Next
आज गोकुळात रंग खेळतो हरी...
BOI
Tuesday, March 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

होळी पौर्णिमा नि धुळवड नुकतीच सरली. आज रंगपंचमी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या कविवर्य सुरेश भटांच्या प्रतिभेतून साकारलेल्या नि लतादीदींच्या गोड स्वरांनी मोहरलेल्या ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी...’ या कवितेचा...
............
आज रंगपंचमी! खरं म्हणजे वसंत पंचमीपासूनच रंगाची मोहिनी मनावर पसरलीय. कोपऱ्यावरचं पिंपळाचं झाड पानगळ सोसत मुकाट उभं असायचं. सारखं लक्ष जायचं त्याच्याकडे. संध्याकाळ झाली की खिडकीतून सूर्यास्ताचे विभ्रम निरखतांना पिंपळाकडे नजर जायचीच. दूरवर क्षितिजावरचा लाल केशरी सूर्याचा गोळा, त्याच्या अवतीभवतीच्या ढगांवर किरणांच्या तेजोमयी कडा उमटलेल्या आणि चित्रात दिसतात तसे घरट्याकडे परतणारे पक्षी! हे सगळं भान हरपून पाहता पाहता उंच उंच इमारतीआड सूर्यबिंब अस्ताला जायचं. त्याला निरोप देणारा माझा हात कितीतरी वेळ तसाच उंच धरलेला असतो. समोरच्या पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांकडे लक्ष जायचं. अनामिक हुरहुर दाटून येत असे; पण आता वसंत पंचमी झाल्यापासून ते झाड तांबूस कोवळ्या पानांनी बहरून आलंय. संध्याकाळची नयनरम्य पश्चिमा पाहताना पिंपळाच्या झाडावर हिरव्यागार राघूंचा थवा झेपावताना दिसला. पिंपळाचंच झाड नाही, तर अवतीभवतीची सगळी झाडं ऋतुराज वसंतवैभवानं बहरलेली दिसताहेत. झाडांवर हिरवे रावे, गडद निळ्या आभाळातून जाणारी शुभ्र बगळ्यांची माळ आणि अस्ताला जाणारा सूर्याचा लाल केशरी गोळा. आणि त्यानंतर अवघा आसमंत झाकोळून टाकणारी, गोरज मुहूर्त साधून येणारी सावळी संध्याकाळ! खरंच सांगते रंगपंचमीची चाहूल वसंत पंचमीपासूनच लागलीय. कानामनात कविवर्य सुरेश भट यांची कविताही ऐकू येऊ लागलीय.

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी

कविराजांच्या शब्दांना सोबत लतादीदींच्या स्वरांची! वसंतवैभवाच्या रंगात भिजलेल्या लावण्यखुणा जपणारी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीतसाज ल्यालेली कवी सुरेश भट यांची ही कविता, आज रंगपंचमीला आठवणार नाही, असं कधी होईल का? रंगपंचमी! तीही गोकुळातली!! एक गोपिका राधिकेला म्हणतेय

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवुनी रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी।
राधिके जरा जपून... 

दोन सख्या, जिवाभावाच्या या मैत्रिणी, रंगबावरी गोपिका आणि राधिका! कृष्णसख्याच्या खोड्या, त्याचा खट्याळपणा अवघ्या गोकुळाला माहीत आणि आज तर रंगपंचमी! त्याच्या खोड्यांविषयी तक्रार तरी कशी करणार यशोदामाईकडे? मैत्रीच्या, प्रीतीच्या आणि भक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा आजचा दिवस रंगपंचमी! गवळणींची वाट अडवायची, त्यांच्या डोईवरचा माठ फोडायचा, दही-दूध लुटायचं आणि सवंगड्यांना वाटायचं. हा तर दररोजचाच खेळ; पण आज मात्र रंगांची उधळण, गुलालाची लयलूट आणि रासक्रीडेची बेहोषी जणू सावळ्या श्रीहरीसह अवघं गोकुळ अनुभवतंय. त्याला गोपिका अपवाद कशा असणार? कृष्णरंगात न्हालेली गोपिका राधिकेला कशी विनवतेय बघा, ‘अगं आज त्या घन:श्यामाला, श्यामसुंदराला काय झालंय कुणास ठाउक? प्रत्येकीच्या अंगावर रंग टाकल्याविना तो सोडतच नाही. ज्याला त्याला तो रंग, रंग आणि रंगच लावत सुटलाय. मग मला सांग राधिके, तू एकटी कशी वाचणार? त्या नटखट कान्हाच्या तावडीत सापडणारच! म्हणून तुला सांगते जरा जपून जा तुझ्या घरी.’ कवी सुरेश भट यांनी आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेनं उभी केलेली ही गोकुळातली रंगपंचमी जो कोणी अनुभवतो तो खऱ्या अर्थानं रंगपंचमी खेळतो. साऱ्याच गोपिका कृष्णरंगात चिंब भिजल्या आहेत. राधिकेला शोधत कृष्णकन्हैया येणारच आणि मग... गोपिकेच्या मनातले तरंग कवीचं अंतरंग व्यापून टाकतात. सुरेश भट यांच्या कवितेबद्दल, अर्थात जी कविता स्वरांनी मोहरलीय त्या कवितेबद्दल पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते.’ खरंच ‘पुलं’ जे म्हणतात त्याची प्रचिती सुरेश भट यांच्या कितीतरी कवितांमधून आपल्याला येते. याचं हे एक उदाहरण नव्हे का? शब्द-सुरांनी सोबत चालावं आणि ही सोबतच अवघं गाणं व्हावं.

