Next
मैदानसम्राज्ञी
सुरेखा जोशी
Thursday, March 08 | 06:30 PM
15 0 0
Share this story

भारतीय महिलांनी खेळाच्या मैदानावरही आपलं वर्चस्व सिद्ध करून, कुठल्याच क्षेत्रात आम्ही मागे नाही, हे दाखवून दिलं आहे. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण गगनभरारी घेणाऱ्या रणरागिणी, सागरकन्या आणि कुशल सारथ्य करणाऱ्या महिलांबद्दल माहिती घेतली. या दुसऱ्या भागात जाणून घेऊ या खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणूनही खेळाचं मैदान गाजवणाऱ्या काही महिलांविषयी...
...........
पी. व्ही. सिंधू :
पुसर्ला वेंकट सिंधू अर्थात पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारतासाठी मानाचा तुरा खोवला. २०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनमधील महिला एकेरीचं रौप्य पदक मिळवणाऱ्या सिंधूनं ऐतिहासिक कामगिरी केली. बॅडमिंटनमधे ऑलिंपिक रौप्य पदक मिळवणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली.

कर्नम मल्लेश्वरी :
‘आयर्न लेडी’ कर्नम मल्लेश्वरी वेटलिफ्टिंगमधे ऑलिंपिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. १९९४ आणि १९९५मध्ये तिनं जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. २०००च्या सिडनी ऑलिंपिकमधे एकूण २४० किलोग्रॅम वजन उचलून तिनं कांस्यपदक पटकावलं. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून तिनं ४१ सुवर्णपदकं, १५ रौप्यपदकं आणि आठ कांस्यपदकं मिळवली आहेत. सहा राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या मल्लेश्वरीला वेटलिफ्टिंग क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

हीना सिधू :
नेमबाज हीना सिधू हिची या क्षेत्रातली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. ‘आयएसएसएफ’च्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत तिनं जितू रायच्या साथीनं सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीच्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या हीनाला २०१४मध्ये ‘अर्जुन’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

भाग्यश्री ठिपसे :
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित भाग्यश्री ठिपसे यांनी पाच वेळा राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं आहे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा यातही त्यांनी विजेतेपद मिळवलं. १९८६मध्ये ‘फिडे’ या जागतिक संघटनेचा ‘इंटरनॅशनल वुमन मास्टर’ हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बुद्धिबळपटू आहेत. चेस ऑलिंपियाडमध्ये त्यांनी नऊ वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं.

मुस्कान सेठी :
भारताची पहिली व्यावसायिक पोकर खेळाडू असलेल्या मुस्कान सेठी हिनं पोकर या पुरुषांचं वर्चस्व असलेल्या खेळात, स्वतःच्या आगळ्या कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक प्रतिष्ठित पोकर स्पर्धांमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. सामाजिक कार्यातही आघाडीवर असणारी मुस्कान आपल्या विविध पुरस्कारांची रक्कम समाजासाठी दान करते.
 
अलिशा अब्दुल्लाह :
भारतातर्फे ‘फॉर्म्युला वन’ स्पर्धेत भाग घेणारी अलिशा पहिली भारतीय नॅशनल रेसिंग चॅम्पियन आहे. सुमारे तेरा वर्षांची कारकीर्द असलेल्या अलिशानं एमआरएफ नॅशनल गो कार्टिंग चॅम्पियनशिप, नॅशनल लेव्हल फॉर्म्युला कार रेसिंग, जेके टायर नॅशनल चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमधून उल्लेखनीय यश मिळवलं आहे.

पी. टी. उषा :
१९७९पासून अॅथलेटिक्सचं मैदान गाजवणाऱ्या पी. टी. उषा, ऑलिंपिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अॅथलीट आहेत. अॅथलेटिक्समधे सर्वाधिक सुवर्णपदकं मिळवणाऱ्या उषा यांना कौतुकानं ‘सुवर्णकन्या’, ‘मैदानाची सम्राज्ञी’ म्हणून संबोधलं जातं. सध्या त्या केरळमधील त्यांच्या ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स’मधून नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहेत.

