Next
सोशल मीडियावरच्या ‘कानसेनां’चे रत्नागिरीत संमेलन
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील सदस्यांचे ३० सप्टेंबरला तिसरे कानसेन संमेलन
BOI
Thursday, September 27, 2018 | 01:28 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
सोशल मीडियामुळे माणसे दुरावत चालल्याची खंत अनेकांकडून व्यक्त केली जाते. काही प्रमाणात ती खरीही आहे; मात्र तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो, त्यावर ते चांगले की वाईट हे ठरते. सोशल मीडियाचा चांगला वापर केला, तर ते माणसे जोडतेच, हे ‘कानसेन’ ग्रुपवरून कळते. ‘कानसेन’ या संगीतप्रेमींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील अनेक सदस्य एकमेकांना ओळखतही नाहीत; मात्र ग्रुपमुळे एकत्र येऊन त्यांनी संमेलन करायला सुरुवात केली आणि त्यांचे तिसरे संमेलन रविवारी, ३० सप्टेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत होत आहे. 

सुनीता गाडगीळ यांनी ‘कानसेन’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. सुनीता गाडगीळ आणि संजीव वेलणकर हे या ग्रुपचे अॅॉडमिन्स आहेत. संगीताची आवड असलेल्यांना या ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाते. अमरावती, नागपूर, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा राज्याच्या विविध भागांतील संगीत ही समान आवड असलेले लोक या ग्रुपमध्ये एकत्र आले आहेत. 

ग्रुपमध्ये संगीतविषयक चर्चा होते. वेगवेगळ्या गाण्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओंचे, त्याचप्रमाणे संगीतविषयक अभ्यासपूर्ण लेखनाचे आदान-प्रदान होते. यातूनच ‘कानसेन’मधील सदस्यांनी रत्नागिरीत स्नेहसंमेलन आयोजित करण्याची कल्पना मांडली आणि सलग दोन संमेलने यशस्वीरीत्या पार पडली. येत्या रविवारी, ३० सप्टेंबर २०१८ रोजी रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये तिसरे संमेलन होणार आहे. हा दिवस स्वच्छंदपणे जगणार असल्याची प्रातिनिधिक भावना सदस्यांनी व्यक्त केली. 

संमेलनाचा कार्यक्रम :
सकाळी साडेआठ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. रात्री नऊ वाजेपर्यंत हे संमेलन चालणार असून, दिवसभरात विविध सत्रांमध्ये कार्यक्रमांचे विभाजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या नियोजनासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. सकाळी मुलांचे कार्यक्रम, विविध गुणदर्शन, दुपारी भोजनानंतर एकमेकांची ओळख, कराओकेवर गाणी म्हणणे असे कार्यक्रम आहेत. आवड असणाऱ्या सर्व संगीतप्रेमींना सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाही संमेलनाचा हेतू  आहे. अल्पोपाहाराने संमेलनाची सांगता होणार आहे. वेगवेगळ्या सत्रांकरिता गटप्रमुखांची निवड करण्यात आली असून, ते त्यानुसार तयारी  करीत आहेत. नावनोंदणी, बाहेरून येणाऱ्या सदस्यांची राहण्याची व्यवस्था अशा कामांची जबाबदारी ग्रुपमधील स्थानिक सदस्य उत्साहाने पार पाडत आहेत. 

सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत ग्रुपव्यतिरिक्त अन्य संगीतप्रेमींनाही या संमेलनात सहभागी होता येणार आहे. त्या वेळेत सुगम संगीत हा लाइव्ह गीतांचा कार्यक्रम आणि भक्ती-नाट्य मैफल रंगणार आहे. या सांगीतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी अवश्य यावे, असे आवाहन ‘कानसेन’तर्फे करण्यात आले आहे.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सूररंगी रंगले’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सुनहरे गीत’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search