Next
‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’
BOI
Wednesday, March 21, 2018 | 01:08 PM
15 0 0
Share this story

‘प्रिन्स चार्मिंग’ पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन करताना (डावीकडून) अमृता कुलकर्णी, प्रसन्न पेठे, आनंद देशमुख, सुलभा तेरणीकर आणि सुप्रिया लिमये.

पुणे :
‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज कलाकारांबाबत अभ्यासू पत्रकारांनी, अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण लेखन करावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केली.  दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रिन्स चार्मिंग’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. ‘प्रिन्स चार्मिंग’ हे पुस्तक ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे ‘कंटेंट क्रिएटर’ प्रसन्न पेठे यांनी लिहिले आहे. ते पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे, तर त्याचे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. 

या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसन्न पेठे यांनी आधी लिहिलेल्या आणि ‘कॉन्टिनेन्टल’तर्फेच प्रकाशित झालेल्या ‘मला उमगलेला वुडहाउस’ या पुस्तकाचे ई-बुकही याच कार्यक्रमात ‘बुकगंगा’तर्फे प्रकाशित करण्यात आले. (‘मला उमगलेला वुडहाउस’ हे पुस्तक किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी http://www.bookganga.com/R/4ECV0 येथे क्लिक करा.)

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, ‘चित्रपटसृष्टीतील कलाकारांभोवतीच्या गॉसिपभोवतीच अडकून न राहता, त्या कलाकारांनी मेहनतीने, जिद्दीने, कष्टाने अभिनय क्षेत्रात जी उंची गाठलेली असते त्याबाबतदेखील गंभीरपणे लेखन, डॉक्युमेटेंशन होणे गरजेचे आहे. याबाबत पाश्चात्य देशांमध्ये जी सजगता आणि जागरूकता दिसून येते, तेवढी भारतीय चित्रपटसृष्टीबाबत दिसून येत नाही. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून कपूर घराण्यातून येणाऱ्या कलाकारांनी अभिनयाची एक वेगळीच उंची गाठली होती. शशी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच नाटकावरदेखील मनापासून प्रेम करत होते. त्यासोबतच त्यांनी पाश्चात्य देशांतदेखील विविध चित्रपटांमध्ये काम करून तेथे त्यांचा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांच्यावर मराठीत पुस्तक झाले ही खूप आनंदाची बाब आहे.’

आनंद देशमुख म्हणाले, ‘शशी कपूर यांचा काळ हा मल्टिटास्किंग कास्ट आणि ‘ब्लॅक अँड व्हाइट’कडून रंगीत चित्रपटांकडील वाटचालीच्या स्थित्यंतराचा काळ होता. शशी कपूर यांच्या अदाकारीने आमची पिढी भारावलेली होती. तरीदेखील शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाकडे थोडे दुर्लक्षच झाले, असे म्हणावे लागेल. हॉलिवूडच्या युनिव्हर्सल थिएटरमध्ये त्यांची पोस्टर्स लागलेली असायची. परंतु त्यांना भारतात हव्या त्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही.’ 

शशी कपूर यांनी आपल्या मनावर कसे गारूड केले होते, हे लेखक प्रसन्न पेठे यांनी मनोगतात सांगितले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय भूमिका मांडली. तसेच ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी हे पुस्तक ई-बुक प्रकारात प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा रहाणे यांनी केले. 

(‘प्रिन्स चार्मिंग’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. शशी कपूरच्या बालपणीचे या पुस्तकातील काही किस्से वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link