Next
‘स्फेरुल’ आणि ‘मदरहूड’तर्फे विश्वविक्रमासाठी प्रयत्न
मासिक पाळीदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागरूकता
प्रेस रिलीज
Monday, December 17, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

किशोरवयीन मुली, मुले, महिलांना मार्गदर्शन करताना मदरहूड हॉस्पिटल्समधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार.

पुणे : येथील मदरहूड हॉस्पिटल्स या महिला व बाल रुग्णालयाने स्फेरुल फाउंडेशन या महिला सबलीकरण व आरोग्य या संदर्भातील विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या सहकार्याने ‘मासिक पाळीतील आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयाबाबत किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
 
‘मदरहूड’मधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी केंद्रीय विद्यालयात उपस्थित असलेल्या सुमारे सतराशे लोकांशी मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेचे महत्त्व, गृहितके, गैरसमज या संदर्भात ३८ मिनिटे आठ सेकंदाचा संवाद साधला. या संयुक्त उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. ‘मासिक पाळीतील आरोग्य व स्वच्छता’ याविषयी आयोजित या उपक्रमासाठी किशोरवयीन मुली, मुलगे, पुरुष आणि महिला सर्वाधिक संख्येने उपस्थित होत्या.

मासिक पाळी असलेल्या भारतातील ३५५ दशलक्ष महिलांपैकी केवळ १८ टक्के महिला सॅनिटरी नॅपकीन्सचा वापर करतात आणि सॅनिटरी नॅपकीन न परवडणाऱ्या ८२ टक्के महिला वर्तमानपत्रे, माती, पाने, चिखल किंवा निर्जंतुक न केलेली फडकी, चिंध्या अशा आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ असलेल्या पर्यायांचा वापर करतात. त्यामुळे खाज येणे, जळजळ, योनीमार्गाला व मूत्रमार्गाला होणारा संसर्ग, वंध्यत्व आणि प्रजननाशी संबंधित आरोग्याच्या इतर आजार होतात.

या उपक्रमाबद्दल सांगताना स्पेरुल फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. गीता बोरा म्हणाल्या, ‘मासिक पाळीबद्दल जगभरातील मौन आणि लाज ही चिंतेची बाब आहे. एकट्या भारतातच सॅनिटरी नॅपकीनची अनुपलब्धता आणि मासिक पाळीबद्दल नीट माहिती नसल्यामुळे २३ दशलक्ष मुली (दर पाचपैकी एक मुलगी) शाळा सोडतात. मदरहूड हॉस्पिटलसोबत सहयोग करून, मासिक पाळी हा कलंक नाही या वस्तुस्थितीबाबत देशात अधिक खुली विचारसरणी उद्युक्त करण्यासाठी आम्ही एक छोटे पाऊल उचलत आहोत. आपल्या मुलींसाठी मासिक पाळी महत्त्वाची असते आणि सगळ्यांसाठीच आणि सगळीकडे ती महत्त्वाची असते. आम्ही ती अनुभवतो आणि या अनुभवाला एक निश्चित आकार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.’

उपक्रमात सहभागी झालेल्या मुली, महिला, पुरुष

या उपक्रमासंदर्भात ‘मदरहूड’मधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. पवार म्हणाल्या, ‘किशोरवयीन मुलींना मासिक पाळीची भीती वाटत असते, शंका, गैरसमज असतात. हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये मासिक पाळी हा एक स्वागतार्ह बदल आहे या विषयावर मुली, मुलगे, पुरुष आणि महिलांना माहिती देण्यात येते. मासिक पाळीबाबतची शरीरशास्त्राचे माहिती देणे आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर करण्याचे काम या उपक्रमातून करण्यात येते. मासिक पाळीतदरम्यान स्वच्छता कशी राखावी आणि या विषयाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देण्यासाठी स्फेरुल फाउंडेशनतर्फे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रकारचे उपक्रम ही आजच्या काळाची गरज आहे आणि या उपक्रमामध्ये ‘स्फेरुल’सोबत सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’

युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणानुसार या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८० टक्के महिला त्यांचे मासिक पाळीदरम्यान वापरलेले कापड पुन्हा वापरण्यासाठी अस्वच्छ जागी ठेवतात. ४० टक्के महिलांना कापड बदलणे शक्यत होत नाही किंवा साबणाने ते कापड धुवतही नाहीत. त्यांना त्यांचे सॅनिटरी कापड उघड्यावर धुण्यास लाज वाटते. ५० टक्के महिला त्यांचे मासिक पाळीदरम्यान वापण्याचे कापड उघड्यावर आणि संपूर्ण सूर्यप्रकाशात वाळवूही शकत नाहीत. हे कापडावरील जीवाणू नष्ट होण्यासाठी हे कापड सूर्यप्रकाशात वाळवणे अत्यंत आवश्यक असते. प्रायव्हसी, सुरक्षितता आणि स्वच्छतागृहांच्या अभावामुळे परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळेच या सर्वांवर मात कशी करावी या संदर्भात जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search