Next
‘समाजसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या व्यक्ती म्हणजे संचित’
अॅड. विलास पाटणे यांच्या ‘संचित’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Wednesday, October 03, 2018 | 11:27 AM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘समाजसेवेचे व्रत हृदयापासून अंगीकारणाऱ्या व्यक्ती म्हणजे समाजाचे संचित असतात. अशा व्यक्ती वाचणे आणि त्यांच्याविषयी लिहिणे खूप कठीण आहे; मात्र अॅड. विलास पाटणे यांनी या व्यक्ती शोधून त्यांचे कमी शब्दांत ठसठशीत चित्रण ‘संचित’ पुस्तकामध्ये केले आहे,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी काढले.

अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘संचित’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ३० सप्टेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत हॉटेल विवेक येथे पार पडला. त्या वेळी मधुभाई बोलत होते. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मधुभाईंसह या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लक्ष्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाईही उपस्थित होत्या. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या अध्यक्षा आशा कामत, आमदार आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. घराडी येथील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.

‘मृत्यू समोर असताना धैर्याने पाय टाकणे सैनिक जाणतो. शत्रूशी लढत असताना त्यांच्या डोळ्यासमोर केवळ कर्तव्य असते. आपले आपल्या जगण्यावर प्रेम आहे. परंतु २२-२४ वर्षांचा सैनिक ‘आम्ही जीवन समाजासाठी झुगारून देतो’ असे सांगतो. आज आपण स्वतःहून अनेक प्रकारचे स्वातंत्र्य घेतले आहे. परंतु आपल्या स्वातंत्र्याचे बिल आपला सैनिक भरतो. त्यांना पैसे नको केवळ तुमचा पाठिंबा आणि विश्वास हवा आहे,’ असे आवाहन लक्ष्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.

‘लो. टिळकांनी स्वातंत्र्यासाठी गणेशोत्सवाचा लोकोत्सव केला; मात्र आता झिंगाटच्या गाण्यांवर तरुणाई नाचते. यामुळे स्वातंत्र्य टिकणार नाही, तर ते टिकण्यासाठी प्रत्येक घरात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले पाहिजे,’ असे प्रतिपादन विंचू दंशावरील लशीचे संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केले.

अॅड. रमाकांत खलप यांनी कोकण व गोव्याचे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले. ‘अशा अनेक व्यक्ती समाजसेवा करत आहेत. त्यांना प्रकाशात आणण्यासाठी अॅड. पाटणे यांनी आणखी लेखन करावे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सामंत यांनी अॅड. पाटणे यांचे कौतुक करताना कर्तृत्वाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींसोबत व्यासपीठावर संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘मलाही आता अशा कार्यक्रमांना येणे आवडते. मीसुद्धा दोन-तीन वर्षांत पुस्तक लिहिणार असून, त्याचे प्रकाशन मधुभाईंच्या हस्ते व्हावे,’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. घराडीच्या अंध विद्यालयाला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

‘ज्यांना आयुष्याचे प्रयोजन समजले आहे, असे अनेक प्रतिभावंत अनेक क्षेत्रांत निष्ठेने काम करीत आहेत. त्यांचे जीवनाचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान असते. अशा अनेक सुहृदांशी झालेल्या संवादातून त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्वे उलगडत गेली. ती जशी मला भावली, समजली, तशी या पुस्तकात लिहिली आहेत,’ अशा शब्दांत अॅड. पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजक रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयासंदर्भातली माहिती अॅड. पटवर्धन यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link