Next
नाट्यक्षेत्रातील अद्वितीय ग्रंथालय
मानसी मगरे
Sunday, August 13, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

१२४ वर्षांचा नाट्यक्षेत्राचा वारसा जिवंत ठेवून वाटचाल करणारी आणि अनेक दिग्गज रंगकर्मी घडवणारी पुण्यातील संस्था म्हणजे भरत नाट्य संशोधन मंदिर. नाटकाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या या वास्तूत येथील रंगमंचाच्या आधी सुरू झालेले एक अद्वितीय असे ग्रंथालय आहे. १९९३ पासून आजतागायत या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रंथपाल मोहन मुळे आणि संस्थेचे अध्यक्ष आनंद पानसे यांनी ग्रंथालय दिनाच्या निमित्ताने या ग्रंथालयाचा इतिहास उलगडला. त्यावर आधारित हा विशेष लेख...
......... 

ग्रंथपाल मोहन मुळे आणि अध्यक्ष आनंद पानसेभरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेच्या इतिहासात ग्रंथालय कधी सुरू झाले हे निश्चित सांगता येणार नाही. परंतु संस्थेमध्ये संशोधन विभाग उघडून नाट्यचित्र व ग्रंथसंग्रह करावा ही कल्पना १९०४मध्ये विश्वनाथ नरहर तथा भाऊसाहेब दातार संस्थेमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्या मनात रुजली गेली. पेशाने कंत्राटदार असलेले हौशी, सुखवस्तू व स्वभावाने जिद्दी असे भाऊसाहेब १९३०मध्ये एकदा दिल्लीला गेले असता तेथे काही आर्ट गॅलरीज त्यांच्या पाहण्यात आल्या. त्यांमध्ये ऐतिहासिक मुघल सम्राटांचे व त्यांच्या राण्यांचे स्वतंत्र व इतर अनेक चित्रसंग्रहांचे त्यांना दर्शन झाले. यावरून आपल्या महाराष्ट्रात असे काय करता येईल याचे विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू झाले. आपल्या संस्थेतही असे एखादे ग्रंथालय असावे असा विचार त्यांच्या मनात आला. याच विचाराने दिल्लीहून परत येताना त्यांनी स्वतःच्या संग्रहातील शेक्सपीअरच्या नाटकांची तब्बल साडेचारशे इंग्रजी पुस्तके सोबत आणली आणि ती संस्थेत दाखल केली. 

सोशल क्लब असे नाव असलेली भरत नाट्य मंदिरची जुनी इमारतसोशल क्लब या नावाने तेव्हा ही संस्था ओळखली जात असे. संस्थेसाठी काम करणारे सदस्य हे सर्वतोपरी स्वतःच्या प्रयत्नांतून आणि कोणताही मोबदला न घेता काम करणारे असेच होते. त्यामुळे संस्थेसाठी मिळवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी या देणगी स्वरूपात मिळवण्याकडे कल होता. सामाजिक विषयांवर आधारित बसवल्या जाणाऱ्या नाटकांचे मिळणारे मानधन संस्थेला मिळत असे. तसेच नाटकातील कलाकारांसाठी नाटकाच्या संहितेच्या ज्या प्रती खरेदी केल्या जात, त्यादेखील संस्थेत जमा केल्या जात असत. या माध्यमातून संस्थेचा संग्रह वाढत गेला. यानंतर मग पुढील काळात भरत नाट्यमंदिराच्या मंचावर सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक नाटकाची संहिता संग्रहात जमा करण्याची पद्धत रूढ झाली. १९८६-८७पर्यंत ही प्रथा कायम राहिली. 

