Next
चैत्र शुद्ध आणि बहादूर सर...
BOI
Thursday, January 24, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मार्क रोथको‘मार्क रोथकोपासून प्रेरणा घेऊन केलेले ‘चैत्र शुद्ध’ हे चित्र माझ्यासाठी ‘चित्रे कशी पाहतात,’ याबाबतचे प्रा. बहादूर सरांचे विवेचन ऐकण्याचे साधन ठरले. म्हणून या स्मरणचित्रांच्या प्रवासात ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे....’ स्मरणचित्रे सदरात लिहीत आहेत डॉ. नितीन हडप... 
..........
पूर्वी बालगंधर्व कलादालन हे पुण्यातील चित्रकारांसाठी एकच मध्यवर्ती ठिकाण होते. आर्ट गॅलरी म्हणावे असे ते एकमेव ठिकाण. बहुतेकशी प्रदर्शने तेथेच होत १९९५ साली आम्ही चित्रकारांनी एकत्र येऊन एक प्रदर्शन आयोजित केले होते. माझ्या चित्रांचे प्रतल एकाच रंगाने रंगवलेले होते. ना आकृती, ना आकार, ना पोत, ना लय... फक्त आणि फक्त रंग. मोठे कॅनव्हास मांडले होते. दोन पूर्ण निळ्या रंगाचे आणि दोन पिवळसर रंगाचे. रंग लावताना जो काही अपघाताने, पाण्याच्या कमी-जास्त वापराने होईल, तो छटेचा बदल तसाच ठेवलेला होता. या प्रकारे फक्त रंगांत चित्र काढण्याच्या तेव्हाच्या प्रेरणांमध्ये महत्त्वाची प्रेरणा होती ती अमेरिकेतील चित्रकार मार्क रोथको याच्या चित्रांची. रोथको (१९०३ -१९७०) हा न्यूयॉर्क ही कर्मभूमी असणारा अमेरिकी चित्रकार. मूळचा रशियातील, परंतु अमेरिकेतील न्यूयॉर्क शैलीतील जॅक्सन पोलॅकनंतरचा महत्त्वाचा चित्रकार. त्याने रंग रंगवले. १९६०च्या दशकातील त्याचे प्रयोग महत्त्वपूर्ण मानतात. त्याने रंगवलेली जवळजवळ रंगांचीच चित्रे आहेत. ‘येलो अँड गोल्ड’ हे त्याचे प्रसिद्ध चित्र. वरती पिवळा रंग अथांग पसरलेला. त्या खाली केशरी रंग, मध्ये थोड्या छटा. त्याची ही एक स्वतंत्र शैली होती. ६०च्या दशकात ही सर्वस्वी नवी रचना होती. त्याच्या ज्यु असण्याचा प्रभाव त्याच्या त्या चित्रशैलीवर होता, असे मानले जाते. त्याने रंगावरच भर देण्याच्या या प्रयोगाची सुरुवात १९४८ साली केली. तरंगणारे रंग, प्रवाही-पारदर्शक रंग प्रेक्षकाला एका प्रकारे सुखद आणि वेगळ्या विश्वात नेणारे ठरले. तोपर्यंत फक्त आकाराच्या साह्याला रंग वापरले जात होते. परंतु रोथकोने रंगाच्या प्रतलावर लावण्याच्या पद्धतीमुळे रंगाच्या नंतर आकार येईल तो ठेवण्याची पद्धत अवलंबली आणि ती खूप समक्षपणे मांडली. तेव्हा अशा अर्थाने सपाट रंगात चित्रे रंगवण्याची सुरुवात रोथकोने केली. मी नवा चित्रकार होतो आणि जे नव्याने समजेल ते करून बघण्याचे साहस माझ्यात होते. त्यामुळे मीदेखील हे सपाट रंगाचे चित्रप्रयोग करून पाहिले होते. त्यातील चार मोठे कॅनव्हास या प्रदर्शनात होते. 

प्रा. सतीश बहादूर

प्रा. सतीश बहादूरप्रदर्शन काळात एके दिवशी सकाळी ११च्या सुमारास पायजमा-कुर्ता घातलेले आणि खांद्यावर शबनम अडकवलेले गृहस्थ शांतपणे प्रदर्शन पाहत होते. पुण्यात इतक्या गांभीर्याने चित्र पाहणारे कोणी दिसणे तेव्हा तरी दुर्मीळच होते. तासभर तरी त्यांनी चित्रे पाहिली. मी उत्सुकतेने नाव विचारले. ‘प्रा. सतीश बहादूर’ हे उत्तर ऐकून मी आनंदलो. फिल्म अर्काइव्हच्या क्लबचा सभासद असताना त्यांना काही वेळा तेथे पाहिले होते. त्यामुळे त्यांचे नावही ऐकून होतो. कला क्षेत्रातील विद्यादानात संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेली व्यक्ती चित्र कशा पद्धतीने पाहते, हे जाणून घेण्याची उत्सुकता मला होती. त्यातूनच त्यांना ‘तुम्ही चित्रे कशी पाहता’ असा प्रश्न मी विचारला. वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कलारसग्रहण, कला इतिहास किंवा कलेतील सौंदर्यस्थळे समजावून सांगावीत, अशा पद्धतीने त्यांनी अत्यंत सविस्तर चर्चा केली. 

