Next
‘ग्रामीण भागातील महिला आजही हक्कांपासून वंचित’
‘डिक्की’च्या परिषदेत वैशाली माडे यांची खंत
BOI
Monday, March 11, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

जागतिक महिला दिनानिमित्त डिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमात गायिका वैशाली माडे यांच्यासह डॉ. स्वाती मुजुमदार, टाटा मोटर्सच्या सतरुपा रॉय सरकार, मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे, सीमा कांबळे, स्नेहल लोंढे, विनी मेश्राम व अविनाश जगताप उपस्थित होते

पुणे : ‘महिलांचा जागर, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान, त्यांना समान स्थान हे चित्र आपल्याला शहरी भागातच दिसते;पण ग्रामीण भागातील महिला आजही घराबाहेर पडू शकत नाही. त्यांना शिक्षणाचं, विचाराचं स्वातंत्र्य नाही. विशेषतः दलित महिला आजही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत,’ अशी खंत प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी येथे व्यक्त केली.
 
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की), सिडबी आणि एनएसआयसी यांच्या वतीने महिला उद्योजकांसाठी येथे एकदिवसीय ‘उद्योजकता विकास परिषद’ घेण्यात आली. या वेळी त्या उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या परिषदेचे उद्घाटन सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, टाटा मोटर्सच्या (इनडायरेक्ट मटेरियल) सरव्यवस्थापक सतरुपा रॉय सरकार यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘डिक्की’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, ‘डिक्की’चे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, मुंबई विभागाचे संतोष कांबळे, ‘डिक्की’च्या नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, महाराष्ट्राच्या वुमन विंग अध्यक्षा स्नेहल लोंढे, विदर्भाच्या विनी मेश्राम व ‘डिक्की’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश जगताप उपस्थित होते. या वेळी यशस्वी उद्योजिकांचा सत्कारही करण्यात आला.

माडे म्हणाल्या, ‘‘डिक्की’ने मोठी चळवळ उभी केली आहे. येत्या काळात ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘डिक्की’कडून आश्वासक कार्य घडेल, अशी खात्री वाटते.’

या वेळी सतरुपा रॉय सरकार म्हणाल्या, ‘ महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे; परंतु कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो. इतर कर्तव्य बजावताना स्वतःच्या कलागुणांना त्यांच्याकडूनच दुय्यम स्थान दिलं जातं. महिलांनी यावर मात करायला हवी.’

मुजुमदार यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सिम्बायोसिसमध्ये देण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती दिली;तसेच मुजुमदार कुटुंबाला लाभलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. 

‘स्टार्ट अप, मुद्रा यासारख्या योजनांचा सर्वांनी फायदा घ्यावा. उद्योजक होण्यासाठी सध्याचा सर्वोत्तम काळ आहे. अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी सरकारांकडून विशेष योजना व सवलती आहेत. या दलित उद्योजकांच्या २० टक्के राखीव कोट्याबरोबरच आता अतिरिक्त तीन टक्के केवळ महिला उद्योजकांसाठी सरकारने राखीव केले आहेत. याचा आपण फायदा घ्यावा,’ असे पद्मश्री कांबळे यांनी सांगितले. 

निश्चय शेळके यांनी ‘डिक्की’च्या आजवरच्या वाटचालीची यशोगाथा मांडली. 

या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात यशस्वी उद्योजिका होण्यासाठी आवश्यक असणारे गुण व व्यक्तिमत्त्व विकास यासंबधी निलेश लोंढे यांनी मार्गदर्शन केले . महाराष्ट्र राज्याच्या महिला विषयक धोरणांची सविस्तर माहिती प्राजक्ता गायकवाड आणि के. जी. देकाटे यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व प्रमुख शहरांतील महिला सहभागी झाल्या होत्या. देशभरातील ‘डिक्की’च्या इतर २३ शाखांमध्येही अशी परिषद घेण्यात आली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search