१९७०मध्ये जेव्हा संस्थेचा रंगमंच बांधला गेला (आजचे भरत नाट्यमंदिर) तेव्हापासून उत्पन्नाचे एक साधन मिळत गेले. यातून मग नाटक या विषयाला अनुरूप अशी पुस्तके या ग्रंथालयासाठी विकत घेतली जाऊ लागली. पूर्वीचे ग्रंथपाल भावे यांच्या काळात पुस्तके विकत घेण्याचा प्रघात सुरू झाला. यातून पुस्तकांचा संग्रह वाढत गेला. या पुस्तकांसाठी लागणारी जी कपाटे होती, तीदेखील देणगी स्वरूपात मिळालेली आहेत आणि आज भरत नाट्यमंदिराच्या या ग्रंथालयात दिसणारी साजेशी अशी कपाटे दिसतात ती संस्थेने घेतली आहेत.  

भरत नाट्यमंदिराच्या ग्रंथालयाची मुहूर्तमेढ दातारांनी रोवली; पण त्यानंतर पटवर्धन, भागवत, घाणेकर व भावे यांचा हे ग्रंथालय उभे करण्यात मोलाचा सहभाग राहिला आहे. या सर्वांनी ग्रंथालयात पुस्तकांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यात खूप मेहनत घेतली. 
  
नाट्यचित्रसंग्रह 
तो काळ होता १९३६चा. आपला महाराष्ट्र नाट्यवेडा आहे. तेव्हा या गोष्टीला पोषक असे व संस्थेच्या ध्येयाला साजेसे असे कार्य करावे असा विचार केला गेला. यातूनच मग संस्थेचा संशोधन विभाग चालू करण्यात आला आणि नाट्यचित्र, ग्रंथ, नाट्यसंग्रह जमविण्याचे कार्य सुरू झाले. संशोधन करणे हे काम जिकिरीचे, कष्टाचे व खर्चाचे. त्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी आल्या. 

विशेषतः मराठी रंगभूमीची ज्यांनी सेवा केली अशा प्रसिद्ध नाट्यलेखकांचे, नट-नट्यांचे फोटो व ग्रंथसंग्रह प्रामुख्याने देणगी स्वरूपात मिळवायचे अशी योजना कार्यान्वित झाली. मराठी नाट्यसंमेलनांच्या अध्यक्षांचे फोटोही या पद्धतीने संग्रहित होऊ लागले. त्यानंतर भाऊसाहेब दातारांनी मोठमोठ्या मान्यवर व्यक्तींना संस्थेत निमंत्रित करून हा चित्रसंग्रह आणि ग्रंथसंग्रह दाखवण्यास सुरुवात केली. अशा भेटी दिलेल्या मान्यवरांचे या संदर्भातील अभिप्राय खूपच बोलके आहेत, ज्यांची नोंद आजही ग्रंथालयात आहे. या कार्यात त्यांना अप्पा गोखले यांची खूप मदत झाली. त्यानंतर माधवराव जोशी यांनी इंग्रजी व मराठी नाटकांची अनेक पुस्तके संस्थेला देणगी स्वरूपात दिली. १९३५पर्यंत इंग्रजी नाटकांची ४०० पुस्तके, जुनी व नवी नाटके अशी ३०० पुस्तके व इतर संदर्भवाङ्मयाची ३०० पुस्तके ग्रंथालयात दाखल झाली होती. त्यात पुढे वाढ होत गेली. १९७०पर्यंत ग्रंथालयात नाट्यविषयक दोन हजार पुस्तके होती. आजमितीला या पुस्तकांचा आकडा १० हजारच्याही वर पोहोचला आहे.

या नाट्यविषयक ग्रंथांमध्ये प्रामुख्याने नाटकांची पुस्तके नऊ हजारांच्या आसपास असून, त्यांमध्ये संगीत, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, फार्सिकल अशा सर्व प्रकारच्या विषयांना धरून असलेली पुस्तके आहेत. त्याचप्रमाणे बालनाट्यांची, एकांकिकांची जवळपास दीड-दोन हजार पुस्तके आहेत. संदर्भ ग्रंथसुद्धा एक हजारांपेक्षा जास्त आहेत. या ग्रंथांचा उपयोग संबंधित विषयात पीएचडी करणारे विद्यार्थी करून घेतात. या ग्रंथालयाचा उपयोग करून घेणाऱ्यांमध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. पीएचडी केलेल्या काहींनी आपले प्रबंध व पुस्तके ग्रंथालयास देणगी स्वरूपात दिली आहेत. 

