Next
रक्षणकर्त्यांशी स्नेहबंध जोडणारा धागा
जवानांना राख्या पाठवण्याचा पुण्यातील एकबोटे दाम्पत्याचा उपक्रम
प्राची गावस्कर
Saturday, August 25, 2018 | 05:34 PM
15 1 0
Share this story

पुणे : हजारो मैलांचे अंतर पार करून दूरच्या दुर्गम प्रदेशात एक धागा पोहोचतो आणि दोन अनामिक व्यक्तींमध्ये निर्माण होते स्नेहाचे, विश्वासाचे अतूट बंधन. हे असते राखीचे बंधन. देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत घरदार विसरून प्राणाची बाजी लावणाऱ्या त्या अनाम जवानासाठी कोणीतरी आठवणीने, प्रेमाने राखी पाठवलेली असते, प्रेमाचे चार शब्द लिहिलेले असतात. ते बघून एरव्ही आपल्या मायभूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूचा कर्दनकाळ असलेला रांगडा गडी हळवा, भावूक होतो, नवी ऊर्मी घेऊन आनंदाने नाचतो, गातो. आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर लढत असलेल्या जवानांना तर या राखीचे अप्रूप असते. म्हणूनच अगदी आतुरतेने ते या सणाची वाट पाहत असतात. जवानांबद्दल आपला आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य जनताही आतुर असते; पण आपली भावना कशी व्यक्त करावी, हे त्यांना माहीत नसते; पण राखीच्या प्रेमळ धाग्याने हे भावबंध जुळवण्याची संधी दिली आहे. हा बंध जुळवण्यासाठी जवान आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा बनले आहेत, पुण्यातील डॉ. नंदकिशोर एकबोटे. 

शालेय विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक अशा ज्यांना ज्यांना भारतीय जवानांना राखी पाठवायची आहे, त्यांच्याकडून राख्या घेऊन त्या जवानांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुण्यातील डॉ. नंदकिशोर एकबोटे आणि त्यांच्या पत्नी समृद्धी एकबोटे गेली सात-आठ वर्षे करत आहेत. यंदा त्यांनी तब्बल १४ हजार राख्या २९ रेजिमेंट्सना पाठवल्या आहेत. त्यापैकी पाच हजार राख्या शाळेतील मुलींनी पाठवल्या आहेत, तर उर्वरित राख्या जवानांचे नातेवाइक, मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिक यांनी पाठवल्या आहेत. 

रक्षाबंधनाच्या एक महिना आधीपासूनच त्यांचे काम सुरू होते. शालेय विद्यार्थिनी, नातेवाइक, मित्रपरिवार यांना राख्या बनवण्यास सांगणे, त्या तयार झाल्यावर जमा करणे, त्या व्यवस्थित पॅक करणे आणि योग्य तो पत्ता घालून पोस्टात पोहोचविणे, अशी कामगिरी असते. एका बॉक्समध्ये साधारण ५०० राख्या पाठवल्या जातात. यासाठी येणारा पोस्टाचा सात ते आठ हजार रुपयांचा खर्चही डॉ. एकबोटे स्वतःच करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते फक्त राख्या पाठवत नाहीत, तर त्यासोबत एक पत्रही पाठवतात. राख्या देणारी माणसे स्वतः पत्र लिहून देतात. राखी सोबत आलेले पत्र वाचून जवानांना जास्त आनंद होतो. ते पत्र ज्यांनी लिहिलेय त्यांना किंवा डॉ. एकबोटे यांना आवर्जून पत्र लिहून ते आपला आनंद व्यक्त करतात. अनेकदा लष्करी ठाण्याच्या ठिकाणी सामूहिकरीत्या राखी बांधण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर जवान राखी बांधल्याची माहिती फोन करून किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देतात. याबाबत एक आठवण डॉ. एकबोटे यांनी सांगितली. एका जवानाने राखी पोहोचल्यावर त्यांना फोन केला आणि सांगितले, ‘कुणीतरी एक भारतीय आपली आठवण काढतोय, हेच आमच्यासाठी खूप आहे.’ हे वाक्य कायम स्मरणात राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. नंदकिशोर एकबोटे व समृद्धी एकबोटे
यामुळे जवान आणि सर्वसामान्य नागरिक यांचे वैयक्तिक भावबंधही जुळले आहेत. राखीचे नाते त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही कायम राखले आहे. यामुळे अनेकांना बहीण मिळाल्याचा आणि अनेक बहिणींना भाऊ मिळाल्याचा आनंद लाभला आहे. विशेष म्हणजे, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरदेखील काही जवान, अधिकारी राखी पाठवायला सांगतात. ते आसेतुहिमाचल कुठेही असले, तरी त्यांना राखी पाठवली जाते. राखी मिळाल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दांत सांगता येणे कठीण आहे. 

