठिकाणी त्यावर जाहीर भाष्य करता येतं, तर काही ठिकाणी त्यावर वाच्यताही करता येत नाही इतकाच काय तो फरक राहतो.

कलाकृती म्हणून हा सिनेमा उत्तम आहेच, परंतु जफरच्या इतर सिनेमांच्या मानाने याचा प्रभाव कमी पडला इतकंच. अर्थात कथेच्या विस्तारासाठी साधनांची असलेली बंधनं हे त्यामागचं कारण आहे. असं असलं, तरी कथेच्या जीवावरसुद्धा एक संवेदनशील दिग्दर्शक गंभीर विषय उत्तमपणे पोहोचवू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा हा सिनेमा आहे. ३ फेसेस अनुभव म्हणून उत्तम आहेच, पण आपल्या सुजाण मनाला प्रगल्भतेच्या किनाऱ्यावर नेताना देश आणि समाज या माध्यामांवर विचार करायला लावणारा नक्कीच आहे. अर्थात त्यातील तीन चेहऱ्यांच्या भूमिका आपण कोणत्या दृष्टीकोनातून घेतो हे व्यक्तीपरत्वे बदलणारं असेल इतकंच... 

संपर्क : अनिरुद्ध प्रभू, वेंगुर्ला
मोबाइल : ७७५६९ ६२७२१

(अनिरुद्ध प्रभू ब्लॉगर असून, प्रामुख्याने चित्रपटविषयक लेखन करतात.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search