Next
सोलापूरमधील मिरी गावात होते विजापूरच्या फुलांचे स्वागत
मोहन काळे
Monday, June 11, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this storyसोलापूर :
श्री प्रभुलिंग देवाच्या कृपेने पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मिरी (ता. मोहोळ) गावाने विजापूरच्या फुलांचे स्वागत करण्याची परंपरा आजही जपली आहे. त्याला कन्नड भाषेत ‘ध्वड्डाबा’ असे म्हटले जाते. गावातील एखाद्याच्या घरी मंगलकार्य असो वा एखादा आनंदाचा क्षण असो, त्या वेळी ‘ध्वड्डाबा’ साजरा केला जातो. या गावातील कल्लाप्पा महादेव पुजारी, भीमाशंकर प्रभू पुजारी, लक्ष्मण सोमण्णा पुजारी, बसवराज महादेव पुजारी, हुव्वाण्णा महादेव पुजारी, अमोगसिद्ध प्रभू पुजारी व सदाशिव रामचंद्र पुजारी यांनी एकत्रितपणे नुकताच ‘ध्वड्डाबा’ मोठ्या उत्साहात साजरा केला. 

बी. एम. पुजारी आणि त्यांचे बंधू सुरेश पुजारी यांनी विजापूरची फुले आणण्याच्या परंपरेबद्दलची एक आख्यायिका सांगितली. ती अशी - विजापुरातील त्या वेळच्या बादशहाचे गर्वहरण करण्यासाठी सिद्धटकी (सीलमटा) या संप्रदायातील अवधूतसिद्ध आणि बेळ्यानसिद्ध या नावांचे देव विजापूरला गेले होते. हे दोन्ही देव बादशहाच्या दरबारात असतानाच त्यांना तेथील मुद्दव्वा नावाची दासी दररोज बादशहाला त्याच्या बागेतील सुगंधी फुले आणून देत असल्याचे समजले. या देवांनी एक दिवस या दासीने आणलेल्या फुलांत बदल केला. त्यामुळे त्याला ही फुले वेगळीच वाटली. त्यानंतर तेथील सात बावडी नावाच्या विहिरीत या देवांनी मोठा दगड टाकला. पाण्यात तरंगणाऱ्या या दगडावर त्या बादशहाने नमाज पढला. त्यामुळे बेळ्यानसिद्धांना राग आला. तेव्हा त्यांनी या दगडावर सात सुपाऱ्या ठेवून त्या सुईच्या टोकाने उचलून दाखवल्या. त्यामुळे खूष झालेल्या बादशहाने या देवांना भोजनाचे आमंत्रण दिले. भोजनात त्याने सर्वांना गाईचे मांस वाढले. तेव्हा देवांच्या पानात वाढलेल्या मांसाची फुले झाली. इतरांच्या ताटातील मांस तसेच राहिले. तेव्हा या बादशहाचे गर्वहरण झाले. तेव्हापासून विजापूरची फुले सिद्धटकी देवस्थानात आणण्याची परंपरा सुरू आहे. ‘बादशहाने हिंदू देवतांच्या मूर्तिभंजनाची मोहीम हाती घेतली होती. त्याने वडापूरच्या देवळावर हल्ला चढवला आणि तो मिरी येथील श्री प्रभुलिंगाच्या देवळात आला. त्या वेळी श्रींनी मुस्लिम देवाचे रूप घेतले. त्यामुळे बादशहाने काहीही नुकसान केले नाही. जाताना त्याने मंदिराला एकशे एक एकर जमीन इनाम म्हणून दिली. ती जमीन आजही आम्ही पुजारी बंधू कसत आहोत,’ असे सुरेश पुजारी यांनी सांगितले. ‘ही फुले आणताना कुटुंबातील ज्येष्ठ मुलाच्या डोक्यावर कांबळ दिली जाते. म्हणून त्याच्या डोक्यावरील ओझे कमी झाल्याचे समाधान मिळते,’ असेही सुरेश पुजारी यांनी सांगितले. ‘ध्वड्डाबा’ खर्चिक असला, तरी प्रत्येक जण आपापल्या परीने ही परंपरा जपत आला आहे. ‘ध्वड्डाबा’ हा कानडी शब्द आहे. याला काही जण ‘ध्वड्डा हब्बा’ म्हणतात. मराठीत त्याचा अर्थ ‘मोठा सण’ असा होतो. कोणी हे वैयक्तिक पातळीवर करतात, तर कोणी सामुदायिकपणे करतात. त्यात खर्च यजमान करत असले, तरी उत्सव मात्र संपूर्ण गावाचा असतो. मराठी व कन्नड भाषक त्यात उत्साहाने सहभागी होतात.