Next
पुण्यातील डॉ. अंकुर पटवर्धन यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 01:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील डॉ. अंकुर पटवर्धन यांनी ‘परागीभवन व सजीवसृष्टीचे आरोग्य’ या विषयावर सादर केलेल्या प्रकल्प संकल्पनेला जगप्रसिद्ध अशा ‘एल्सीविअर फाउंडेशन– आयएससी थ्री ग्रीन अँड सस्टेनेबल केमिस्ट्री चॅलेंज’ या स्पर्धेत द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नुकत्याच जर्मनी येथे झालेल्या चौथ्या ग्रीन अँड सस्टेनेबल केमिस्ट्री परिषदेमध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, २५ हजार युरो (सुमारे वीस लाख रुपये) आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

एल्सीविअर फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी डोमिझियाना फ्रँकेस्कॉन, एल्सीविअर केमिस्ट्री जर्नल टीमचे प्रमुख प्रा. रॉब वोन डालेन, ग्रीन परिषदेचे अध्यक्ष व ल्युफाना विद्यापीठाचे संशोधक प्रा. क्लाउस कुमरेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. पटवर्धन प्रदान करण्यात आला.

डॉ. पटवर्धन हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख असून, ते महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य आहेत; तसेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा ‘महाबळेश्वर-पाचगणी इको-सेन्सिटिव्ह झोन’साठी केंद्र सरकारतर्फे नेमलेल्या उच्च-स्तरीय समितीचे अध्यक्षदेखील आहेत.

डॉ. अंकुर पटवर्धनएल्सीविअर फाउंडेशन आणि एल्सीविअर केमिस्ट्री जर्नल टीम यांच्यातर्फे दर वर्षी प्रतिष्ठेची समजली जाणारी अशी ही ‘ग्रीन आणि सस्टेनेबल केमिस्ट्री चॅलेंज’ स्पर्धा घेतली जाते. या वर्षी डॉ. पटवर्धन यांच्या ‘फुलपाखरांचा परागीभवन आणि निसर्गसंतुलनातील महत्त्वाचा सहभाग’ या प्रकल्प संकल्पनेला या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल ६०० अर्ज आले होते. त्यातून ५० जणांकडून सखोल रूपरेषा मागवल्या गेल्या. त्यानंतर केवळ पाच जणांना अंतिम सादरीकरणासाठी जर्मनी येथे बोलवण्यात आले. यामध्ये जॉर्डन, जपान, भारत, कोलंबिया आणि नायजेरिया या देशातील संशोधकांचा समावेश होता. यात डॉ. पटवर्धन यांच्या प्रकल्प संकल्पनेस दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  

हा प्रकल्प ‘परागीभवन व सजीवसृष्टीचे आरोग्य’ या विषयावर आधारित असून, तो रसायनशास्त्र आणि परिस्थितीकी या दोहोंच्या सुसंवादावर आधारित असल्याचे या वेळी डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. वनस्पती व कीटक सहचर्य योग्यप्रकारे पुनर्स्थापित करणे हे पर्यावर्णाचा तोल राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे हे या संशोधनात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला असून, नजीकच्या भविष्यात पश्चिम घाटात पुढील काम केले जाणार आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने पिकांवर होणारा परागीभवनाचा परिणाम अभ्यासिला जाणार असल्याची माहितीही डॉ. पटवर्धन यांनी दिली. 

डॉ. पटवर्धन यांनी या प्रकल्पाची रूपरेखा डॉ. तेजस्विनी पाचपोर आणि डॉ. दत्तात्रय नाईक यांच्या साह्याने तयार केली आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search