Next
‘मनातील पणती तेवत ठेवायला हवी’
प्राची गावस्कर
Monday, November 05, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

फास्टर फेणे, वाय झेड, क्लासमेट्स, लग्न पहावे करून, अशा गाजलेल्या चित्रपटांचे कथालेखक, तसेच नवा गडी नवे राज्य, दोन स्पेशल यांसारख्या नाटकांचे लेखक म्हणून क्षितिज पटवर्धन आपल्याला माहिती आहेत. त्यांची या यशापर्यंतची वाटचाल संघर्षमयच असली, तरी सकारात्मक विचारसरणीमुळे ती खंबीरपणे करणे त्यांना शक्य झाले. ‘स्वतःशी प्रमाणिक राहून एखादी गोष्ट सकारात्मकतेने करायचे ठरवले असेल, तर तीच सकारात्मकता मार्गदर्शन करील. अंधारातून वाटचाल करताना ही मनातली पणती मार्ग दाखवील. ती आपण तेवत ठेवायला हवी,’ असे ते सांगतात. सकारात्मकतेबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेऊ या ‘बी पॉझिटिव्ह’ या सदरात...
...........

- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कोणता?
- माझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा पहिला स्रोत माझे आई-वडील आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला असल्याने परिस्थितीशी हातमिळवणी करताना कसे जगायला हवे, रोजच्या संघर्षाला कसे तोंड द्यायचे याचे प्राथमिक धडे आई-वडिलांनीच दिले. कुठल्याही गोष्टीवर निराश न होता, कोणत्याही नकारात्मक गोष्टीला सकारात्मक पद्धतीने उत्तर देता आले, तर आयुष्यात त्याचा खूप फायदा होतो. त्यातूनच मूलभूत दृष्टिकोन सकारात्मक होतो. हे बाळकडू आई-वडिलांकडून मिळाले.

- तुमची या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय? लेखनाची प्रेरणा कशातून मिळते?
- आजूबाजूला जे पाहत होतो, त्यातील काही गोष्टी मनावर उमटत होत्या. अस्वस्थता येत होती. हे कुठेतरी व्यक्त करायचे होते. मला वाटले, की ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी शब्द हे माझे माध्यम आहेत. त्यातून शाळेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो. लिखाणाची आवड विकसित झाली. त्याआधी वाचनाची आवड विकसित झाली. मग कुतूहल वाढत गेले. एखादी कविता, कथा, नाटक असे चांगले साहित्य कसे सुचले असेल, लिहिले असेल, असे प्रश्न माझ्या मनात येतात. एखादा सिनेमा बघितला, की तो कसा तयार केले असेल, याचे विचार माझ्या मनात येतात. निर्मितीप्रक्रियेबद्दलचे कुतूहल अजूनही मला मोह घालते. ती जाणून घेऊन मी माझ्या पद्धतीने काम करतो. 

- आयुष्यातील अशी एखादी परिस्थिती सांगता येईल का, की ज्यातून सकारात्मकतेमुळे बाहेर पडणे शक्य झाले?
- अशी परिस्थिती खूप वेळा आली. मी संगणकशास्त्राचा अभ्यास म्हणजे बीसीए करत होतो. त्याच वेळी नाटकाकडे पूर्ण वेळ लक्ष दिल्याने, आठ विषयांत नापास झालो होतो. माझा मित्रही लंडनला निघून गेला होता. अगदी एकटा होतो. योग्य क्षेत्रात आलोय ना, हे आपले क्षेत्र आहे ना, यापैकी काहीच कळत नव्हते; पण समोर दोनच पर्याय होते. एक तर हरून बाहेर पडायचे किंवा लढायचे आणि यशस्वी होऊन बाहेर पडायचे. हा निर्णय मलाच घ्यायचा होता. मी लढण्याचा निर्णय घेतला. तरीही पुन्हा काही विषय राहिले; पण एक लक्षात आले, की आपणच आपला आधार होऊ शकतो. त्यातूनच सकारात्मकतेकडे वाटचाल सुरू झाली. हा संघर्ष आयुष्याचा भाग आहे, हे लक्षात आले. पहिला क्रमांक आला असता, तरी हे शिकायला मिळाले नसते. कुठलेही शिक्षण वाया जात नाही, यावर विश्वास बसला. वेगळे मित्र, शिक्षक मिळाले. त्यातून काहीतरी वेगळे उभे राहिले. गेल्याच वर्षी त्याच कॉलेजच्या संगणकविज्ञान विभागाच्या उद्घाटनाला मला बोलावण्यात आले होते. तेव्हा, एक वर्तुळ पूर्ण झाले, असे मला वाटले. 

