Next
दुभत्या गाईची सरबराई
BOI
Monday, December 18, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अमेरिकेच्या तिप्पट लोकसंख्या असलेली आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने लोकसंख्या दर वर्षी जन्माला घालणारी बाजारपेठ कोणालाही भुरळ पाडू शकते. त्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजविणाऱ्या गुगललाही भारताने आकर्षित केले तर त्यात नवल ते काय? फक्त भारतावर केंद्रित असलेल्या अनेक उत्पादनांची गुगलने गेल्या आठवड्यात घोषणा केली. त्या निमित्ताने विशेष लेख...
............
अमेरिकेच्या तिप्पट लोकसंख्या असलेली आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने लोकसंख्या दर वर्षी जन्माला घालणारी बाजारपेठ कोणालाही भुरळ पाडू शकते. त्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजविणाऱ्या गुगललाही भारताने आकर्षित केले तर त्यात नवल ते काय? म्हणूनच फक्त भारतावर केंद्रित असलेल्या अनेक उत्पादनांची गुगलने गेल्या आठवड्यात घोषणा केली, तेव्हा आश्चर्याचे फारसे तरंग उठले नाहीत. ‘गुगल इंडिया’ नावाचा हा कार्यक्रम राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता आणि गुगलच्या अनेक वरिष्ठांनी त्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात गुगलने दिलेली आकडेवारी डोळे फिरवणारी आहे.

सध्या भारतात ४० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत आणि एकूण लोकसंख्येच्या मानाने ही संख्या एक तृतीयांश एवढीच आहे. याचाच अर्थ आणखी तिप्पट बाजारपेठ गुगलला खुणावते आहे. देशात ३० कोटीपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरकर्ते आहेत आणि ६५ कोटी मोबाइलधारक आहेत. गेल्या वर्षी गुगलवर केलेल्या १०० शोधांपैकी (सर्च) २८ शोध आवाजाच्या आधारे करण्यात आले होते आणि नऊ भारतीय भाषांमधून आवाज-आधारित शोधसुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी टाइप करण्याऐवजी बोलूनही शोध घेता येतो. गुगलचाच क्रोम हा ब्राऊझर वापरत असाल, तर नऊ भारतीय भाषा तुमच्या पडद्यावर आपोआप भाषांतरित होतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत हिंदीतून करण्यात आलेल्या शोधांमध्ये ४०० टक्क्यांची वाढ झाली होती. 

भारत हा अमेरिका व चीनखालोखाल सर्वाधिक आंतरजाल वापरकर्ते (इंटरनेट युझर्स) असलेला देश आहे; पण यात गंमत अशी, की चीनने फेसबुकवर बंदी घातली असून, गुगलने २०१० साली त्या देशातून काढता पाय घेतला आहे. त्या तुलनेत भारतात इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. त्यामुळे आकारमानाच्या मानाने आजच्या घडीला भारतासारखी बाजारपेठ कुठेही उपलब्ध नाही. 

यात भाषा हा एक कळीचा मुद्दा आहे. ‘नॅसकॉम’च्या म्हणण्यानुसार २०२० सालापर्यंत ७५ टक्के नवीन वापरकर्ते आपापल्या भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करतील. यात ग्रामीण भागात वाढणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी असणार आहे. आज व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरवर दिले-घेतले जाणारे ६० टक्के संदेश भारतीय भाषांमध्ये असतात, अशी माहिती ‘नॅसकॉम’च्याच एका कार्यक्रमात देण्यात आली होती. 

‘मोबाइलवर इंटरनेट असलेला एक वापरकर्ता महिन्याला सरासरी चार जीबी डेटा वापरतो. सध्याचा वाढीचा वेग पाहता आणि जोडणीची परिस्थिती पाहता हा आकडा ११ जीबीपर्यंत जाईल असे आम्हाला वाटते,’ असे ‘गुगल इंडिया’चे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले. ही संधी गुगलने साधली नसती तरच नवल!

आनंदन यांच्या मते, गुगलवर आजच्या घडीला २३ कोटी वापरकर्ते भारतीय भाषा वापरतात आणि त्यातील १७ कोटी जण गुगलच्या संदेश सेवेचा वापर करतात. गुगलला दिसत आहेत ते भारतातील आणखी ९० कोटी वापरकर्ते. देशातील ४०० रेल्वेस्थानकांवर काय किंवा ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत देत असलेले मोफत वाय-फाय काय, हे प्रकल्प म्हणजे या ९० कोटींसाठी गुगलने केलेली गुंतवणूकच आहे.