भारतीय महिला आइस हॉकी संघ :
लडाखमधील महिलांचा आइस हॉकी संघ भारताचा पहिला महिला आइस हॉकी संघ आहे. या संघानं ‘आयआयएचएफ आइस हॉकी चॅलेंज कप ऑफ आशिया’मध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मार्च २०१७मध्ये बँकॉकमधे झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच विजय मिळवून या संघानं इतिहास घडवला. लडाखच्या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी हा संघ प्रेरणास्थान ठरला आहे.

ममता देवी :
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भाग घेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शरीरसौष्ठवपटू ममता देवी यांनी २०१२मध्ये जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. त्यानंतर व्हिएतनाममधे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक मिळवलं. पुण्यात झालेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या ममता देवी यांनी या यशासाठी कठोर मेहनत घेतली आहे.

डायना एडलजी :
डायना एडलजी या महिला एकदिवसीय क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार आहेत. १९७५ ते १९९५ दरम्यान त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्य होत्या. महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक षटकं टाकण्याचा (पाच हजार ९८पेक्षा अधिक चेंडू) विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कारानं सन्मानित झालेल्या डायना यांनी १९७८ आणि १९९३च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं.

मिशेल काकडे :
मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई आणि चेन्नई ते मुंबई हा ‘सुवर्ण चतुष्कोन महामार्ग’ विक्रमी वेळेत धावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला धावपटू मिशेल काकडे यांच्या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मधे चार प्रकारात झाली आहे. सर्वाधिक वेळ धावण्याचा विक्रम, वाळवंटातील अल्ट्रामॅरेथॉन धावण्याचा विक्रम, चार वाळवंटांत धावणारी पहिली भारतीय धावपटू बनण्याचा विक्रम आणि सुवर्ण चतुष्कोन मार्गावर सर्वाधिक वेगात धावणारी पहिलीच भारतीय महिला धावपटू या चार प्रकारांतील विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर आहे.

साईना नेहवाल :
ऑलिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू असा नावलौकिक असलेली साईना उदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेत पदक मिळवणारी साईना ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. या संघटनेच्या जागतिक कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारीदेखील ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. साईनाच्या या चमकदार कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारतर्फे तिला ‘पद्मभूषण’सह ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार आणि ‘अर्जुन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

मेरी कोम :
मुष्टियुद्ध क्षेत्रातल्या आपल्या कौतुकास्पद कामगिरीनं भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मेरी कोम यांना ‘मॅग्निफिसंट मेरी’ असं संबोधलं जातं. पाच वेळा वर्ल्ड अमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मेरी कोम आशियाई स्पर्धेत सुवर्ण दक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय मुष्टियोद्ध्या आहेत. सहा जागतिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्यादेखील त्या एकमेव मुष्टियोद्ध्या आहेत.

विजयालक्ष्मी सुब्बारमन :
‘फिडे’ या बुद्धिबळ संघटनेचा ‘वुमन ग्रँडमास्टर’ किताब सर्वप्रथम जिंकणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू म्हणजे विजयालक्ष्मी सुब्बारमन. ती चेस ऑलिंपियाडमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदकं मिळवणारी महिला बुद्धिबळपटू आहे. ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबही तिनं मिळवला आहे.


साक्षी मलिक :

२०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये कुस्तीतलं पदक मिळवून, साक्षी मलिकनं नवा विक्रम नोंदवला. कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू आहे. तिनं २०१४मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक तसंच, आशियाई स्पर्धेत २०१५मध्ये कांस्य आणि २०१७मध्ये रौप्यपदक मिळवलं आहे.

दीपा कर्माकर :
भारतीय जिम्नॅस्टिक्सच्या क्षेत्रात इतिहास घडवत दीपा कर्माकरनं २०१६च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये, जिम्नॅस्टिक्समधील पात्रता फेरीत प्रवेश मिळवला. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे. २०१५च्या वर्ल्ड जिम्नॅस्टिक्स चँपियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारीदेखील ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे. २०१४मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही दीपा कर्माकरनं कांस्यपदक मिळवलं आहे.

