Next
‘अनंत आमुची ध्येयासक्ती’
प्रेस रिलीज
Tuesday, June 06, 2017 | 11:03 AM
15 0 0
Share this article:

संतोष होळीपुणे : आपण कित्येकदा स्वत:ला कमी लेखतो आणि असीम स्वप्नांना सीमारेषेत बांधतो. यापेक्षा जास्त मला जमणार नाही. माझे शरीर साथ देणार नाही. यापूर्वी कुणी असे केले आहे का, वगैरे-वगैरे रडगाणे रडत राहतो. मग सबब सांगणे अंगवळणी पडते. स्वत:भोवती कोश बनवून आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडून जगला गवसणी घालायला विसरतो. त्याच वेळी मध्यम वर्गातून आलेला, फारसे आर्थिक पाठबळ नसताना एक युवक थेट ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या विक्रमाची नोंद करतो. त्याचे नाव संतोष होळी.

सलग २२ राज्यांतून १५ हजार २२२ किलोमीटर अंतर १११ दिवसांत गिअर नसलेल्या सायकलवरून पार करून संतोष होळी याने विश्वविक्रम प्रस्थापित केला. तो मूळचा सोलापूरचा असून, कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. सोलापूरच्या सुशीलकुमार शिंदे प्रशालेतून व हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापुरातील ‘आयटीआय’मधून २००२मध्ये टर्नरचे प्रशिक्षण पूर्ण करून तो पुण्यात कामासाठी स्थायिक झाला. २०१२मध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि २०१५मध्ये बीई (मेकॅनिकल) हे शिक्षण त्याने पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रात सर्वसामान्य युवावर्गाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यासाठी काम करण्याच्या उद्देशाने तो सायकलिंग क्षेत्रात उतरला.

अद्ययावत उपकरणे नसल्याचा न्यूनगंड, उदासीन वातावरण आणि सातत्याने प्रयत्नशील न राहणे यामुळे ग्रामीण खेळाडू मागे राहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या दृष्टीने काही तरी करायचे त्याने ठरवले. एका सायकल स्पर्धेत त्याला गिअर सायकलसाठी स्पॉन्सरशिप मिळाली नाही; पण तो खचून गेला नाही. त्याने गिअर नसलेल्या साध्या बीएसए मॅक वन या सायकलचा वापर करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम केले. या सायकलची किंमत फक्त ३२०० रुपये इतकी आहे. ही आठ वर्षे जुनी सायकल पत्नीने संतोषला लग्नापूर्वी व्हॅलेन्टाइन डेला भेट म्हणून दिली होती. ‘ही सायकल विश्वविक्रमापर्यंत नेऊ शकेल याची मला कल्पनाही नव्हती,’ असे संतोष हसत हसत सांगतो.

संतोष होळी याने २०१४ साली जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किलोमीटरचे अंतर एकट्याने गिअर नसणाऱ्या सायकलवरून २३ दिवसांत विक्रमी वेळेत पार केले होते. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला व त्याची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली. त्यानंतर त्याने ‘लाँगेस्ट जर्नी बाय बायसिकल इन सिंगल कंट्री’ या प्रकारात विक्रम केला. गिअर नसणाऱ्या सायकलवरून सलग १११ दिवस २२ राज्यांतून एकट्याने प्रवास करून १५ हजार २२२ किलोमीटरचे अंतर पार करून त्याने विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा विक्रम १४५ दिवसांत १४ हजार ५७८ किलोमीटर असा होता. या विक्रमासाठी  केवळ एक लाख ३५ हजार रुपये खर्च आला असून, यापूर्वीच्या ‘रेकॉर्ड होल्डर्स’नी सात ते आठ लाख रुपये खर्च केलेले आहेत. कमी खर्चात मोठा विक्रम करण्यासाठी संतोष होळी विशेष प्रयत्नशील असतो.

या विश्वविक्रमासाठी संतोषने सायकलिंगची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधील भक्ती-शक्ती येथून १३ ऑक्टोबर २०१५ रोजी सुरू केली आणि ३१ जानेवारी २०१६ रोजी तो पूर्ण केला. या प्रवासात भक्ती व शक्ती या दोन्हींचा चांगला संगम संतोष याने घातला. केवळ विश्वविक्रम न करता या प्रवासात त्याने चक्क १० ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण केले. ‘प्रत्येकवेळी मी माझी पॉझिटिव्ह एनर्जी या माध्यमातून वाढवत होतो,’ असे तो सांगतो. त्याबरोबरच अजमेर गरीब नवाज, अमृतसर गोल्डन टेंपल, द्वारका, आगरा, गोरखपूर, पुरी जगन्नाथ, कन्याकुमारी, मदुराई या ठिकाणीही त्याने दर्शन घेतले.

नित्योपयोगी वस्तू, कपडे, सायकलचे पार्टस् आणि या सर्व टोकाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारे सामान पूर्ण प्रवासात एकट्याने घेऊन फिरणे व सांभाळणे यात कौशल्य लागते. रोज सकाळी सामानाची बांधाबांध व रात्री पुन्हा बॅग उघडणे म्हणजे संयमाची परीक्षा असते. बरोबर कोणी सहायक नाही किंवा मागोमाग चालणारी गाडी नाही. त्यामुळे २० किलोचे बिऱ्हाड वागवत प्रवास सुरू राहिला.

‘कधी कधी शरीर थकायचे, वैताग यायचा आणि वाटायचे, की इथेच थांबावे व परत जावे; पण खरी लढाई चालायची मनात. अशा वेळी स्वतःचे कौन्सेलिंग करावे लागायचे आणि स्वत:चा प्रेरणास्त्रोत बनून मरगळ झटकली जायची,’ असे तो सांगतो.

‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ म्हणत सायकलिंग क्षेत्रात आपले सर्वोत्कृष्ट योगदान देत संतोषने आपल्या सायकलिंगद्वारे विश्वविक्रम केला. दृढ संकल्प असेल, तर क्रीडा क्षेत्रातील ध्येय साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागत नाही, असे संतोष होळीचे म्हणणे आहे. यापुढे सुवर्ण चतुष्कोन अर्थात गोल्डन क्वाड्रिलॅटरलचे सहा हजार किलोमीटरचे अंतर १५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संतोषने ठेवले आहे. विक्रम करणारे काही वेगळे नसतात, फक्त ते वेगळा विचार करतात आणि सातत्याने प्रयत्न करणारे असतात, हे संतोषच्या उदाहरणावरून पटते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajesh Sanga About
Congratulations Santoah Holi From Dhyeyasiddhi India Solapur
0
0
Dhyeyasiddhi India About
Congratulations Santosh Holi sir Dhyeyasiddhi India Solapur
1
0
Krishna narle About
Great job.congratulations .and best of luck for new ambitions .keep it up.
1
0
gaikwad abhijit About
Best wishes for ur record
0
0
gaikwad abhijit About
Best wishes for ur record
1
0
Deepa C Mali About
Congratulations
2
0
Shishir Madhava Acharya About
Congratulations, proud of you, and all the best for future ventures.
2
0

Select Language
Share Link
 
Search