Next
केशवजी नाईक फाउंटनचे वास्तुसौंदर्य
BOI
Saturday, December 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पुनरुज्जीवित केशवजी नाईक फाउंटन‘केशवजी नाईक फाउंटन अँड क्लॉक टॉवर’ ही मुंबईतील एक पुरातन वास्तू आहे. २०१५मध्ये या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्यात आले. वास्तुसौंदर्याच्या दृष्टिकोनातून या वास्तूची वैशिष्ट्ये उलगडून सांगणारा ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांचा हा लेख...
...........
सन १८६४मध्ये मुंबई शहर विस्ताराच्या प्रस्तावातून तत्कालीन गव्हर्नरने फोर्ट भोवतालच्या तटभिंती पाडल्या. मुंबई शहराचा विस्तार फोर्ट परिसराबाहेर झाल्यामुळे सरकारच्या वतीने अनेक प्रकारच्या सार्वजनिक, शैक्षणिक व इतर कार्यालयांसाठीच्या इमारती बांधण्याच्या कामाने वेग घेतला. सधन एतद्देशीय व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन भायखळा, तसेच परळ येथील मोकळ्या जागेत मोठ्या आकारातील खासगी घरे आणि व्यावसायिक इमारती बांधण्यास सुरुवात केली. तत्कालीन शहर व्यवस्थेत नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त गरजा पुरवण्यासाठी, समाजोपयोगी इमारतींची उणीव भरून काढण्यासाठी समाजातील धनिक स्वेच्छेने पुढे येत असत. सार्वजनिक पाणपोई ही त्यातलीच एक व्यवस्था होती! 

केशवजी नाईक फाउंटन - पुनरुज्जीवनाआधी आणि पुनरुज्जीवनानंतर

सार्वजनिक पाणपोई बांधण्यामागचा इतिहास थोडक्यात असा - मुंबई पूर्व बंदर विकसित झाल्यानंतर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी किनाऱ्यालगत मोठमोठ्या वखारी बांधल्या गेल्या. अशा वखारींचे साम्राज्य मस्जिद बंदर ते वडाळा स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. आजही त्या वखारी कार्यरत आहेत. मुंबई शहरात बंदिस्त नलिकेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली असली, तरी मुख्य शहरापर्यंत मोलमजुरीसाठी येणारा मजूर वर्ग उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पित असे. त्यामुळे अनेक लोक असाध्य रोगांना बळी पडत. जेव्हा रोगाचे प्रमाण वाढत गेले, तेव्हा ब्रिटिश सरकारने अस्वच्छ विहिरी बंद करून त्या जागेत अथवा जवळपासच्या मुख्य चौररत्यावर पाणपोई किंवा फाउंटन बांधण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन एतद्देशीय धनिक समाजकार्य किंवा धार्मिक भावनेतून पाणपोई बांधण्याच्या कार्याला प्राधान्य देत असत. परंतु गरजूंना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे या एकमेव उद्देशाने या कार्याकडे न पाहता त्या इमारती अनंत काळ टिकाव्यात व त्या कलात्मक दृष्टिकोनातूनही बांधल्या जाव्यात, याकडेही त्यांचा कल असे. प्राचीन दक्षिण मुंबईतील अनेक पाणपोया अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. 

सन २०१४मध्ये एसएनडीटी आणि रुईया कॉलेज यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील पन्नास पाणपोया किंवा फाउंटन्सची नोंद केली आहे. या नोंदीत, मस्जिद बंदर (पश्चिम) येथील भात बझार परिसरात मिरची गल्लीच्या मध्यावर असलेल्या केशवजी नाईक फाउंटनचाही उल्लेख आहे. वास्तुसौंदर्याच्या दृष्टिकोनातून या फाउंटनची काही वैशिष्ट्ये आपण पाहू या.

केशवजी नाईक यांची अर्धप्रतिमा आणि दगडी कमानी

पूर्व-पश्चिम पायऱ्या आणि कठड्यांवरील नंदीकेशवजी नाईक हे प्रसिद्ध गुजराती व्यापारी होते. त्यांची अर्धप्रतिमा उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या मध्यावर चपखलपणे बसवली आहे. जागेच्या अभावामुळे फाउंटनचा आराखडा अष्टकोनी आकारात बनवण्यात आला आहे. या जागेत एका वेळी चार व्यक्ती पाणी पिऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. या छोटेखानी अष्टकोनी आकाराला उत्तर व पूर्व-पश्चिम भुजेवर दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांची ठेवण दक्षिणोत्तर रहदारीनुसार ठेवली आहे. पशु-पक्ष्यांनाही सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने कुंडांची रचना केलेली आहे, असे वाटते. तसेच किमान आकारातील जोत्यावरील भाग उंच दिसण्यासाठी सडपातळ आकारातील स्तंभ ठेवणीतील कल्पकता व वास्तुसौंदर्य खुलवण्यातील वास्तुविशारदाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. 

