Next
‘शालेयस्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हावेत’
प्रेस रिलीज
Saturday, November 03, 2018 | 11:37 AM
15 0 0
Share this article:

‘उचित माध्यम’ प्रकाशित ‘संवाद... सर्जनशील मनाशी’ विज्ञान-तंत्रज्ञान विशेषांकाच्या प्रकाशनावेळी बोलताना डॉ. गोविंद स्वरूप.

पुणे : ‘विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शालेयस्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हायला हवेत. भारतीयांकडे विज्ञानाची दूरदृष्टी आहे; मात्र अंमलबजावणीत आपण मागे पडतो. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत विज्ञान कार्यशाळा व्हावयाला हव्यात,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांनी व्यक्त केली.

‘उचित माध्यम’ प्रकाशित ‘संवाद... सर्जनशील मनाशी’ विज्ञान-तंत्रज्ञान विशेषांकाच्या प्रकाशनावेळी डॉ. स्वरूप यांची मुलाखत नितीन शास्त्री यांनी घेतली. विद्यार्थी सहायक समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात रंगलेल्या या मुलाखतीवेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे (आयसर) डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘संवाद’चे कार्यकारी संपादक जीवराज चोले, उचित माध्यमच्या रेश्मा चोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘संवाद... सर्जनशील मनाशी’ विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून जीवराज चोले, डॉ. अरविंद नातू, डॉ. गोविंद स्वरूप, डॉ. दीपक शिकारपूर, रेश्मा पालवे-चोले.

डॉ. स्वरूप म्हणाले, ‘डॉ. होमीभाभा यांच्याबरोबर मला काम करता आले. त्यांची दूरदृष्टी अफाट होती. उटी आणि खोडद येथील जीएमआरटी महाकाय दुर्बिणीची निर्मिती करण्याचे भाग्य मला मिळाले. विज्ञान प्रसाराचे कार्य अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने करीत आहेत. विज्ञान संस्थाही ‘ओपन डे’ ठेवून मुलांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र शालेय वयातच विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लावायची असेल, तर आपल्याला चांगले आणि प्रयोगशील विज्ञान शिक्षक घडवायला हवेत. विज्ञान लहान मुलांपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. विज्ञानाची ओळख लहान वयात झाली, तरच भविष्यात शास्त्रज्ञ निर्माण करू शकतो.’

डॉ. शिकारपूर म्हणाले, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे आणि प्रगतीही वेगाने होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. तंत्रज्ञानाचे प्रवाह कायम बदलत असून, त्यानुसार माणसाला बदलणे गरजेचे आहे. कारण त्याला स्पर्धेमध्ये राहणे गरजेचे आहे. यंत्रमानवामुळे माणसाचे जगणे अधिक सोपे होणार असले, तरी त्याच्यासोबतच माणसाचे भविष्यामध्ये मोठे संघर्ष होणार आहेत.’

डॉ. नातू म्हणाले, ‘विज्ञानाच्या माध्यमातूनही करिअर करता येते ही माहिती तरुण मुले आणि त्यांच्या पालकांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे. विज्ञानाचा ज्ञानाबरोबरच संपत्ती निर्माण करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो हे तरुणांना पटवून दिले, तर विज्ञानाचा अधिक प्रचार आणि प्रसार होऊ शकेल.’

डॉ. रवींद्रकुमार सोमण व डॉ. कमालकांत वडेलकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक जीवराज चोले यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search