या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, याबद्दल विचारले असता, डॉ. एकबोटे म्हणाले, ‘कारगिल युद्धानंतर मी प्रत्यक्ष युद्धभूमीवर भेट देण्यास गेलो होतो. तिथे कारगिल स्मारकामध्ये हुतात्मा जवान सौरव कालिया याच्या अस्थी आणि वैद्यकीय अहवाल ठेवला आहे. पाकिस्तानी सैन्याने अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर अनन्वित शारीरिक हाल करून त्याचा जीव घेतला. ते वाचून जीव हळहळला. आपल्यासाठी इतके हाल सोसणाऱ्या, जिवाची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी आपण काय करतो, काय करू शकतो याचा विचार करू लागलो. त्या वेळी तिथे असणाऱ्या सुभेदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी सुचवले, ‘तुम्ही राख्या पाठवू शकत असाल, तर बघा, त्यामुळे सैनिकांना खूप आनंद होतो.’ याच विचाराने झपाटून परत पुण्यात आलो, लवकरच रक्षाबंधन होते. मग काय ‘शुभस्य शीघ्रम!’ माझी पत्नी समृद्धी हिलाही ही कल्पना आवडली. तिनेही यात मदत करण्याची तयारी दाखवली. मग आम्ही काही शाळांना भेटी देऊन मुलांना ही कल्पना सांगितली. जवळचे नातेवाइक, मित्रपरिवार यांनाही सांगितले. शाळेतल्या मुलांनी खूप उत्साहाने राख्या करून पाठवल्या. पहिल्या वर्षी साधारण पाचशे ते सहाशे राख्या जमल्या. मग संबंधित लष्करी विभागाशी संपर्क करून सर्व आवश्यक त्या परवानग्या, नियम यांची माहिती करून घेऊन त्या राख्या आणि त्याबरोबर एक पत्र पाठवून दिले. तेव्हापासून हे काम सुरूच झाले. घेतला वसा टाकायचा नाही, असा आमचा पणच आहे. त्यामुळे दर वर्षी जितक्या जास्तीत जास्त राख्या पाठवता येतील, तितक्या आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो. लोकांचाही प्रतिसाद वाढतच गेला. लोकांनी स्वतः लिहिलेली पत्रे, त्यांचे नाव, फोन नंबरसह आम्ही पाठवतो. त्यामुळे त्या लोकांशी जवान स्वतः संपर्क साधतात. त्यामुळे आपण दिलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचतात असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे दर वर्षी राख्यांची संख्या वाढत गेली आणि वाढतेच आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येक जवानाला राखी मिळाली पाहिजे असे मला वाटते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या सगळ्या कामात टपाल खात्याची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. अगदी वेळेत राख्या पोहोचाव्यात यासाठी ते आम्हाला खूप सहकार्य करतात. त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.’ 

याशिवाय औंधमधील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात जाऊन त्यांना राखी बांधण्याचा उपक्रमही डॉ. एकबोटे राबवतात. येथील सैनिकांना काम मिळावे यासाठी त्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करणे, सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करणे असे उपक्रमही ते राबवतात. याशिवाय भारतीय जवानांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना विजयश्री मिळावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्याचा उपक्रमही ते घेतात. या उपक्रमाचा प्रसार व्हावा, लोकांनी स्वयंप्रेरणेने यात सहभागी व्हावे, अशा प्रार्थना कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. याशिवाय, जवानांच्या शौर्यकथा पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्यालाही यश आले आहे. अनेकविध पद्धतीने ते जवानांसाठी कार्य करत आहेत. जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते; पण ते कसे करावे याचा मार्ग माहीत नसतो. तो मार्ग डॉ. एकबोटे यांनी दाखवला आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तो असाच वाढो, या शुभेच्छा!

संपर्क : डॉ. नंदकिशोर एकबोटे - ९९२२० ०७३३०

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dhanashree Kulkarni About 141 Days ago
Speechlesss . 👏🏼👏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳
0
0
Amit Suresh Salunke About 179 Days ago
Nice Article & Nation First
0
0
Maneesha Lele About 180 Days ago
BOI 👍 preranadayi vartankan!
0
0
Prasad Balkrishna Ekbote About 182 Days ago
Such an wonderful event done by shri and sou Nandkishore ekbote. It should be really influence us about Indian army. Simply great work.
0
0

Select Language
Share Link