Next
माझ्या गोव्याच्या भूमीत...
BOI
Tuesday, November 28 | 06:45 AM
15 0 0
Share this storyकविवर्य बा. भ. बोरकर यांचा ३० नोव्हेंबरला जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या त्यांच्या कवितेबद्दल...
.....
कविवर्य बा. भ. अर्थात बाकीबाब भगवंत बोरकर यांचा ३० नोव्हेंबरला जन्मदिन. बाकीबाब असं म्हटल्याबरोबर त्यांच्या अनेक कवितांच्या सरीवर सरी माझ्या मनाच्या अंगणात बरसू लागल्या. त्यांच्या कवितांची लखलखती ‘चांदणवेल’ आणि गोव्याच्या भूमीतील लाल माती, समुद्राच्या फेसाळ लाटा, नारळी-पोफळीची झाडं, हिरवळ आणि पाणी... ओठांवर येऊ लागली बाकीबाबांची कविता आणि काही स्वरबद्ध झालेली त्यांची काही गाणी!

गड्या नारळ मधाचे
कड्या कपारीमधोनी
घट फुटती दुधाचे...

बा. भ. बोरकरपं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली बा. भ. बोरकरांची ही सुप्रसिद्ध कविता राधा मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना एक वेगळाच अनुभव देऊन जाते... त्या गाण्याच्या सुरांबरोबर आपणही गोव्याच्या भूमीत केव्हा जाऊन पोहोचतो हे कळतही नाही. मला आठवते आमची गोव्याची सहल... गोव्याची सहल म्हटल्याबरोबर सर्वांनी जय्यत तयारी केली होती. मोठ-मोठ्या आकाराच्या हॅट्स, फुलाफुलांचे रंगीबेरंगी शर्टस्, टॉप्स, गॉगल्स... एकदम फन्की लूक! त्यात समुद्रात पोहण्यासाठी स्विमिंग कॉस्च्युम... हे अन् ते... आमच्या ग्रुपमधल्या तीन कुटुंबांचे नवीन नामकरणही झाले... फर्नांडिस, गोन्साल्विस आणि कामत! आम्ही सगळे दहा-बारा जण गोव्याच्या ट्रिपला जाणार होतो. मुलांचा उत्साह तर विचारू नका... गोव्याला पोहोचलो... समुद्रकिनारा, नारळाची उंच उंच झाडं, हिरवी-पोपटी भाताची शेतं पाहिली आणि मी हळूच माझ्या पर्समधून बाकीबाबांचा कवितासंग्रह काढला... अर्थात पहिली कविता ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ हीच वाचायला घेतली. सोळा कडव्यांची ही कविता, या कवितेनं संपूर्ण गोवा आम्हाला दाखवला... जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे त्या स्थळानुसार कवितेमधल्या कडव्यांचं सामूहिक वाचन केलं. खरंच बाकीबाबांच्या या कवितेमुळे गोव्याची अवघी निसर्गसृष्टी तिथल्या वैशिष्ट्यांनिशी आम्ही अनुभवली...

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्याफणसांची रास 
फुलीं फळांचे पाझर
फळी फुलांचे सुवास
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पानाफुलांची कुसर
पशुपक्ष्यांच्या किनारी

‘अरे! या ओळी राधा मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यात नाहीत,’ असं म्हणून एकानं आपल्या मोबाइलमधून हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली कविताच ऐकवली. अन् बाकीबाबांच्या शब्दांना लाभलेलं स्वरांचं देखणं कोंदण आम्ही भान हरपून ऐकतच राहिलो.

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा...

व्वा! किती सुरेख कल्पना... माहेरी आलेलं चांदणं, ओलावल्या डोळ्यांनी समुद्राला भेटणारं आकाश... सगळेच बा. भ. बोरकरांच्या काव्यप्रतिभेनं चकित झालेले... पं. हृदयनाथ मंगेशकरांनी या मूळ कवितेतल्या सोळा कडव्यांपैकी पाच कडवी निवडली असतील, तेव्हा त्यांच्या मनात नक्की गोंधळ उडाला असेल, की हे कडवं घेऊ की ते? पण त्यांनी जी पाच कडवी निवडली ती खरोखर संपूर्ण कवितेचं सार सांगणारी... कवीच्या आशयाला कुठेही बाधा न आणणारी... पं. हृदयनाथ मंगेशकर काव्यरसिक, आस्वादक, प्रतिभावंत संगीतकार आहेत याची पुन्हा प्रचिती आली. मराठी साहित्यातील उत्तमोत्तम कविता निवडून त्यांनी त्या स्वरबद्ध केल्या. या कविता घराघरात पोहोचवण्याचं श्रेय संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांना द्यायलाच हवं. बा. भ. बोरकरांच्या शब्दांचा मोह हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांना व्हावा यात नवल ते कसलं! या गोव्याच्या भूमीचं वर्णन करण्यासाठी बोरकरांची काव्यप्रतिभा जशी फुलून आली, अगदी तसंच संगीतकाराचंही स्वररचनावैभव फुलून आलेलं आपल्याला दिसतं.

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा... 

