Next
धवल यश मिळविणारा वीर...
BOI
Friday, April 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वीरधवल खाडे

जलतरणात धवल यश मिळवून जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केलेला खेळाडू म्हणजे वीरधवल खाडे. ऑलिंपिक वगळता इतर सर्व स्पर्धांमध्ये त्याने आतापर्यंत पदकांचे शतकही पूर्ण केले आहे... ‘क्रीडारत्ने’ या सदरात आजचा लेख आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडेबद्दल...
.................
कोल्हापूरच्या मातीत खरे तर रांगडा पैलवान जन्माला येतो; मात्र वीरधवल खाडे मात्र त्याला अपवाद आहे. वीरधवल अद्याप ऑलिंपिक पदक जरी मिळवू शकलेला नसला, तरी जागतिक स्तरावर त्याने देशाचे नाव निश्चितच मोठे केले आहे.

नरहर अमीन यांच्या मार्गदर्शनाखाली तो सध्या बेंगळुरू येथे सराव करत आहे. वरिष्ठ राष्ट्रीय विजेता असलेला वीरधवल ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील ब्राँझ पदकाने जागतिक स्तरावर नावाजला जाऊ लागला. पन्नास मीटर बटरफ्लाय प्रकारात त्याने हे पदक पटकावले होते. या प्रकारात १९५१ नंतर पदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला होता. १९५१ साली सचिन नाग याने अशी कामगिरी केली होती. इतकेच नव्हे, तर या स्पर्धेत जलतरणात जवळपास २४ वर्षांनी भारताला पदक मिळाले होते.

पुरुषांच्या पन्नास, शंभर आणि दोनशे मीटर फ्री-स्टाइल प्रकारातही वीरधवल सहभागी होतो. त्यात त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. २००८च्या बीजिंग ऑलिंपिकसाठी जेव्हा तो पात्र ठरला, तेव्हा तो भारताचा सर्वांत तरुण जलतरणपटू होता. या स्पर्धेत त्याला अपयश आले, तरी अनुभव मोठा मिळाला. पुढे एका दुखापतीमुळे २०१२च्या ऑलिंपिकला तो मुकला; पण पुन्हा एकदा पात्रता निकष पूर्ण करत त्याने २०१६च्या रिओ ऑलिंपिकची पात्रता मिळवली; मात्र त्याही वेळी त्याची कामगिरी त्याला दुसऱ्या फेरीच्या पुढे नेऊ शकली नाही. नायकी कंपनीचे प्रायोजकत्व त्याला मिळाले असून, त्यामार्फत तो देशात आणि परदेशात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. आतापर्यंत ऑलिंपिक वगळता इतर सर्व स्पर्धा मिळून त्याने पदकांचे शतकही पूर्ण केले आहे. केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन त्याचा गौरवही केला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असताना वीरधवलने सिंगापूरमधील स्पर्धेत सरस कामगिरी करत राष्ट्रकुलमध्ये पदकासाठी आशा पल्लवित केल्या आहेत. सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने ५० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या वेळी त्याने या स्तरावरील स्पर्धेत आपली २३.०२ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली.

सातत्याने दुखापतींचा सामना करताना गेल्या चार वर्षांत त्याला अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. रिओ ऑलिंपिकला रवाना होतानाही तो शंभर टक्के तंदुरुस्त नव्हता; मात्र त्याने तिथेही प्रयत्नांची शिकस्त केली. सिंगापूरमधील स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्वोत्तम सरावाची संधी होती आणि त्याने या फ्री स्टाइलमध्ये २२.५८ सेकंद, शंभर मीटर फ्री स्टाइलमध्ये ४९.४७ सेकंद, २०० मीटर फ्री स्टाइलमध्ये एक मिनिट ४९.८६ सेकंद, चारशे मीटरमध्ये चार मिनिटे ०१.८७ सेकंद आणि शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये ५२.७७ सेकंद अशी वेळ नोंदवत राष्ट्रकुल, आशियाई आणि राष्ट्रीय स्पर्धांमधील विक्रम साकार केले आहेत.

वीरधवलला महाराष्ट्र शासनाने मालवण येथे तहसीलदार पदावर आपल्या सेवेत सामावून घेतले; मात्र तो मुंबईबाहेर असल्याने त्याच्या दैनंदिन सरावावर बंधने होती. वारंवार सुट्टी घेऊन सरावासाठी बेंगळुरूला जाणेही कठीण होते. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपली समस्या लेखी कळवली होती. यंदाच्या मोसमात वीरधवलला राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत खेळायचे आहे, शिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धाही आहेत. अशा वेळी सराव मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याने पदकाची खात्री मिळते.

वीरधवलला येत्या डिसेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या ‘स्विमथॉन’  या जलतरण महोत्सवाचा ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तंदुरुस्तीबाबत बोलायचे झाले, तर मध्यंतरीच्या काळात तो जेव्हा स्पर्धेसाठी तंदुरुस्त नव्हता आणि काही स्पर्धांमध्ये त्याला सहभागीही होता आले नव्हते. तसेच त्याचा सरावही चुकायचा. या काळात त्याचे वजन १०५ किलो झाले होते; मात्र आता तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले व तब्बल वीस किलो वजन कमी केले, जेणेकरून हालचालींमध्ये विशेषतः पाण्यात उतरल्यावर चपळता येईल.

राज्य सरकारने त्याला मुंबईतील अंधेरी येथील तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारण्याची सूचना केली आहे. लवकरच तो ही सूत्रे स्वीकारेल. त्यामुळे त्याला अंधेरीजवळ असलेल्या खार जिमखाना येथे सराव करणे शक्य होणार आहे. राष्ट्रकुल, आशियाई असे एकेक टप्पे पार करत त्याला नोव्हेंबरमध्ये २०२० टोकिओ ऑलिंपिक पात्रता फेरीही खेळायची आहे. तसेच ऑलिंपिकसाठी फेब्रुवारीपर्यंत ज्या पात्रता फेऱ्या होतील त्यात सहभागी होत ऑलिंपिक कोटा मिळवायचा आहे. ज्या ऑलिंपिक पदकाने आजवर त्याला हुलकावणी दिली, ते त्याला टोकियोमध्ये मिळवायचे आहे आणि हेच त्याचे अंतिम ध्येय आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search