ग्रंथालयाचा उपयोग पीएचडी अभ्यासात करणारे जसे आहेत, तसेच संस्थेचे सर्व सभासद, मराठी नाटकांत काम करणारे पुण्यातील अनेक रंगकर्मी, नाट्य विषयावर लिहिणारे लेखक, परीक्षक हेदेखील कैक वर्षांपासून भरत नाट्य संशोधन मंदिरातील या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा विद्यापीठांमधून नाटक विषयावर अभ्यास करणारे अनेक जण या ग्रंथालयातील पुस्तकांचा आधार घेत आहेत. या सभासदांच्या प्रयत्नांमुळे अनेक रंगकर्मींनी ग्रंथालयास पुस्तके देणगी स्वरूपात देण्याचे कार्य केले आहे. त्यांत प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाल्यास शुभांगी मांजरेकर, शरद चितळे, रमेश वामन पुरंदरे, वसंत शिंदे, विनायक गोडसे, य. मु. वैद्य, सुमती पळशीकर, अजित साखवळकर, संजय डोळे, कुमार दिघे, महादेव श्रीधर पारखी, रघुनाथ माटे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या सर्वांनी बहुसंख्य पुस्तके दिली आहेत.

ग्रंथालयाची वैशिष्ट्ये 
अलीकडे भरत नाट्य मंदिरातील या ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्या अटींमध्ये बसत असणाऱ्यांनाच ग्रंथालयाचे सदस्यत्व दिले जाते. यासाठी आवश्यक असलेल्या अर्जात या ग्रंथालयाशी जोडले जाण्याचा उद्देश, नाटक क्षेत्राशी असलेला संबंध अशा काही प्रश्नांचा समावेश आहे. यानुसार मग तरुण वयातील मुलांपासून विविध रंगकर्मी, अभ्यासक हे आज ग्रंथालयाचे सभासद आहेत. इतकेच नाही, ग्रंथपाल मुळे यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मागील १०-१२ वर्षांत आयटी आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रांतील लोकंही फावल्या वेळात इथे येताना दिसतात. अनेक दिग्गज रंगकर्मीही आज या ग्रंथालयाचे सभासद आहेत. या रंगकर्मींना लागणाऱ्या काही दुर्मीळ नाटकांच्या संहिता पुरवण्याचे काम ग्रंथालयामार्फत केले जाते.    

मोहन मुळेआज वाचन कमी झाले आहे असे म्हणता येणार नाही. परंतु वाचनाचे क्षेत्र विभागले गेले आहे. त्यामुळे काय वाचले पाहिजे हे आजच्या तरुण पिढीतील मुलांना समजणे आवश्यक आहे. असे असताना इथे येणारा ग्रंथालयाचा सभासद केवळ त्याला हवे असणारे पुस्तकच वाचतो असे नाही, तर नाटक आणि साहित्याचा अभ्यास असणारे ग्रंथपाल मुळे या सभासदांना वाचानासंदर्भात मार्गदर्शन करतात. विशेषतः तरुण मुले, अभ्यासक यांना याचा खूप फायदा होतो. केवळ ग्रंथालय चालवणे हा या संस्थेचा हेतू नसून, यातून लोकांना लाभ मिळावा हा हेतू ठेवून हे काम केले जाते. 

अभिनयवर्ग  
भरत नाट्य मंदिरातील ग्रंथालयाचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अभिनयवर्ग. या वर्गांमध्ये रंगमंदिरासाठी आणि अभिनयासाठी अनुकूल असणारे आणि आवश्यक असणारे असे शिक्षण दिले जाते. या वर्गासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा यांचे इत्थंभूत शिक्षण दिले जाते. हीच मुले मग आपसूक ग्रंथालयाकडे वळतात.   

