Next
सैन्यात कोकणातील मुले वाढायला हवीत
वीरमाता अनुराधा गोरे यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, October 11, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘कोकणातील मुलांना सैन्यात भरती होणे कठीण नाही. कारण ती काटक, कष्टाळू, प्रामाणिक आहेत. त्यांच्यात टिकून राहण्याची क्षमता आहे. फक्त ध्येयासक्तीची कमतरता असल्याने कोकणातील हा टक्का कमी आहे. तो वाढवायला हवा,’ असे प्रतिपादन वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले.

जेएसडब्ल्यू जयगड पोर्टतर्फे ‘भारतीय लष्कर हे एक उज्ज्वल भविष्य’ या विषयावर चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मार्गदर्शन करण्याकरीता वीरमाता अनुराधा गोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

‘सामान्यज्ञानाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. याच्या बळावर तुम्ही कोणतीही स्पर्धापरीक्षा देऊ शकता. ज्यांना इतिहास माहीत नाही, त्या देशाचा भूगोल बदलतो. ज्यांना भूगोल माहीत नसतो, ते इतिहास घडवू शकत नाहीत,’ असे गोरे म्हणाल्या.

घुसखोरी, दहशतवाद रोखण्यासाठी लष्कराने ऑपरेशन रक्षक हाती घेतले होते. त्या वेळी कारगिलमध्ये गोरे यांचा एकुलता एक मुलगा कॅ. विनायक याला वीरगती प्राप्त झाली. ‘तुमच्या उद्यासाठी आमचा आज दिला’ असे म्हणणारे अनेक विनायक आज समाजात घडवीन, ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. या वीरमातेने मार्गदर्शन करताना अंगावर काटे उभे राहतील अशी उदाहरणे दिली. ‘सैन्यात वायुदल, नौदल, भूदलात भरती होण्यासाठी अनेक मार्ग मोकळे आहेत. मुलांनाच नाही, तर मुलींनाही विज्ञान घेऊन बारावी केल्यास एकही पैसा खर्च न करता पुण्यात नर्सिंग कॉलेजमध्ये शिकून बॅचवाला अधिकारी होता येते. फायटिंग फोर्सशिवाय डॉक्टर, नर्स, आर्मी पोलीस, इंटेलिजन्स, रडार, मेंटेनन्स, तोफा आणि रणगाडे चालवणारे, कँटीन चालवणारे, शिवाय शिंपी, धोबी, इस्त्रीवाला व पुजारीही सैन्यात असतात. आर्मीची जात-जमात, धर्म एकच असते. ते एकाच गोष्टीची सेवा करतात ती म्हणजे भारतमाता,’ असे गोरे म्हणाल्या.

जिंदाल कंपनीच्या लेडीज क्लबतर्फे लावण्या चंदेर म्हणाल्या, ‘मीही भारतीय नौदल पार्श्वभूमीशी संबंधित आहे. लष्करातील माणसांकडे शिस्त आणि प्रोफेशन या गोष्टी असतात. याच गोष्टी घरातल्या सगळ्यांना लागूही होतात.’  

‘जिंदाल कंपनीने नुसता कार्यक्रम न ठेवता अतिशय उत्तम अशा मार्गदर्शिका आमच्या मुलांसाठी आणल्या. अशाच प्रकारे आमच्या मुलांकरीता वारंवार कार्यक्रम व्हावेत,’ असे डॉ. नाना मयेकर म्हणाले.

या वेळी सर्व संचालक मंडळ व जयगड माध्यमिक विद्यामंदिराचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी जेएसडब्ल्यू लेडीज क्लबच्या सदस्या अंकिता अतुल करंदीकर, लॉजिस्टिक विभागाचे प्रमुख समीर गायकवाड, सिव्हिल विभागाच्या झरीना सोलकर, सीएसआर विभागाच्या योगिता महाकाळ यांनी उपस्थिती लावली. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेडचे युनिट हेड कॅप्टन श्रीराम रवी चंदेर व सीएसआर विभागाचे प्रमुख सुधीर तैलंग यांचे मार्गदर्शन लाभले. सनोबर सांगरे, दर्शना रहाटे व सई मंगेश साळवी यांच्या नियोजनाने कार्यक्रम सफल झाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search