Next
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात विशेष मोहीम
नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी
BOI
Saturday, March 02, 2019 | 01:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी दोन व तीन मार्चला राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

यासंदर्भात एक जानेवारी २०१९ला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच २३ आणि २४ फेब्रुवारीला विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी (दोन व तीन मार्च) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. ‘बीएलओं’कडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादीही ‘बीएलओं’कडे उपलब्ध असेल.

सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना व जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे कळवण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.

मतदारांच्या सोयीसाठी https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link