Next
किल्ले आणि दिवाळी
मोहन काळे
Sunday, October 15 | 09:45 AM
15 0 0
Share this story

पंढरपूर : दिवाळी देशभरात सर्वत्र साजरी होते. त्यातही महाराष्ट्राच्या दिवाळीचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दिवाळीशी असलेला किल्ल्यांचा संबंध! महाराष्ट्रात किल्ल्यांचं आणि दिवाळीचं एक अतूट नातं आहे. किल्ला म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हणजेच किल्ला असे जणू समीकरणच तयार झाले आहे.

दिवाळीची चाहूल लागताच घराघरांतून लहान मुले, शाळकरी मुले व जाणत्या माणसांचीही गड-किल्ले बनवण्यासाठी लगबग सुरू होते. किल्ला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव ही मंडळी अगदी उत्साहाने करत असतात. प्रत्येकाच्या अंगणात किल्ला तयार करण्यासाठी बाळगोपाळांचा मेळा जमत असतो. लहान वयातच गड-किल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित व्हावा म्हणून घरातील जाणती मंडळी मावळे विकत आणून, आपल्या मुलांचा हट्ट पुरवत असतात.

यंदा राज्यात झालेला पाऊस आणि दिवाळीचा सण यामुळे बाजारातील उलाढाल वाढली आहे. साहजिकच यंदाच्या दिवाळीत बच्चेकंपनी किल्ला बनविण्याचा आनंद नक्कीच मनसोक्त घेणार. नेमके हेच हेरून, यंदा कलाकार इतिहासकालीन वस्तूंच्या प्रतिकृती दरवर्षीपेक्षा अधिक बनवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, अफजलखान, गड चढणारे मावळे, लढाई करणारे मावळे, नृत्यांगना, तोफा व दारूगोळा आदींबरोबरच उंट, घोडे व हत्ती, किल्याच्या पायथ्याचे गाव, किल्ला व गावातील भाजी मंडई साकारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू हे कलाकार बनवू लागले आहेत.

पूर्वीचे कलाकार साचा न वापरता या मूर्ती बनवत होते. अलीकडच्या काळात कलाकार साचा वापरून काही मिनिटांच्या अवधीत हवी ती मूर्ती तयार करू लागले आहेत. या मूर्तींना मशीनच्या साह्याने रंग दिला जात असल्याने, हे कामही अल्पावधीतच होत आहे. कोरीव कामाला मात्र काही वेळ द्यावा लागतो.

ग्रामीण भागातील कलाकार मात्र मोठी भांडवली गुंतवणूक शक्य नसल्याने हातानेच रंगकाम करतात. अर्थात त्याचीही काही वैशिष्ट्ये असतात. पंढरपूर तालुक्यातील विसावा येथील कुंभारवाड्यात फेरफटका मारला असता, लक्ष्मण जगन्नाथ कुंभार, त्यांची पत्नी छाया, मुलगी प्रिया आणि मुलगा अर्जुन या सगळ्या परिवारासह या कामात व्यग्र असल्याचे पाहायला मिळाले.

‘पूर्वी आम्ही मावळ्यांना रंग देताना डिंकाचा वापर करत होतो. अलीकडे आलेल्या आकर्षक रंगांमुळे डिंकाचा वापर करावा लागत नाही,’ असे लक्ष्मण यांनी सांगितले. ‘मावळे किंवा इतर मूर्तींना हाताने रंग देत असल्यामुळे त्या वस्तू फारच उठावदार दिसतात. त्यामुळे अशा मालाला बाजारात चांगला भाव मिळतो,’ असे छाया यांनी सांगितले.

एकंदरीत दिवाळीचा बच्चेकंपनीचा आनंद द्विगुणित होण्यासाठीच या कलाकारांची धावपळ सुरू असते.

(शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या मूर्ती तयार होत असतानाचा आणि त्यांच्या रंगकामाचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link