Next
मोहिनी महाभारताची...
BOI
Wednesday, February 28 | 12:54 PM
15 0 0
Share this story

‘महाभारत’ नाटकातील एक क्षण

पुण्यातील मानाच्या थिएटर फेस्टिव्हलपैकी एक म्हणजेच विनोद दोशी मेमोरियल थिएटर फेस्टिव्हल. या फेस्टिव्हलचे दहावे पर्व १९ ते २३ फेब्रुवारी २०१८दरम्यान झाले. या महोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत महाभारतावर आधारित नाटकांचे सादरीकरण झाले. पारंपरिक पपेट्रीचाही त्यात समावेश होता. त्या दोन दिवसांचा आकाश गुळाणकर यांनी लिहिलेला हा वृत्तांत...

.......
महाभारताने आजवर प्रत्येक कलाकाराला व कलाप्रकाराला मोहिनी घातली आहे. त्यातील विशिष्ट पात्रे, त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीचे असंख्य प्रयत्न, त्यातून येणारी निराशा, सत्तेची हाव अशा अनेक गोष्टी महाभारत पाहणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला अंतर्मुख करतात. आपल्या वैयक्तिक आयुष्याशी सहजतेने जोडता येणारे संदर्भ हा महाभारताचा आणखी एक महत्त्वाचा दुवा होय. त्यामुळेच महाभारत आणि त्यातील पात्रे प्रत्येकाला आपली वाटतात नि त्यातील कथा स्वतःची कथा असल्यासारखी भासते. साहित्य म्हणून हेच त्याचे यश म्हणावे लागेल. दहाव्या विनोद दोशी महोत्सवातील शेवटच्या दोन दिवसांत सादर झालेल्या दोन्ही नाटकांमध्ये महाभारताचा विषय होता; पण तरीही सादरीकरणाच्या पातळीवर दोन्ही नाटके संपूर्ण वेगळी होती. एकामध्ये ययातीची कथा होती, तर दुसऱ्यात भीष्मप्रतिज्ञेपासून ते युद्धापर्यंतचा प्रसंग दाखविण्यात आला.

ययातीदिग्दर्शिका अनुरूपा रॉय यांनादेखील महाभारताने अशीच मोहिनी घातली व त्यातून उभा राहिला तो ‘महाभारत’ हा अनोखा पपेट थिएटर शो! भीष्मांच्या प्रतिज्ञेपासून ते सर्वज्ञ कृष्णाच्या मृत्यूपर्यंतचा महाभारताचा प्रवास विस्मयकारक आहे. त्यातील काही महत्त्वाच्या घटना व प्रसंग पपेटच्या माध्यमातून रंगमंचावर उभे करून कलाकारांनी एक वेगळीच अनुभूती दिली. कर्नाटकातील लेदर पपेट्स बनविण्याची अनेक पिढ्यांची परंपरा असलेल्या एका कलाकाराने व त्यांच्या चमूने ही पपेट्स तयार केली होती. शिवाय, माणसाच्या आकाराची पपेट्स, जपानी बनराकू पद्धतीवरून प्रेरणा घेऊन तयार केली आहेत. जवळपास १२ वर्षांपासून ते यावर काम करत आहेत. पपेट्स बनविणे व तितक्या सहजतेने हाताळण्यास शिकताना आलेल्या अडचणी व त्या कशा सोडविल्या याचे अनुभवकथन टीमने नाटकानंतरच्या चर्चेत केले. कर्नाटकची पारंपरिक ‘टोंगालू गोंबायाटा’ ही शॅडो पपेट्री, बुनराकू या जॅपनीज पपेट्रीवरून प्रेरणा घेतलेली माणसाच्या आकाराची पपेट्स व थिएटर या तिन्ही गोष्टींचे अप्रतिम मिश्रण या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. दोन-तीन कलाप्रकारांना एकत्रित वापरत असताना प्रत्येकाला न्याय देणे किंवा ते चपखल बसविणे हे सर्वांत मोठे आव्हान दिग्दर्शकापुढे असते. ते आव्हान अनुरूपा यांनी लीलया पेलले आहे.

लेदर पपेट्री
कर्नाटकातील एक पारंपरिक कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेदर पपेट्रीला कन्नडमध्ये ‘टोंगालू गोंबायाटा’ असे म्हणतात. हा शॅडो पपेट्री म्हणजेच सावलीचा वापर करून सादर करण्यात येणारा प्रकार आहे. यामध्ये मुख्यतः रामायण, महाभारतातील पात्रे व कथा सादर केल्या जातात. बकरीचे कातडे व पारंपरिक रंगांचा वापर करून ही पपेट्‌स बनविली जातात. पातळ पांढऱ्या पडद्याचा वापर स्क्रीनसारखा करुन त्यावर हा परफॉर्मन्स आपल्याला दिसतो. मागच्या बाजूने लाइट वापरून हा स्क्रीनसारखा इफेक्ट साधला जातो. सहसा संगीतासाठी हार्मोनियमचा वापर केला जातो. शिवाय संगीत नाटकांप्रमाणेच ही पपेट्रीदेखील रात्रभर सादर करण्याची पद्धत पूर्वी होती. काळाच्या ओघात सादरीकरणात तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. बुनराकू या पपेट्रीची मुळे जपानमध्ये सतराव्या शतकात सापडतात.
दिल्लीतील काटकथा पपेट आर्टस् या ग्रुपने हे नाटक सादर केले. अनामिका मिश्रा यांनी या नाटकाचे लेखन केले असून, अनुरुपा रॉय त्याच्या दिग्दर्शिका आहेत. मागील जवळपास नऊ पिढ्यांपासून पपेट्री विषयात काम करणाऱ्या गुंडुराजू यांचेही हे नाटक उभारण्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे चर्चेत नमूद करण्यात आले.

वि. स. खांडेकरांनी आपल्या कादंबरीतून सर्वांपुढे आणलेली ययाती-देवयानीची कथा व गिरीश कार्नाड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून तयार झालेले त्याचे नाटक ही रसिकांसाठी पर्वणीच होती. बेंगळुरू येथील जागृती थिएटर या ग्रुपने महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘ययाती’ हे नाटक सादर केले. अरुंधती राजा यांनी याचे दिग्दर्शन केले होते. १९६० साली वयाच्या तेवीसाव्या वर्षी गिरीश कार्नाड यांनी हे नाटक लिहिले. या नाटकाने त्यांना ओळख मिळवून दिली. वासनेभोवती फिरणाऱ्या या नाटकात चार मुख्य स्त्रीपात्रे आहेत; पण तुलनेने कणखर असलेली ही स्त्री पात्रे कथेचा कणा आहेत. ययातीला असलेली अमरत्व आणि तारुण्याची हाव यात दिसते. एका अर्थी मानवी वृत्तींचे चित्रण यात करण्यात आले आहे. इंग्रजीतून सादर करण्यात आलेले हे नाटक म्हणावे असे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. कलाकार ते नाटक ताकदीने उभे करण्यात काहीसे अपयशी ठरले. एकंदरीत महोत्सवाची सुरुवात उत्तम झाली; पण शेवट प्रेक्षकांसाठी फारसा समाधानकारक झाला नाही.

(या महोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांचा वृत्तांत वाचण्यासाठी  https://goo.gl/vWJ6tk येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
suneela r naphade About 291 Days ago
Khup khup kautuk marathichi pataka us madhye fadakavalyabaddal
0
0

Select Language
Share Link