Next
नृत्यविषयक ‘संचारी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात १६ व १७ फेब्रुवारी रोजी होणार महोत्सव
BOI
Monday, February 11, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : नृत्यविषयक चित्रपट, लघुपट, माहितीपट यासह या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येत्या शनिवारी,१६ फेब्रुवारी व रविवारी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘लाउड अॅपलॉज डान्स मॅगझिन’ प्रस्तुत ‘संचारी’ या दोन दिवसीय नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाचे. 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व प्राजक्ता परांजपे यांच्या विशेष सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सकाळी दहा वाजल्यापासून हा महोत्सव होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला  आहे. महोत्सवासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

या महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना कथक नृत्यांगना आणि लाउड अॅॅपलॉज डान्स मॅगझिनच्या नेहा मुथियान म्हणाल्या, ‘नृत्याचा अविष्कार, तर आपण अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनुभवत असतो;मात्र हे होत असताना नृत्याचे अनेकविध पैलू उलगडून दाखविणारे नृत्यविषयक चित्रपट, माहितीपट यांची नवीन येणाऱ्या कलाकारांच्या पिढीला आणि रसिकांना माहिती व्हावी, त्यांच्यापर्यंत हे चित्रपट पोहोचावेत या उद्देशाने नृत्यविषयक चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन आम्ही गेली दोन वर्षे करीत आहोत.’

अरुंधती पटवर्धन
‘केवळ नृत्य शिकणारेच नाही, तर चित्रपट दिग्दर्शन आणि त्या संबंधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून फायदा होईल,’ असे या वेळी भरतनाट्यम् नृत्यांगना आणि ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी आवर्जून नमूद केले. 

‘या महोत्सवामध्ये नृत्यविषयक चित्रपट, लघुपट, माहितीपट यासह नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर व्यक्तींची भाषणे ऐकण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील उपस्थितांना मिळणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी,१६ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सकाळी दहा वाजता अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, प्रसिद्ध दिग्दर्शिका व मोहिनीअट्टम् नृत्यांगना मेथिल देविका आणि प्रसिद्ध नृत्य समीक्षक सुनील कोठारी आदी मान्यवर उपस्थित असतील. त्यानंतर ऑस्करच्या यादीत प्रवेश मिळविलेला, राजेश कदंबा आणि मेथिल देविका दिग्दर्शित ‘सर्पतत्वम्’ हा चित्रपट दाखविला जाईल. त्यानंतर डॉ. सुचेता भिडे-चापेकर या मेथिल देविका यांच्याशी संवाद साधतील.

या संवादानंतर ‘अनसीन सिक्वेन्सेस’ हा लघुपट दाखविण्यात येईल. सुमंत्रा घोसाल यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला असून, यासाठी मालविका सरुक्काई यांनी नृत्य व नृत्यदिग्दर्शन केले आहे. यानंतर ‘नीलिमा’ हा नृत्य चित्रपट दाखविला जाईल. व्ही. माधवन नायर यांच्या एका कवितेवर हा चित्रपट आधारलेला असून, एका नृत्य कलाकाराची कथा यामध्ये दाखविण्यात आली आहे. ऐश्वर्या वॉरिअर यांची ही संकल्पना असून, त्यांनीच त्याचे दिग्दर्शनदेखील केले आहे. या चित्रपटानंतर डॉ. सुचेता भिडे-चापेकर या ऐश्वर्या वॉरिअर यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर ‘नवरंग’ या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

सुकन्या कुलकर्णी-मोने
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी दहा वाजता ‘वैखरी’ या चित्रपटाने होईल. लुब्धक चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट असून, यासाठी गुरु पार्वती दत्ता यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि नृत्यात वापरल्या जाणाऱ्या आणि एक महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पढंत’वर हा चित्रपट केंद्रित आहे. या चित्रपटानंतर नेहा मुथियान या लुब्धक चॅटर्जी यांच्याशी संवाद साधतील.

त्यानंतर ‘नटले तुमच्यासाठी- बिहाईंड अॅडॉन्ड व्हेल’ हा सावित्री मेधातुल दिग्दर्शित चित्रपट दाखविण्यात येईल. लावणी कलाकारांचा संघर्ष, त्यांच्या व्यथा, त्यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. यानंतर प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक मृणालिनी साराभाई यांच्यावरील ‘मृणालिनी साराभाई’ हा माहितीपट दाखविण्यात येईल. यानंतर प्रसिद्ध नृत्य समीक्षक सुनील कोठारी यांच्याशी संवादात्मक कार्यक्रम पार पडेल. 

यानंतर सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला भरतनाट्यम् कलाकार बालासरस्वती यांच्यावरील ‘बाला’ हा प्रसिद्ध चित्रपट दाखविण्यात येईल. यानंतर ‘बॅटरी डान्स कंपनी’ या नृत्य समूहाच्या प्रवासाचे चित्रण असलेल्या ‘मूव्हिंग स्टोरीज’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. अनेक महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, रॉब फ्रूचमन, कोर्नीलीया रॅवेनल, मायकल सोडेर्स्टन आणि व्हेंडी सॅक्स यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
नृत्यविषयक चित्रपट महोत्सव 
स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय. 
दिवस : शनिवार,१६ व रविवार,१७ फेब्रुवारी.   
  वेळ : सकाळी दहा वाजता 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link