Next
कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद औरच!
BOI
Tuesday, November 06, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this article:आपल्या बालपणापासून मुलांच्या बालपणापर्यंतच्या काळात दिवाळी कशी बदलत गेली, तरीही सर्व नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद कसा और असतो, अशा दिवाळीच्या सगळ्या आठवणींबद्दल लिहीत आहेत वसईच्या अमृता आर्ते...
.........
‘दिवाळी’ या एकाच शब्दात आनंद, उत्साह, भेटीगाठी, धमाल अशा कितीतरी क्षणांच्या आठवणी सामावलेल्या आहेत. लहानपणची दिवाळी... पहाटेच्या थंडीतलं अभ्यंगस्नान, फटाके, सोसायटीत सगळ्यांनी मिळून बनविलेला मातीचा किल्ला. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नवनवीन कपडे. नकळत्या वयापर्यंत तरी दिवाळीची एवढी सोपी आणि सरळ व्याख्या होती. 

‘जय भवानी, जय शिवाजी’चे नारे देत सगळे मावळे दिवाळीच्या १५ दिवस आधीपासून किल्ला बनवायला सुरुवात करत. कोणी बुरुज, कोणी तट, कोण विहीर, तर कोणी दरवाजा करे. वरून मेथी, धणे, मोहरी पेरायची. दिवाळीच्या वेळी छोटी छोटी रोपे वाऱ्यावर डोलत. मग त्यात छोटे छोटे मावळे, हत्ती, घोडे... जणू काही शिवाजी महाराजांची सेना सज्ज. हल्लीच्या काळात परीक्षार्थी बनलेली मुले दिवाळीच्या सुट्टीत ही सगळी मजा सोडून व्हेकेशन बॅचेस अथवा एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्येच व्यग्र असतात.झेंडूच्या फुलांची तोरणं, दारापुढे रांगोळ्या, फराळाचा खमंग वास व देवघरात आईनं केलेलं आमचं औक्षण अशा मंगलमय वातावरणात दिवसाची सुरुवात होत असे. आईचं प्रेम, तिचा मायेचा स्पर्श उटणं लावताना ओसंडून वाहत असे. आमच्या सोसायटीत सर्वांत पहिलं कोण उठणार यात स्पर्धा लागायची. फटाक्यांच्या धूमधडाक्यानंतर आम्ही सगळी मुलं-मुली देवळात जात असू व आलटून पालटून एकमेकांच्या घरी फराळ करायला जात असू. मग दिवसभर कॅरम, ल्युडो, सापशिडी, व्यापार असे बैठे खेळ आणि संध्याकाळी बॅडमिंटन, चोर-पोलीस, लगोरी असे मैदानी खेळ खेळण्यात दिवाळीची सुट्टी मस्त मजेत जात होती. वय वाढत गेलं, तसतशा सण साजरा करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. खास दिवाळीसाठी स्वतः बनविलेली ग्रीटिंग कार्डस्, कंदील, तासनतास बसून काढलेल्या आखीव-रेखीव रांगोळ्या, स्वतः रंगविलेल्या वेगवेगळ्या पणत्या, आईला फराळ बनविण्यात केलेली मदतसुद्धा एन्जॉय करू लागले. फटाके म्हणजे निव्वळ पैशांची राख याची जाणीव व्हायला लागली. लग्नानंतरचा पहिला दिवाळसण... सासर-माहेरच्या माणसांकडून कौतुक करवून घेण्याचा क्षण. दिवाळीच्या पाचही दिवसांचं महत्त्व आता जाणवू लागलं. अनुष्काची, मुलीची पहिली दिवाळी... पहिली बेटी धनाची पेटी... घरी आलेल्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी खास भुईचक्र, अनार असे शोभेचे फटाके परत घरात येऊ लागले. स्वतःचं महत्त्व कमी करून आता तिच्यासाठी शॉपिंग केलं जाऊ लागलं. घरातली साफसफाई, फराळ, येणाऱ्या-जाणाऱ्याचं आदरातिथ्य करून दिवाळी साजरी होऊ लागली.आताच्या धकाधकीच्या काळात नोकरी सांभाळून कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे सण म्हणजे आराम, पिकनिक अशी व्याख्या तयार झाली. जोडून येणारी सुट्टी बघून सगळे चार दिवस विश्रांतीसाठी बाहेरगावी जाऊ लागले. घरच्या फराळाऐवजी ‘रेडिमेड’ची मागणी वाढली. ऑनलाइन शॉपिंगनेसुद्धा बाळसं धरलं. श्रीखंड-पुरीपेक्षा लोक चायनीज हॉटेलला प्राधान्य देऊ लागले.    आम्ही हजारे कुटुंबीय म्हणजे कुटुंबप्रिय माणसं. सहजीवनात रमणारे. सगळे सण समारंभ एकत्र साजरे करण्यास कायम उत्सुक. मला सांगायला अभिमान वाटतो, की आमच्या लहानपणापासून ते आजपर्यंत आमचे वाढदिवस, संक्रांत, होळी - रंगपंचमी, गणपती, दसरा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असे सर्व सण आम्ही आनंदात साजरे करतो. रक्षाबांधन व भाऊबीजेच्या दिवशी तर सख्खे, चुलत, आत्ये, मावस अशी सगळी मिळून आम्ही १२ ते १५ भावंडं एकत्र असतो. आम्ही व आमची कुटुंबं एकत्र असल्यामुळे हे आमचे गेट-टुगेदरच असतं. लहान होऊन, छोट्या छोट्या गोष्टींत रमून, निरागसपणे सगळ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी एकत्र येऊन सण साजरे करण्याची गंमत काही औरच असते. सगळीकडे वैयक्तिक सुखासाठी हपापलेल्या, संपत्ती-स्टेटससाठी सख्ख्या भावा-बहिणीच्याही जिवावर उठणाऱ्या स्वार्थी माणसांपेक्षा, मनामनात प्रकाश उजळवणारा हा सण मी आजही माझ्या नातेवाईकांसोबत साजरा करू शकते, हे मी माझे सुदैव समजते. चला तर मग, आपण सर्वांनीच ही दिवाळी नात्यांमध्ये गोडवा आणून साजरी करण्याचा संकल्प करू या. 

संपर्क : अमृता नीलेश आर्ते
पितृछाया, बाजारपेठ, वसई 
मोबाइल : ९१४६० ०२२१६
ई-मेल : 1.anagha@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search