Next
‘ब्रेक्झिट’मुळे येणार इंग्रजीचा नवा अवतार!
BOI
Monday, March 04, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जगात इंग्रजीचे अनेक अवतार आहेत – अमेरिकी इंग्रजी वेगळी, ऑस्ट्रेलियन इंग्रजी वेगळी आणि भारतीय इंग्रजी वेगळी. त्याच धर्तीवर युरोपमध्ये एका नव्या तऱ्हेच्या इंग्रजीचा उदय होईल. म्हणजेच इंग्रजीवरील ब्रिटनचा एकाधिकार संपुष्टात येईल.
.........
युरोपीय महासंघातून (ईयू) ब्रिटनने बाहेर पडावे की नाही, यावर सार्वमत घेतल्याच्या घटनेला या वर्षी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. आणखी तीन आठवड्यांनी (२९ मार्च) ब्रिटन औपचारिकरीत्या ‘ईयू’तून बाहेर पडेलही. आपण यापुढे युरोपचा भाग नसणार आहोत, यावर बहुतेक ब्रिटिश नागरिकांचा आजही विश्वास बसत नाही. देश अभूतपूर्व प्रमाणात गोंधळलेला आहे. यातून कसा मार्ग काढायचा, यावर देशातील राजकारण्यांमध्ये खल सुरू आहे. ‘ब्रेक्झिट’मुळे देशावर होणाऱ्या गंभीर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रभावाविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे; मात्र या सर्व प्रक्रियेचा एक वेगळाच फटका इंग्रजी भाषेला बसणार आहे. 

ब्रेक्झिट घडण्यापूर्वी युरोपमध्ये इंग्रजीची स्थिती काय आहे, हे पाहावे लागेल. आज इंग्रजी ही ‘ईयू’मधील सर्वांत व्यापक प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे. सरकारी, शैक्षणिक आणि प्रशासनिक क्षेत्रांत तिचा दबदबा आहे. कोर्ट ऑफ जस्टिस (या एकमेव संस्थेची भाषा फ्रेंच आहे) या एका संस्थेचा अपवाद वगळता बहुतेक सर्व संस्थांची ती अधिकृत भाषा आहे. इंग्रजीमध्ये संवाद साधण्यास सक्षम असलेल्यांचे प्रमाण हॉलंडमध्ये ९० टक्के आणि डेन्मार्क आणि स्वीडनमध्ये ८६ टक्के आहे; मात्र युरोपच्या दक्षिणेला असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण खूप कमी म्हणजे इटलीमध्ये ३४ टक्के, पोर्तुगालमध्ये २७ टक्के आणि स्पेनमध्ये २२ टक्के एवढे आहे. 

सध्या ‘ईयू’मध्ये मूळ इंग्रजी भाषकांचे प्रमाण १४ टक्के एवढे आहे. ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटन बाहेर पडेल, तेव्हा हे प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली येईल; मात्र दुसरी भाषा म्हणून इंग्रजीला पसंती देणाऱ्यांची संख्या ३८ टक्के एवढे असेल. याचाच अर्थ गेल्या दोन दशकांत इंग्रजीने ‘ईयू’च्या सदस्य देशांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आजच्या घडीला इंग्रजी ही ‘ईयू’च्या २४ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ‘ईयू’च्या नियमांनुसार, प्रत्येक सदस्य देश आपल्या पसंतीची एक भाषा देऊ शकतो आणि इंग्रजीला या यादीत स्थान मिळाले होते ते ब्रिटनने केलेल्या शिफारशीमुळे. आता ब्रिटन बाहेर पडल्यानंतर ‘ईयू’च्या अधिकृत भाषांच्या यादीतून इंग्रजीची गच्छंती होईल. मग काय होणार?

ब्रिटिश लोकांनी परदेशी भाषा शिकल्या नाहीत, तर ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटन आणखी एकाकी होईल, असा इशारा २०१८मध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटीचे क्लेयर गोरारा आणि भाषातज्ज्ञ टेरेसा टिन्स्ले यांनी ‘हे लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये बोलताना दिला होता. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, या भ्रमात ब्रिटिश नागरिक दीर्घ काळापासून वावरत आहेत. जगातील केवळ सहा टक्के लोक मूळ इंग्रजी भाषक आहेत आणि ७५ टक्के लोकांना इंग्रजी जराही बोलता येत नाही, असे त्यांनी सांगितले होते. 
ब्रिटीश कौन्सिलने २०१७मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले होते, की ब्रिटिश लोकांना आपली समृद्धी आणि प्रभाव टिकवायचा असेल, तर स्पॅनिश, चिनी, फ्रेंच, अरेबिक आणि जर्मन या पाच प्रमुख भाषा शिकाव्या लागतील. 