सोलापुरात अलीकडेच झालेला ध्वड्डाबा तीन दिवस सुरू होता. पहिल्या दिवशी विजापूरच्या फुलांचे स्वागत झाले. भीमा नदीच्या पैलतीरी फुले आणायला गेलेल्या लोकांचे होडीतून ऐलतीरी आगमन झाल्यावर त्यांचे व आणलेल्या फुलांचे भाविकांनी मोठ्या उत्साहात वाजत-गाजत स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. अलीकडच्या काळात विजापुरातून आणली जाणारी ही फुले कागदी असतात आणि ती तेथील गुरूंकडून आणली जातात. या गुरूंना होगार असे म्हणतात.आणलेली फुले भाविकांच्या दर्शनासाठी गावातील मारुतीच्या मंदिरात ठेवण्यात आली. त्यानंतर गावातून पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. याच वेळी गावातील हौशी कलाकारांनी अनोख्या पद्धतीने ढोल वाजवण्याची आपली कला सादर केली. त्यानंतर श्रींच्या पालख्या पुजारी परिवाराच्या घरी विसावल्या. दरम्यानच्या काळात श्रींची आरती झाल्यावर जमलेले गावकरी व भाविकांना प्रसाद म्हणून भोजन देण्यात आले. त्यात आंबील खिचडा, ज्वारी व बाजरीची कडक भाकरी, सांबार, अस्सल शेंगदाणा चटणी, मसाला वांगे व भात आदी पदार्थांचा समावेश होता. त्यानंतर रात्री कानडी ओव्यांचा जागर झाला. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चार वाजताच श्रींच्या पालख्यांचे व विजापूरहून आणलेल्या फुलांचे श्री प्रभुलिंग मंदिराकडे प्रस्थान झाले. विजापूरहून आणलेल्या फुलांचे मानकऱ्यांनी वाटप केले. श्रींच्या महाआरतीनंतर आंबील भाताच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी कानडी गाणी व कथा सांगितल्या. साधारण दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास गुग्गुळाची आगळीवेगळी मिरवणूक निघाली. चार प्रदक्षिणा मंदिरातून, तर एक प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरून घालण्यात आली. मातीचे मोठे मडके अर्धे कापून त्या मडक्याला आकर्षक सजवून त्यात अग्नी प्रज्वलित केला जातो. त्याला गुग्गुळ असे म्हटले जाते. अशा पद्धतीच्या गुग्गुळाची मानकऱ्यांनी डोक्यावरून मिरवणूक काढली. श्रींच्या नावाचा जयघोष व अस्सल हळदीच्या भंडाऱ्याची उधळण या वेळी करण्यात आली. त्यानंतर सात गावच्या वालग्यांकडून (मानाचे ढोलवादक) कर तोडून कार्यक्रमाची सांगता झाली. 

ज्येष्ठ मुलाच्या डोक्यावर ठेवलेली कांबळ/घोंगडी या सात वालग्यांनी हात लावून खाली काढायची असते. विजापूरच्या फुलांसोबतच नैसर्गिक रंगही (पावडर स्वरूपात) आणलेला असतो. त्याचे सात ढीग केले जातात. त्यासोबत डाळ, खारीक, खोबरं याचेही सात ढीग केले जातात. त्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवली जाते. यातील प्रत्येक ढीग एकेका वालग्याला मानाने दिला जातो. सांगतेच्या या सगळ्या कार्यक्रमाला कर तोडणे असे म्हणतात. एकंदरीतच, संपूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. 

(आणखी काही फोटो आणि या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रभू शिवलिंग पुजारी, वडापूर, ता. द. सोलापूर About 282 Days ago
अतिशय चांगला उपक्रम झाला. ऎतिहासिक माहिती जतन केली. पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
0
0
अशोक भोई About 286 Days ago
चांगली बातमी
1
0
Ogasiddha pujari About 286 Days ago
1 no. 👆👌👌👍
0
0

Select Language
Share Link