Next
‘देवस्थानांनी सामाजिक कार्यासाठी पैसा वापरावा’
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this story

ससून सर्वोपचार रुग्णालयाला २६ लाख रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द करताना जयंत नातू व मान्यवर.

पुणे : ‘समाजातील अपकृत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मानसिक दबाव अंतर्मनावर असतो. त्यातून अनेकजण देवस्थानांचे उंबरठे गाठतात. लाखो-करोडोंच्या देणग्या देवस्थानाकडे जमा होतात. या जमा झालेल्या पैशांचा, संपत्तीचा वापर देवस्थानांनी समाजकार्यासाठी करायला हवा. जयंत नातू यांनी वंचितांच्या विकासासाठी आपल्या संपत्तीतला काही भाग दिला, ही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी बाब आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि साहित्यिक अॅड. भास्करराव आव्हाड यांनी केले.

उद्योजक आणि संवेदनशील कार्यकर्ते जयंत नातू व त्यांच्या पत्नी स्वाती नातू यांचा वंचित विकास आणि नातू मित्रपरिवारातर्फे षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त २२ जुलै रोजी नागरी सत्कार करण्यात आला. पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात झालेल्या या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने नातू यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४५ संस्थांना सुमारे एक कोटी रुपयाची देणगी दिली. याप्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर, प्रा. सुहास जोशी, अॅड. पद्मा गोखले यांच्यासह कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते. या वेळी गौरवदीपिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अॅड. आव्हाड म्हणाले, ‘लोक शिक्षित होताहेत; पण शहाणे होणेही गरजेचे आहे. समृद्धता म्हणजे नेमके काय, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. समाज घडविणाऱ्या माणसांकडे पैशांची नेहमीच वानवा असते. त्यामुळे आपल्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा. समाजातल्या वंचित घटकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासह मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वकार्यापलीकडे जाऊन समाजकार्य करण्याची जयंत नातू यांची कृती आदर्श आहे.’

जयंत नातू यांचा सत्कार करताना डावीकडून विलास चाफेकर, अॅड. भास्करराव आव्हाड, जयंत नातू, स्वाती नातू, प्रतापराव पवार व प्रा. सुहास जोशी.

पवार म्हणाले, ‘पुण्यात अनेक संस्था आणि कार्यकर्ते घडतात. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था येथे आहेत. पुण्यातले लोकही आपल्या कुवतीप्रमाणे वेळ, पैसे या स्वरूपात सहकार्य करीत असतात. सामाजिक संस्थांना मिळणारी देणगी ही प्राणवायूसारखी असते. बऱ्याचदा सरकारी मदत मिळते; परंतु ती तितकीशी उपयुक्त ठरत नाही. समाजाच्या साहाय्याने समाजाची सेवा याप्रमाणे काम केले आणि त्याला लोकसहभागाची जोड मिळाली, तर उभारलेल्या कामाला गुणवत्ता प्राप्त होते.’

चाफेकर म्हणाले, ‘प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा मिळवणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या पैशातून सामाजिक कामाला मिळणारी देणगी ही तितकीच पवित्र असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी अनेकजण थेट काम करतात, तर काहीजण पाठीशी राहून बळ देतात. स्वयंसेवी संस्थांनी पैशांबरोबरच कार्यकर्ता उभारण्याचे कामही केले पाहिजे.’

नातू म्हणाले, ‘आजच्या या हृद्य सत्काराने भारावलो आहे. माझ्या आजी-आजोबांकडून प्रेरणा घेऊन मला जे थोडेफार काम करणे शक्य आहे, ते मी करीत आलो आहे. आजच्या या कृतीतून आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रवासात माझ्या कुटुंबीयांची साथ, चांगले मित्र मोलाची आहे. चांगल्या संस्थांना मदत करता आली, याचे समाधान आहे. वंचित विकासने हा कार्यक्रम घडवून आणला, याबद्दल ऋणी आहे.’

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सामाजिक संस्थांच्या वतीने प्रातिनिधिक शुभेच्छा दिल्या. प्रा. सुहास जोशी यांनी प्रास्ताविक केले. मीनाताई कुर्लेकर यांनी ४५ संस्था निवडीमागील निकष आणि संस्थांच्या कार्याची ओघवती ओळख करून दिली. अॅड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मीना मनोहर About 244 Days ago
It's really great for someone to do what he's done. Hats off to him and his family!!
0
0

Select Language
Share Link