Next
चला, चिमण्या वाचवू या!
प्रशांत सिनकर
Wednesday, March 20, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
‘या चिमण्यांनो परत फिरा रे...’ असे चिमण्यांना खरोखरच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, मुंबई-ठाणे शहरात चिमण्यांची चिव चिव कमी झाली असून, पर्यावरणातील बदलांमुळे शहरात चिमण्या दिसणे दुर्मीळ झाले आहे. प्रदूषित पाणी,ध्वनिप्रदूषण, विद्युतचुंबकीय लहरींचे प्रदूषण इत्यादी गोष्टींचा चिमण्यांवर दुष्पपरिणाम होतो. त्यामुळेच चिमण्या वाचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसा निश्चय आजच्या जागतिक चिमणी दिवसाच्या औचित्याने प्रत्येकाने करायला हवा.

गच्ची, बाल्कनीमध्ये चिमण्यांना प्यायला पाणी ठेवणे, शक्य असेल तिथे त्यांना कृत्रिम घरटी ठेवणे, देशी झाडांची कत्तल टाळणे असे काही उपाय सामान्य माणसे नक्की करू शकतात. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनाला थोडा हातभार लागू शकतो.

स्थानिक झाडांची कत्तल, काच आणि अॅल्युमिनियमसारख्या घटकांचा वापर करून बांधलेल्या इमारतींमुळे विणीच्या हंगामात घरटे बांधणे चिमण्यांना अवघड होते. त्यामुळे मुंबई-ठाणे शहरात आढळणाऱ्या हाउस स्पॅरो आणि जंगलात आढळणाऱ्या चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया या चिमण्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. 

साधारण १५ वर्षांपूर्वी मुंबई-ठाणे शहरात कावळे, घार, कबूतर अशा पक्ष्यांमध्ये चिमण्यांची संख्या जास्त होती; मात्र वातावरणातील बदलांमुळे त्यांच्या संख्येत घट झाली आहे. सिमेंटची जंगले, मोबाइल टॉवरच्या लहरी, धूर, प्रदूषित पाणी या सर्वांमुळे चिमण्यांचा कोंडमारा होत असल्याची माहिती पक्षीअभ्यासक प्रथमेश देसाई यांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी इमारतींना काचा लावलेल्या असतात. काचेचा अंदाज न आल्यामुळे बऱ्याच वेळा चिमण्यांसारखे पक्षी आपटून मृत्युमुखी पडतात. पूर्वी घर बांधताना लाकूड आणि कौलांचा उपयोग जास्त केला जाई. अशा घरांच्या खोबणीत चिमण्यांना घरटे बांधणे सोयीचे होते आणि पिल्लांचे संगोपन करणे शक्य होते. परंतु आता घरटे बांधण्यासाठी चिमण्यांना जागा शोधावी लागते आहे. घरटे बांधण्यासाठी काटक्या, गवत मिळणे कठीण झाले आहे. 

पूर्वी घरातील धान्य निवडले जायचे. त्यातून टाकलेले गोटे खाण्यासाठी चिमण्या येत होत्या; मात्र आता मॉल संस्कृतीमुळे धान्य निवडणे कमी झाले आहे. दुसरीकडे स्थानिक झाडांची संख्या कमी होऊन झाडावरील किडे-अळ्या मिळणेही दुरापास्त झाले आहे. 

मुंबई, ठाण्यात दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. शहरात हाउस स्पॅरो आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया ही चिमणी आढळते. रसेट स्पॅरो, युरेशियन ट्री स्पॅरो, सिंध स्पॅरो, स्पॅनिश स्पॅरो अशा सात ते आठ प्रकारच्या चिमण्या भारतात आढळतात. उन्हाळ्यात चिमण्यांचा विणीचा हंगाम असतो. 

रसेट स्पॅरो

सिमेंटच्या जंगलामुळे शहरातील चिमण्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी मुंबई-ठाणे खाडीकिनारी अथवा हरितपट्ट्याच्या ठिकाणी चिमण्यांची चिवचिव ऐकू येते. त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने चिमण्यांचे थवे उडताना दिसून येतात. त्यांना या ठिकाणी पोषक वातावरण असून खाद्यही मुबलक मिळते. विणीच्या हंगामात त्यांना घरटे बांधण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. मुंबईतील काही पक्षिप्रेमींनी चिमण्यांसारख्या लहान पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी ठेवली असल्याचे पक्षीअभ्यासक हिमांशू टेभेकर यांनी सांगितले.

(चिमणी दिनानिमित्त लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search