रस, रंग, रूप ल्यालेली ही कविता आम्ही सारेच मुक्तकंठानं गाऊ लागलो होतो. एकामागून एक कडवी आम्ही वाचत होतो. समुद्राची गाज आमच्या आवाजात मिसळत होती. जणू त्या सागरालाही बोरकरांच्या कवितेची ओढ होती. क्षणभर वाटलं, याच किनाऱ्यावरच्या रेतीमध्ये बोरकरांची पावलं उमटली असतील, कितीतरी कवितांनी इथेच जन्म घेतला असेल... आणि अशी एखादी कविता अवतरली असेल... 

हिरवळ आणिक पाणी 
तेथे स्फुरती मजला गाणी...

इथला खारा वारा, निळं पाणी, मऊशार वाळू, उंच उंच माड... वेड लावणारा गोव्याचा निसर्ग... लाटांमागून लाटा याव्यात तशा कवितेच्या ओळींमागून ओळी बोरकरांच्या मनात उलगडत असतील... कवितेचं दान रसिकांच्या पदरात पडत असेल... या भूमीबद्दल कधी हळवा सूर, तर कधी शुद्ध वेदना, कधी जन्मजन्मांतरीची ओढ, तर कधी अभिमानानं फुलून आलेले मनीचे भाव. शब्दांचा नुसताच फुलोरा नाही, तर काळजातून आलेला सच्चा सूर म्हणजे बोरकरांची ही कविता. गाण्यामध्ये नसलेल्या कडव्यांमध्येही आपला जीव अडकतोच...

माझ्या गोव्याच्या भूमीत 
चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन
भाव शब्दांवीण बोले...

पानाफुलांनी, हिरव्या वनश्रीनं नटलेली, आईच्या मायेनं साळीचा भात भरवणारी, आतिथ्य आणि अगत्यानं पाहुण्यांचं स्वागत करणारी, देवदेवतांच्या देवळांनी भक्तीचा अलौकिक अनुभव देणारी, शुद्ध सौंदर्याचे वेद बोलणारी गोव्याची भूमी आयुष्यात एकदा तरी पहावी असं वाटायला लावणारी बोरकरांची ही कविता...

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने
सोनकेवड्याचा हात...

बोरकरांना कविता स्फुरत असेल, तेव्हा सारे शब्द हात जोडून उभे असतील असं वाटतं. ‘मी कवी आहे’ याचा फार मोठा अभिमान त्यांना वाटे. आकाशवाणी गोवा आणि आकाशवाणी पुणे केंद्रात बोरकर वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुरुषोत्तम मंगेश लाड हे नभोवाणी खात्याचे तत्कालीन सचिव होते. त्यांनी बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या थोर साहित्यिकांना सन्मानानं आकाशवाणीत आणलं, जेणेकरून श्रोत्यांना या साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा लाभ व्हावा. धन्य ती आकाशवाणी, धन्य ते पु. मं. लाड आणि धन्य ते श्रोते!  

‘झिनी झिनी वाजे बीन’ हे गीत जेव्हा मी श्रोत्यांसाठी लावते, तेव्हा वीणेच्या झंकाराबरोबर बोरकरांच्या प्रति कृतज्ञतेचे भाव मनात झंकारू लागतात... उत्कट प्रेमगीत असो की ईश्वराबद्दलची निस्सीम भक्ती, सौंदर्यप्रेमी मनोवृत्ती आणि निसर्गप्रतिमांनी नटलेली त्यांची काव्यप्रतिभा पाहून थक्क व्हायला होतं.

जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जलापरि मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचराचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो

असं सांगणारे बाकीबाब... स्वत:च या कवितेचे उत्तम उदाहरण होते. जीवन खऱ्या अर्थानं समजून-उमजून जगलेला हा विलक्षण कवी आकाशवाणीसारख्या माध्यमात काम करून गेला, ही आम्हाला मूठभर मांस चढवणारी गोष्ट वाटते. त्याबरोबरच साहित्यसेवेची नम्र जाणीवही करून देते. आकाशवाणीत सृजनाची सदैव सोबत असते असं मला नेहमीच वाटतं. म्हणून तर अशा स्वरांनी मोहरलेल्या कवितांपाशी मन रेंगाळत राहतं.

सध्या गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होतोय... गोव्यात आलेल्या प्रत्येक कलाकाराला आवर्जून ऐकवावी अशी बा. भ. बोरकरांची ही कविता. राधा मंगेशकर यांनी गायलेली आणि गोमंतकीय निसर्गाचा रस, रंग, रूप ल्यालेली पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनांनी मोहरलेली ही कविता ऐकत ऐकत अवघा गोवा हिंडून यायचा... पर्यटनाचा आनंद द्विगुणित करायचा... बाकीबाबांच्या गाण्यात आपलाही स्वर मिसळायचा... 

माझ्या गोव्याच्या भूमीत
लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावात
शुद्ध वेदनांची गाणी...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

(‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या कवितेचे राधा मंगेशकर यांच्या आवाजातील सादरीकरण सोबतच्या व्हिडिओत... ही कविता सुनीता देशपांडे यांच्या आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)(पु. ल. देशपांडे यांनी सादर केलेली बा. भ. बोरकर यांची 
‘पैंजणां’ 
ही कोकणी भाषेतील कविता सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link