याशिवाय खास स्वस्तातील स्मार्टफोनसाठी ओरियो नावाची स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टीमही गुगलने सादर केली आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ही सिस्टीम असलेले फोन बाजारात येतील. भारतात हे स्मार्टफोन लोकप्रिय आहेत. ‘प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ असे आनंदन यांनी जाहीरच केले आहे. एखादी बाजारपेठ कशी ताब्यात घ्यावी, याचाही वस्तुपाठ लॅरी पेज आणि सर्गेई बिन यांच्या या कंपनीने समोर ठेवला आहे. उदा. भारतातील दुचाकींची लोकप्रियता! ‘भारत ही दुचाकींची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. दुचाकीचालकांची गरज कारचालकांपेक्षा वेगळी असते,’ असे ‘गुगल मॅप्स’च्या संचालिका मार्था वेल्श यांनी सांगितले. यासाठीच ‘गुगल मॅप्स’ने खास दुचाकीचालकांसाठी मार्ग दाखविणारी सुविधा सादर केली आहे, तीही आवाजावर चालणारी! याशिवाय गुगलचा व्हॉइस असिस्टंट (आवाजावर चालणारा हरकाम्या) आता ‘जिओ’च्या फीचर फोनमध्ये येणार आहे. अशा प्रकारची सुविधा फीचर फोनमध्ये असण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. 

हे सगळे काही अर्थातच धर्मादाय कार्य नाही, भारतीयांवर उपकार करायचे म्हणून नाही. त्यातून गुगलची खणखणीत कमाई होते. मार्च २०१७मध्ये कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीची उलाढाल २२ टक्क्यांनी वाढून ७२०८.९ कोटी रुपयांपर्यंत पोचली; मात्र नफा किती झाला, हे कंपनीने उघड केले नव्हते. तिची स्पर्धक कंपनी फेसबुकने भारतातील उलाढालीत ९३ टक्के वाढ झाल्याचा दावा केला होता, तर तिचा नफा ३१ टक्क्यांनी वाढून ७,२०८.९ कोटी रुपयांपर्यंत पोचला. आज जगातील ऑनलाइन जाहिरातींची ८० टक्के बाजारपेठ या दोन कंपन्यांच्या ताब्यात आहे. भारतात केवळ २५-३० टक्के वापरकर्ते असताना त्यांना एवढा नफा होत असेल, तर ९०-१०० टक्के झाल्यावर किती होईल, हे कोणीही सहज सांगू शकेल.  

आजच्या घडीला भारतीय भाषांची बाजारपेठ तेजीत आहे. ऑनलाइन हिंदी संकेतस्थळांचे ६० टक्के वाचक परदेशातील आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला केपीएमजी नावाच्या कंपनीने एक अहवाल सादर केला होता. त्यात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये ५३.६ कोटी लोक ऑनलाइन असतील आणि ते इंटरनेटचा वापर मातृभाषांमध्येच करतील. भारत ही त्यांची दुभती गाय आहे. वर्षाला सुमारे २२०० कोटी रुपयांच्या जाहिरातींचे दूध-दही ही गाय देते. म्हणून हे सगळे लाड आणि ही सगळी सरबराई. 

गुगलच कशाला, गुगलने पाठबळ दिलेल्या कंपन्यांच्याही आशा आता भारतावरच आहेत. ड्युओलिंगो ही इंग्रजी भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या अॅपची कंपनी असून, तिला गुगलने मदत केली आहे. गेल्या वर्षी या अॅपने हिंदीतून इंग्रजी शिकण्याची सोय आणली आणि त्यानंतर या अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये १३ पट वाढ झाली. आता या अॅपच्या मराठी, तमिळ इत्यादी भाषांच्या आवृत्या येत आहेत. 

तेव्हा आपण दुभती गाय आहोत हे लक्षात ठेवा आणि ते कशामुळे आहोत, हेही लक्षात घ्या. कारण हे सगळे आपल्याच जिवावर चालू आहे. लाड होताहेत तोपर्यंत करून घ्या!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search