मिताली राज :
महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज यशस्वी कर्णधारसुद्धा आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीनं केला आहे.


सानिया मिर्झा :
सानिया मिर्झा ही भारतीय टेनिस विश्वातला चमकता तारा आहे. महिला दुहेरीचं अग्रमानांकन मिळवणारी ती पहिली भारतीय टेनिसपटू आहे. महिला एकेरीतही नामांकित खेळाडूंविरुद्ध विजय मिळवून तिनं आपलं टेनिस क्षेत्रातलं वेगळेपण दाखवून दिलं आहे.

अंजुम चोप्रा :
‘मेलबर्न क्रिकेट क्लब’चं सन्माननीय आजीव सभासदत्व मिळवणारी अंजुम चोप्रा, २००२मध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार होती. शंभराहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.

इशिता मालवीय :
‘दी शाका सर्फ क्लब’ची सहसंस्थापक असलेली इशिता मालवीय पहिली भारतीय व्यावसायिक महिला सर्फर आहे. महिला सर्फिंग क्षेत्राची जागतिक दूत असलेल्या इशितानं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिच्या आयुष्यावर आधारित ‘बीयाँड दी सरफेस’ या लघुपटालाही पुरस्कार मिळाला. (या लघुपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) सागरी पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम करणाऱ्या इशिताने भारतीय किनारपट्टीला ‘आंतरराष्ट्रीय सर्फिंग डेस्टिनेशन’ बनवणं हे उद्दिष्ट ठेवलं आहे.

गीता फोगट :  
हरियाणाच्या एका खेडेगावातून आलेल्या गीता फोगट हिनं २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत फ्री स्टाइल कुस्तीत सुवर्णपदक मिळवून, महिलांच्या कुस्ती क्षेत्रात इतिहास घडवला. पिता महावीर फोगट यांच्याकडून कुस्तीचं प्रशिक्षण घेतलेल्या गीतानं २०१२मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक, तर २०१३च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि २०१५च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे.

सुनील डबास :
क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रात एम. फिल. आणि नंतर खेळाडूंचं मानससास्त्र या विषयात पीएचडी केलेल्या सुनील डबास या कबड्डी प्रशिक्षक आहेत. २००५पासून त्या राष्ट्रीय कबड्डी संघाला प्रशिक्षित करण्याचं काम करत आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय महिला संघानं आशियाई आणि जागतिक स्पर्धेसह, एकूण सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. क्रीडा क्षेत्रावर आधारित काही पुस्तकांचं लेखन आणि संपादन त्यांनी केलं आहे. प्रशिक्षक म्हणून ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला कबड्डी प्रशिक्षक आहेत. भारत सरकारनं ‘पद्मश्री’, तर हरियाणा सरकारनं ‘स्पोर्टस् वुमन अचिव्हर अॅवॉर्ड’ प्रदान करून त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला आहे.

सुनीता शर्मा :
महिला क्रिकेटच्या क्षेत्रात सुनीता शर्मा यांचं नाव अग्रस्थानी आहे. पहिल्या महिला क्रिकेट प्रशिक्षक असलेल्या सुनीता यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना घडवलं आहे. ३५ वर्ष प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या सुनीता यांनी २०१६मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कप, आशिया कप आणि श्रीलंका, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक म्हणून काम केलं.

कविता देवी :
कविता देवी या भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू आहेत. २०१६मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत पॉवर लिफ्टर म्हणून सुवर्णपदक मिळवलं. जगप्रसिद्ध पॉवर लिफ्टर खली यांच्याकडून प्रेरणा घेऊन कविता देवी यांनी खली यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूडब्ल्यूई अर्थात जागतिक मनोरंजन कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पॉवर लिफ्टर आहेत.

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link