रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनी लायन्स क्लबतर्फे रत्नागिरीतील तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पटवर्धन हायस्कूलमधील कला शिक्षक रूपेश पंगेरकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षिका लीना घाडीगावकर आणि ‘जीजीपीएस’मधील संगीत शिक्षक विजय रानडे यांचा त्यात समावेश आहे.
अ. के. देसाई हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. मणियार, रीजन पाचचे चेअरमन महेश उपळेकर, झोन चेअरमन (झोन २, रीजन ५) ओंकार फडके, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण, शिक्षण समिती अध्यक्ष मेघना शहा, अध्यक्ष सुप्रिया बेडेकर, सचिव शिल्पा पानवलकर, खजिनदार दीप्ती फडके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांबद्दल समाजात आदराचे स्थान आहे. समाजातील हा आदर कायम टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण पद्धतीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. तो बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. लहान मुलांवर टीव्ही, मोबाइलचे आक्रमण होत आहे. त्यांना यातून बाहेर काढून देशाचे भावी नागरिक उत्तमरीत्या घडविण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे,’ असे प्रतिपादन मणियार यांनी केले.