भारतीय लघुचित्रांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यातील अवकाश, तरलता, सोपेपणा आणि भावोत्कटता इत्यादींबाबत अनेक अंगांनी आणि दाखले देत देत त्यांनी ते चित्रे कशी पाहतात याचे सविस्तर वर्णन केले. ‘रोथको वगैरेंपासून स्फूर्ती जरी घेतली असलीस, तरीही तुझी प्रेरणा मला तरी भारतीय रूपाची वाटत आहे,’ असे ते म्हणाले. त्यातील ‘चैत्र शुद्ध’ नावाचे एक चित्र त्यांना एखाद्या भारतीय लघुचित्राच्या जवळचे वाटले. त्यात दिसणारे भारतीय लघुचित्रकलेचे गुणधर्म त्यांनी सोदाहरण सांगितले. चित्र पाहताना पूर्वग्रह, माहितीवजा ज्ञान इत्यादी, आपलेपण, स्वतःचे स्थान वगैरेंबरोबरच आवड-निवड बाजूला ठेवून चित्रकार काय मांडतोय हे ते पाहतात, असे त्यांनी सांगितले. मला तरी ते सगळे नवे होते. नवे डोळे मिळत आहेत, असे वाटत होते. असे पाहणे फारच अवघड असते, हे कळायला मला बराच वेळ लागला. परंतु हा दृष्टिकोन आकर्षक वाटला. 

मी काढलेल्या चित्रांना तेव्हा मी मराठी नावे दिलेली होती. ‘चैत्र शुद्ध’ असे एका चित्राचे नाव होते. मीच काढलेली चित्रे वेगळ्याच दृष्टीने पाहण्याची जणू सवयच मी सतीश बहादूर सरांच्या भेटीनंतर लावून घेतली. अर्थात ते जमणे जरा जडच जाते आहे. समकालीन कलाजगत, जगभरातील कला चळवळी, स्वतःचे तयार होऊ घातलेले चित्र, आजूबाजूचे घटनाक्रम, इतर कलांमधील चळवळी आणि ट्रेंड्स अशा आणि इतरही अनेक गोष्टी आपली आणि इतरही चित्रे पाहताना आजूबाजूला असतात. ते सगळ टाकून चित्र शुद्ध रूपात पाहता येऊ शकते, ही कल्पनाच रम्य होती. सराव महत्त्वाचा. मी वरील चित्राचे नाव ठेवताना ते चैत्र महिन्यात काढले म्हणून चैत्र व शुद्ध शब्द संगीतातील रागावरील प्रचलित भाषेतून घेतला होता. पुढे सतीश बहादूर यांच्याविषयी काही लेख वाचता आले. त्याच्या चित्रपट रसग्रहण वर्गाला अनेक क्षेत्रांतील लोक येत. भूपेन खक्करसारखे चित्रकारही येत. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा विद्यार्थीवर्ग होताच होता. परंतु रसग्रहण वर्गात वेगवेगळे विद्यार्थी असत. 

लोकवाङ्मय गृहाने त्यांच्या मूळ पुस्तकाचे भाषांतर असलेली ‘चित्रपटाचे सौंदर्यशास्त्र’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यामधील चित्रपट रसग्रहण शिकवताना हा भाग माझ्यासारख्या डिझाइन आणि चित्रकला शिकवणाऱ्या शिष्यासाठी महत्त्वाचा आहे. हा मिळालेला धडा मी आजकाल माझ्या अध्यापनात वापरून पाहत आहे. त्यांनी स्वतःच्या प्रयोगांचे काही पैलू अधोरेखित केले आहेत. कोणत्याही कलेतील अध्यापकाला ते उपयोगी आहेत. ते म्हणतात, की ‘मी माझा वर्ग ही विद्यार्थ्यांशी जिवंत संवादाची जागा म्हणूनच वापरली. त्यासाठी मी स्वतःला तसे घडविले. शिक्षक म्हणून माझे अस्तित्वच विद्यार्थी सक्षमतेत सामावलेले आहे. या विश्वासामुळे मला या काळात एक सवय लागली, शिकायला उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आदराने वागवण्याची.’ 

शिक्षक म्हणून प्रत्येक वेळी वर्गावर जाताना ते तयारी करीत. टिपण काढीत. प्राथमिक मुद्दे अगदी तोंडपाठ असले, तरी ते मनाशी उजळणी करीत. शिक्षक म्हणून तयारीबाबत ते लिहितात, ‘किती देश, किती प्रकार, किती कलावंत, किती वेगवेगळे राजकीय रोख गेली शंभरहून अधिक वर्षे इतिहासात जमा होत राहिले. चित्रपटांविषयाच्या लिखाणाचेही तेच. चित्रपटाचे सैद्धांतिक आणि इतिहासकार, भाषा वैज्ञानिक, सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत, मनोविश्लेषणवादी, स्त्रीवादी विचारवंत अशा सर्वांची पुस्तके...’ असे बरेच काही ते चित्रपटविषयक लिहीत असले, तरी चित्रकलेलाही ते लागू होणारे आहे. असे किती तरी दृष्टिकोन... 

मार्क रोथकोपासूनच प्रेरणा घेऊन केलेले ‘चैत्र शुद्ध’ हे चित्र माझ्यासाठी ‘चित्रे कशी पाहतात,’ याबाबतचे प्रा. बहादूर सरांचे विवेचन ऐकण्याचे साधन ठरले. म्हणून या स्मरणचित्रांच्या प्रवासात ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. 

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search