सांग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी?
राधिके जरा जपून...

होळी, रंगपंचमीचा रंग खेळताना जसा गोकुळातला कृष्णकन्हैया आठवतो, गोप-गोपिका आणि कृष्णमय झालेली राधिका आठवते, तसंच हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेलं गीत आठवतं. महाराष्ट्रातील प्रत्येक आकाशवाणी केंद्रावरून रंगपंचमीला ‘रंग खेळतो हरी’ हे गीत हमखास प्रसारित होतच असतं किंवा श्रोते या गाण्याची फर्माईश करतातच. वर्षानुवर्षे हा रंगपंचमीचा सण असा साजरा होतो. 

अवतीभवती गुलालाने, रंगाने माखलेले चेहरे दिसतात. या सणाच्या निमित्ताने वेगवेगळा प्रादेशिकतेचा रंग पहायला मिळतो. गोव्यातल्या, कोकणातल्या, कर्नाटकातल्या लाल मातीचा रंग, विदर्भ-खानदेशच्या मातीचा रंग, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीचा रंग, सगळे रंग एकमेकांमध्ये इतके बेमालूम मिसळावेत, की रंगपंचमीच्या आनंदाचा रंग अधिकच गडद होत जावा असं वाटतं. रंगपंचमी म्हणजे तरी काय हो? तन-मनाने रंगून जावं. हे रंग मैत्रीचे, प्रीतीचे, भक्तीचे, मानवतेचे आणि मुख्य म्हणजे पर्यावरणप्रेमाचे असावेत, जेणेकरून सणाचा उत्साह द्विगुणित होत राहणार. रंगपंचमीचं प्रतीक आपल्या संवेदनशील मनात जपता जपता कविवर्य सुरेश भट यांची ही कविता मनात फेर धरून राहतेच. 

रंगपंचमी! राधा-कृष्णाचा सनातन खेळ. उत्सव! भक्तीचा, प्रीतीचा उत्सव! कृष्ण म्हणजे मैत्रीचा, स्नेहाचा अखंड झरा! आणि राधा? शब्द उलटे करून बघितले तर भक्तीची, शुद्ध प्रीतीची निर्मळ धारा!! धारा-राधा, शब्दांशी खेळता खेळता आपल्याला दाखवते विषयवासनेच्याही पलीकडचा किनारा. त्या किनाऱ्यावर प्रापंचिक संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती नसते. तिथे असते फक्त एक समंजस साथ. निष्कलंक, निरागस सोबत. राधा-कृष्ण समजून घेण्यासाठी कित्येक कवींनी वागीश्वरीची आराधना केली. राधा-कृष्णाच्या कवितेला स्वरांमध्ये बांधण्यासाठी साक्षात सरस्वतीच्या वीणेचा झंकार कानामनात साठवून घेत आयुष्य वेचलं. कृष्णकन्हैयाच्या बासरीचे स्वर दिव्य कल्पनाशक्तीने काळजातून ऐकले. कविवर्य सुरेश भट, लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या थोर व्यक्तींना परमेश्वरी आशीर्वाद लाभला आणि आनंदाचा रंग घेऊन असं गाणं जन्माला आलं. खऱ्या अर्थानं रंगपंचमी साजरी झाली. ऋतुराज वसंतवैभवानं मोहरलेली रंगपंचमीची कविता आणि गोपगोपिकांसवे रंग खेळण्यात दंग झालेल्या कृष्णाची बासरी म्हणजे लतादीदी! दीदींच्या सुमधुर स्वररंगात चिंब झालेली ही गीतरचना आज ऐकताना साक्षात रंगपंचमीही मोहरलीय ना? अहाहा! ऐका तर ही बासरी आणि सुरेश भटांची काव्यकिमया!!

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिऱ्यात वाजला
हाय! वाजली फिरुन तीच बासरी...
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search