- निराशा येते तेव्हा काय करता?
- निराशा हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. अनेकांना वाटते, की हा यशस्वी आहे, याला कसली निराशा? पण तसे नसते. एका घडणाऱ्या सिनेमामागे तीन न घडणारे सिनेमे असतात. कधी कधी काहीच सुचत नाही, ज्याला ‘रायटर्स ब्लॉक’ म्हणतात, तो येतो. एकाच वेळी मी वेगवेगळ्या वर्तुळांत वावरत असतो. मी आणि माझे भावविश्व, मी आणि माझे कुटुंब, व्यावसायिक वर्तुळ, सामाजिक वातावरण अशा सगळ्या वर्तुळांतील स्पर्धेला तोंड द्यायचे असते आणि त्यातही मीपणा जपायचा असतो. काहीतरी नवीन घडवायचे असते. अशा वेळी आपल्या मनाप्रमाणे घडले नाही, तर त्वरित निराशा येऊ शकते. असे अनेक दिवस, रात्री मी काढल्या आहेत, जिथे काळाकुट्ट अंधार होता. आयुष्यात काय होणार आहे माहीत नव्हते; पण तो अंधार आवश्यक असतो. त्यात तुम्ही स्वतःला शोधता. ज्या प्रकारे तुम्ही त्या अंधारातून बाहेर येता, त्यातून खूप काही शिकता येते. मग त्याला जग खुले होते. अशा निराशेच्या प्रसंगांकडे मी शिकण्याची संधी म्हणून बघितले. अंधार आहे, त्याअर्थी उजेड आहे. त्याकडे आपण जावे असे मला वाटते. 


- तुमच्या कार्यक्षेत्राचे सकारात्मकतेत असलेले स्थान काय? 
- माझ्या सकारात्मकतेत माझ्या लेखनाचे प्रचंड योगदान आहे. माझ्या आयुष्यात सिनेमा नसता, तर मी एवढा सकारात्मक नसतो. पुस्तकाच्या विश्वात आपण जसे रमतो, तसे सिनेमाचे असते. ‘श्वाशांक रीडम्पशन’सारख्या सिनेमातून इतकी सकारात्मक ऊर्जा मिळते, की आपणही प्रेरित होतो. कथा, कविता, सिनेमा या सगळ्याचेच सकारात्मक राहण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. 

- सकारात्मक, आनंदी राहण्यासाठी लोकांना काय सांगाल?
- लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष करा. लोक सतत काहीतरी बोलत असतातच. त्यांना पन्नास गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही स्वतःशी प्रमाणिक असाल आणि एखादी गोष्ट सकारात्मक पद्धतीने करायचे ठरवले असेल, तर तीच सकारात्मकता तुम्हाला मार्गदर्शन करील. अंधारातून वाटचाल करताना ही तुमच्या मनातली पणती मार्ग दाखवील. अनेक नवीन वाटा मिळतील. आपल्यातला तो दिवा तेवत ठेवणे हे आपले काम आहे. 

- तुमचे आवडते लेखक कोण आहेत?
- आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लेख, कथा, कविता यातून अनेकांनी खूप काही शिकवले. ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकामध्ये इन्सी हेडल कथा लिहितात. छोट्या असतात; पण खूप सुंदर असतात. शाळेत असताना संतोष शिंत्रे यांच्या कथा वाचायचो. त्यामुळे कथा वाचायची आवड निर्माण झाली. त्यांनतर हळूहळू अनंत काणेकर, व. पु. काळे, दि. बा. मोकाशी, पु. ल. देशपांडे, विद्याधर पुंडलिक अशा अनेक लेखकांचे लेखन वाचत गेलो. वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके वाचली. या सगळ्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवी अनुभूती देणारे लेखन केले आहे. जसे सिंहगडावरील देवटाक्यातील पाणी पूर्वापार तिथेच आहे; पण आपण नव्याने गेलो की ते पाणी पिऊन नवीन तजेला मिळतो. तसे या लेखकांचे आहे. प्रत्येक वेळी नवी ऊर्जा, अनुभूती मिळते. अजून कितीतरी लेखक वाचायचे आहेत. सध्या मोबाइल आणि इतर कामांमुळे वाचन कमी झाले आहे; पण आता पुन्हा जोमाने वाचन करायचे ठरवले आहे. पूर्वी दिवसाला तीनशे ते चारशे पाने वाचायचो आता ते प्रमाण तीस ते चाळीस पानांवर आले आहे. ते पुन्हा वाढवायचे आहे. नवीन वाचायचे आहे. 


- आगामी नियोजन काय आहे?
- दर्या ही ‘इलस्ट्रेटिव्ह नॉव्हेल’ मी प्रकाशित केले. ते प्रकाशक म्हणून माझे पहिले पुस्तक होते. आता लेखक म्हणून माझे पुस्तक आणायचे आहे. गेली चार-पाच वर्षे एका कादंबरीवर काम करत आहे. ती पूर्ण करायची आहे. सहा-सात सिनेमे, एक-दोन नाटकांचे विषय डोक्यात आहेत. ‘माऊली’ हा माझा नवीन सिनेमा येतो आहे. एक हिंदी सिनेमाही लिहितो आहे. ‘फास्टर फेणे’चा पुढचा भाग येणार का, याचीही उत्सुकता आहे. त्यावरही काही चर्चा सुरू आहे. दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. बघू या, काय काय शक्य होते ते!

(दर्या हे ‘इलस्ट्रेटिव्ह नॉव्हेल’ बुकगंगा डॉट कॉमवर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही आवृत्तीत उपलब्ध आहे. ते घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. यांच्या क्षितिज पटवर्धन मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search