डिजिटायझेशन 
काळ कितीही बदलला, लोक कितीही तंत्रज्ञानाने समृद्ध होत गेले तरी ग्रंथालये आणि त्यातील पुस्तके यांची ही परंपरा कायम राहणारी आहे. बदलत्या काळानुसार भरत नाट्य मंदिरातील या ग्रंथालयानेही कूस बदलली आहे. पूर्णतः नसले तरी डिजिटायझेशन प्रक्रियेला इथे अंशतः प्रारंभ झालेला दिसून येतो. प्राथमिक स्तरावर या ग्रंथालयातील पुस्तकांची नोंदणी डिजिटल स्वरूपात केलेली आहे. याचा पुस्तकाचे संदर्भ आणि क्रमांक शोधण्यासाठी उपयोग होतो, असे मुळे सांगतात. 

आचार्य अत्रे यांच्या 'मी मंत्री झालो' नाटकाची हस्तलिखित संहितामान्यवरांची हस्तलिखिते 
विविध साहित्यिक आणि नामवंत लोकांची हस्तलिखिते भरत नाट्यमंदिरातील या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. हे या ग्रंथालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इथे एक महत्त्वाचा संदर्भ मिळतो तो आचार्य अत्रे यांचा. अत्रे खंडाळ्यातील आपल्या फार्महाउसला असताना ‘मी मंत्री झालो’ हे नाटक लिहित होते. या नाटकाची त्यांच्या हस्ताक्षरातील संहिता आणि इतर संबंधित मजकूर लिहिलेली एक डायरी आजही ग्रंथालयात पाहायला मिळते. या लोकांची अशी हस्तलिखिते पाहायला मिळणे ही नाट्यप्रेमींसाठी एक मोठी मेजवानी आहे. ही हस्तलिखिते आणि यांसारखी अगदी १०० वर्ष जुनी पुस्तके ग्रंथालयाने व्यवस्थित जतन केली आहेत.    

ग्रंथालयात नाट्यविषयक प्रकाशित झालेल्या पुस्तकांबरोबरच ज्या नाटकांच्या संहिता छापल्या गेल्या नाहीत. परंतु त्या त्या वेळी त्या बक्षीसपात्र ठरल्या आहेत, अशा संहिता देणगी स्वरूपात दाखल झाल्या. अशा संहितांची संख्याही बरीच आहे. यासोबतच आज जसे एखादा नवीन चित्रपट आल्यानंतर सर्वच वर्तमानपत्रांतून त्याचे परीक्षण छापून येते, तसे साधारण एक ४०-५० वर्षांपूर्वी त्या वेळी रंगभूमीवर येणाऱ्या नाटकाचे परीक्षण छापून येत असे. अशा छापून आलेल्या नाटकांच्या समीक्षणाची कात्रणे कापून त्यांचा संग्रह बनविण्याचे काम पूर्वी अप्पा गोखले करत असत. आजही ते काम सुरू आहे. ग्रंथालयात नवनवीन पुस्तके उपलब्ध व्हावीत, त्याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असतात. यासाठी नवीन पुस्तके खरेदी करण्यातही पुढाकार घेतला जातो. तसेच मागील २०-२५ वर्षांपासून ग्रंथालयास देणगी स्वरूपात पुस्तके देणाऱ्यांचीही संख्या वाढत असून, यातून ग्रंथालय समृद्ध होत आहे.

संपर्क : (०२०) २४४७१ ६१४ / २४४८१ ६१४ 
.....................
ई-मेल : info@bharatnatyamandir.org
वेबसाइट : www.bharatnatyamandir.org

(ग्रंथालय आणि ग्रंथपाल दिवसानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होणारे सर्व लेख https://goo.gl/jG2iif या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

क्रोएशियाच्या राजदूतांची ग्रंथालयाला भेट
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashwini Ganapule About
Very nice collection अनमोल ठेवा
0
0

Select Language
Share Link
 
Search