‘ब्रेक्झिट’नंतरच्या युरोपमध्ये ब्रिटिश दुभाषे आणि अनुवादकांचा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे.  मुख्य म्हणजे फ्रेंच भाषा आपले गमावलेले स्थान परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी या दृष्टीने आधीच प्रयत्न चालविले आहेत. सध्या ‘ईयू’चे मुख्यालय बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये आहे आणि बेल्जियमची एक अधिकृत भाषा फ्रेंच आहे. त्यामुळे फ्रेंचचे पारडे काकणभर जड होऊ शकते. 

आयर्लंड आणि माल्टा या दोन्ही देशांमध्ये इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे; मात्र आयर्लंडने आपली पसंतीची भाषा म्हणून आयरिश आणि माल्टाने माल्टिज या भाषेला पसंती दिली होती. विशेष म्हणजे या दोन देशांचा ‘ईयू’मध्ये समावेश झाला, तेव्हा ‘ईयू’ची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजी अस्तित्वात होती. तरीही त्यांनी तिची निवड केली नाही. 

...मात्र येत्या काळात स्कॉटलंडचा ‘ईयू’मध्ये समावेश होणार आहे. त्या वेळी इंग्रजी ‘ईयू’मध्ये परत येऊ शकते, अशी अंधुक आशा काही जणांना आहे. परंतु त्याबाबत फारसे आशावादी राहण्यासारखी परिस्थिती नाही. यापूर्वी सप्टेंबर २०१४मध्ये स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते. त्या वेळी ५५ टक्के लोकांनी ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यास विरोध केला होता; मात्र त्यावेळी ब्रिटन युरोपीय संघातच राहील, अशी लोकांना अपेक्षा होती. ‘ब्रेक्झिट’नंतर (युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यापासून) स्कॉटलंडला युरोपीय संघातच राहायचे आहे. तेव्हा तिथे दुसरे सार्वमत होणार नाही, असे नाही. ‘ब्रिटिश इंग्लिश’चे वर्चस्व मान्य करण्याची गरज आयर्लंडला राहणार नाही आणि स्कॉटलंडमध्ये तर इंग्रजी आणि सेल्टिक भाषांमध्ये पूर्वीपासून संघर्ष आहे. 

याच्या उलट ‘ब्रेक्झिट’नंतर इंग्रजीचे वर्चस्व अधिक वाढेल, अशीही शक्यता काही जणांना वाटते; मात्र इटली, स्पेन, स्कँडिनेव्हिया किंवा पूर्व युरोपातील देश इंग्रजीच्या बाजूनेच आपले वजन पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. ही इंग्रजी आणि ब्रिटनची इंग्रजी वेगळी! गैर-इंग्रजीभाषक देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या या इंग्रजीला ‘ग्लोबिश’ असे म्हणतात. काही जणांनी या नव्या संभाव्य भाषेला यूरिश असे म्हणायला सुरुवात केली आहे. ब्रिटन बाहेर पडल्यानंतर उरलेल्या कोणत्याही देशाची इंग्रजी ही मातृभाषा नसल्यामुळे सर्व देश एका पातळीत येतील, असा त्यांचा युक्तिवाद असेल. इटलीचे माजी पंतप्रधान आणि युरोपियन कमिशनर मारियो मॉन्टी यांनी यापूर्वीच इंग्रजीच्या बाजूने अनुकूल मत व्यक्त केले होते. 

त्यामुळे शक्यता अशी आहे, की ‘ब्रेक्झिट’नंतर इंग्रजीची स्थिती कमजोर होण्याऐवजी ती अधिक भक्कम होईल; मात्र ही इंग्रजी वेगळीच असेल. अस्सल युरोपीय सरमिसळ असलेली! युरोपियन इंग्रजी किंवा युरो-इंग्रजी असे तिचे नाव असेल. युरोपमधील गैर इंग्रजी भाषकांनी विकसित केलेली आणि स्वत:चे व्याकरण असलेली अशी ही भाषा असेल. 

जगात इंग्रजीचे अनेक अवतार आहेत – अमेरिकी इंग्रजी वेगळी, ऑस्ट्रेलियन इंग्रजी वेगळी आणि भारतीय इंग्रजी वेगळी. त्याच धर्तीवर युरोपमध्ये एका नव्या तऱ्हेच्या इंग्रजीचा उदय होईल. म्हणजेच इंग्रजीवरील ब्रिटनचा एकाधिकार संपुष्टात येईल. वाईटातून चांगले म्हणतात तसे आता ‘ब्रेक्झिट’मधून युरिश मिळेल, काय सांगता?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 139 Days ago
Those who are talking of Purity of Language -- take note .
0
0
Bal Gramopadhye About 151 Days ago
Different versIons of a language ? Of course they do exist . That is What dialects are .
0
0
Bal Gramopadhye About 151 Days ago
At last , an attempt to analyse the situation -- not just an rmotional One . I hope , you continue the approach .
0
0

Select Language
Share Link
 
Search