Next
‘इकोझेन’च्या तंत्रज्ञानांचा प्रायोगिक वापर यशस्वी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ७४ टक्क्यांपर्यंत वाढ
प्रेस रिलीज
Friday, January 04, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : शेतमालाचे नुकसान कमी करणे, घाऊक बाजारातल्या भावांच्या चढ उतारांचा फटका शेतकऱ्यांना बसू नये आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणारा शेतीमालाचा परतावा पारदर्शक पद्धतीने ठरावा या उद्देशाने ‘इकोझेन सोल्युशन्स’ने विकसित केलेल्या इकोफ्रॉस्ट सोलर कोल्ड रूम, इको कनेक्ट आणि भाडेतत्वावर कोल्ड रूम या तंत्रज्ञानांचा प्रायोगिक तत्वावर केलेला वापर यशस्वी ठरला आहे.

‘इकोफ्रॉस्ट’ हे सौरऊर्जेवर चालणारे आणि सहज परवडणारे शीतगृह तंत्रज्ञान ‘इकोझेन’ने विकसित केले असून, बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला. हे तंत्रज्ञान वापरणारे फिरते शीतगृह सध्या १४० शेतकरी त्यांचा शेतमाल टिकवण्यासाठी वापरत आहेत. त्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी ७४ टक्क्यांपर्यंत भरीव वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शीतगृहात सध्या रोज सरासरी दोन हजार किलो शेतमाल ठेवला जातो. तीन महिन्यांपूर्वी हे शीतगृह सुरू झाल्यापासून त्यात साठवल्या जाणाऱ्या मालात ६० ते ६५ टक्के वाढ झाली आहे. विकला न गेलेला माल या शीतगृहात ठेऊन नंतर योग्य वेळी योग्य भावात विकता येईल, असा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.

याबाबत शेळगाव येथील शेतकरी अमोल बोधर म्हणाले, ‘आम्ही आमच्या भाज्या दोन ते तीन दिवस बारामती बाजारात ‘इकोफ्रॉस्ट’ शीतगृहात ठेवतो आणि चांगला भाव  आला की विकतो. आतापर्यंत आम्हाला आमचा न विकलेला माल पडलेल्या भावात विकावा लागत असे, पण बाजारात ही शीतगृहाची सोय झाल्यापासून आमचे नुकसान होणे थांबले असून, कमाईत भरही पडली आहे.’  

‘इकोफ्रॉस्ट’चा वापर आणखी काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्याची योजना आहे, जेणेकरून छोट्या शेतकऱ्यांना अल्प खर्चात आपला शेतीमाल टिकवून ठेवणे शक्य होईल. जिथे वीज पुरवठा बेभरवशी आहे किंवा अनेकदा वीजच नसते अशा जागी ‘इकोफ्रॉस्ट’ त्याच्या साठवलेल्या सौरऊर्जेवर चालते. ही यंत्रणा पिकांच्या कालक्रमानुसार देशभर फिरवता येते.  

‘इकोफ्रॉस्ट’विषयी अधिक माहिती देताना ‘इकोझेन’चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक सिंघल म्हणाले, ‘विकसनशील देशात शीत साखळी अपुरी असल्यामुळे ३० टक्के शेतमाल सडून वाया जातो. ‘इकोझेन’ने या समस्येवर संशोधन करून आणि शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘इकोफ्रॉस्ट’ विकसित केले. पुरवठा साखळीत त्याच्या वापरामुळे मालाचा दर्जाही टिकून राहतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान खूप कमी होते. शेतकरी ‘इकोफ्रॉस्ट’मध्ये आपला माल सुरक्षित ठेऊ शकतात आणि किफायतशीर भाव आल्यावर विकू शकतात.’

शेतमाल ठेवण्यासाठी शीतगृह उभारण्याचा खर्च छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाही आणि व्यवहारांच्या पारदर्शकतेअभावी त्यांना बाजारपेठेची नीट माहिती मिळत नाही. ‘इकोझेन’च्या ‘भाडेतत्वावर कोल्ड रूम’ हा शीतगृह भाड्याने वापरण्याचा पर्याय आणि ‘इको कनेक्ट’ हे शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात उत्तम दुवा साधणारे तंत्रज्ञान यांमुळे या समस्येवर पर्याय उपलब्ध झाला आहे. हे पर्याय बारामती, नाशिक आणि पुणे येथे बाजारपेठांमध्ये सुरू करण्यात येत आहे. ‘इको कनेक्ट’ हे मोबाइल फोन व संकेतस्थळावरून वापरता येणारे तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेतकरी हे खरेदीदार व व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधून आपला माल विकू शकतात. खरेदीदारसुद्धा आता सरळ उत्पादक शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतात.

याविषयी बोलताना ‘इकोझेन’चे सह-संस्थापक आणि मुख्य अधिकारी देवेंद्र गुप्ता म्हणाले, ‘बाजारपेठेशी जोडले जाणे हे कायमच भारतीय कृषी क्षेत्रापुढचे एक मोठे आव्हान ठरले आहे. महाराष्ट्रातली स्थिती यापेक्षा वेगळी नाही. ‘इको कनेक्ट’ने इंटरनेट आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या आधाराने शेतमालाचे उत्पादक, विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात एक समान डिजिटल संपर्क पातळी तयार केली आहे. या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातूनही येणारा शेतमाल शीतगृहाच्या साखळीत जोडला जाऊन तो कोणत्याही बाजारात खरेदी करता येऊ शकणार आहे.’

‘इको कनेक्ट’च्या प्रायोगिक वापराच्या टप्प्यात ‘इकोझेन’ने यवत येथील शेवंती उत्पादक अण्णा शितोळे यांचा सुरत आणि हैदराबाद येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून देण्यात मदत केली आणि शितोळे यांच्या शेतमालाला स्थानिक बाजारापेक्षा एक लाख रुपये जास्त मिळाले. सरकारच्या ई-नाम (e-NAM) या सध्या नाशवंत कृषी उत्पादनावर केंद्रित असलेल्या राष्ट्रीय शेतीमाल बाजाराच्या संकल्पनेला ‘’इको कनेक्ट’ पूरक आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना एकत्र आणणाऱ्या या योजनेत आजवर १३ राज्यांतील ४५५ कृषी उत्पन्न बाजार सहभागी झाल्या आहेत. शेतकरी आणि बाजारपेठा यांना जोडण्यासाठी सुरू झालेली ही एक पारदर्शी योजना आहे.

‘इकोझेन’ने नाशिक मधल्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रेही घेतली होती. नाशिक परिसरातले ६५ प्रगतीशील गुलाब उत्पादक शेतकरी या प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले होते.  या सत्रात ‘फुलांच्या तोडणीनंतर काळजी घेण्याच्या पद्धती कोणत्या’ याबद्दल चर्चा झाली आणि अशी काळजी घेतल्यामुळे दूरवरच्या देशात निर्यात करणे आणि आपल्या मालाला जास्त चांगला भाव मिळवणे शक्य होईल याची खात्रीही शेतकऱ्यांना पटली. ‘इकोझेन’च्या या प्रयत्नांचा संख्यात्मक परिणाम लगेचच दिसून आला असून, शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी नवे बाजार मिळाले आणि जास्त भाव मिळवण्याचे सूत्रही सापडले. या यशाची प्रेरणा घेऊन ‘इकोझेन’ने आता ‘इको कनेक्ट’ आणि ‘इकोफ्रॉस्ट’ महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आणि देशभरातही नेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search