छतातील पोकळी

अष्टकोनी वास्तूसाठी चार प्रकारचे नैसर्गिक दगड वापरले आहेत. यातील चार फूट उंच जोते व कुंडासाठी काळा बेसॉल्ट, अष्टकोनी भिंतींसाठी मालाड खाणीतील फिकट पिवळसर बेसॉल्ट दगड व बारा स्तंभातील रेड स्टोन (धोलपूर) आणि नक्षीदार कमान व बटरेसेससाठी पोरबंदर येथील पिवळ्या चुनखडी दगडाचा वापर केला आहे. सर्व स्तंभाचा अर्ध-व्यास भिंतीत दाबला आहे. त्यामुळे स्तंभ व भिंत हे फाउंटनचे वेगळे घटक वाटत नाहीत! जोत्यावरील रेड स्टोन स्तंभाचे तळखडे व कॅपिटलवरील कमळ फुलासमान दिसणाऱ्या उलटसुलट पाकळ्यांतील एकसलग लयबद्धता दर्शकाचे लक्ष खिळवून ठेवते. स्तंभ व भिंतीपासून बाहेर काढलेल्या पिवळ्या दगडातील कोरीव नक्षीदार बटरेसेस आणि कमानी एकूण वास्तूची शोभा वाढवतात. डोमवजा दिसणारे छत हेमाडपंत शैलीत बांधले आहे. पाण्याची टाकी व घड्याळ देखभालीसाठी छताच्या तळात पोकळी ठेवली आहे. 

डोळ्याच्या आकारासारखे कुंड

नंदी, पायऱ्या आणि तळखडे

इमारतीच्या उत्तर दिशेतील पायऱ्यांच्या पूर्व-पश्चिम कोनात दोन्ही बाजूंना दगडी कुंडे आहेत आणि तिसरे कुंड दक्षिण दिशेस आहे. यासाठी बेसॉल्ट दगड वापरला आहे. या कुंडात जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जात असे. या तिन्ही कुंडांत बंदिस्त नलिकेद्वारे पाणी-जोडणी केली आहे. कुंडाचा आकार सुंदर स्त्रीच्या डोळ्यांसारखा असून, कुंडाची वळणदार त्रिपदरी किनार आणि आतील घडण गुळगुळीत आहे. नागरिकांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था मध्यवर्ती जागेत आहे. त्या जागेत जाण्यासाठी ठेवलेल्या दगडी पायऱ्यांलगत घडीव कठडा व पूर्व-पश्चिम दिशेतील पायऱ्यांना जोडणाऱ्या मध्य जागेलगत वळणदार कठडे असून, दोन्ही बाजूंना सुबक कोरीव नक्षीकामातील बैठे नंदी आहेत. तत्कालीन काळात लांबच्या प्रवासासाठी घोडागाडी व जड सामान वाहण्यासाठी बैलगाडी हेच प्रमुख साधन होते. फाउंटनच्या जोत्यावरील तिन्ही दिशेला असलेली नंदीशिल्पे हे त्याचेच निदर्शक आहे! माणसाप्रमाणे पशूंनाही पाण्याची आवश्यकता असते, या विचारातून आराखड्यात कुंड रचना समाविष्ट करण्यात आली आहे. हेच या फाउंटनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 

संगमरवरी फलक

इमारतीच्या पूर्वेकडील दगडी जोत्यावरील संगमरवरी फलकावर प्रमुख देणगीदार केशवजी नाईक यांचे नाव आणि इतर मजकूर कोरलेला आहे. फाउंटनचे लोकार्पण आठ जानेवारी १८७६ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर फिलीप एडमंड वुडहाउस यांच्या हस्ते झाले असा उल्लेख आढळतो. बांधकामाचा खर्च २३ हजार रुपये झाल्याची नोंदही आढळते.

घड्याळ, हत्ती, मोर, नक्षीकाम आणि वायुविजनासाठीच्या खिडक्याइमारतीच्या छपरावर उत्तर-दक्षिण दिशेस घड्याळ व पूर्व-पश्चिमेस वायुविजनासाठी घड्याळाच्या आकारातील गोलाकार खिडक्या बसवलेल्या आहेत. घड्याळाच्या देखभालीसाठी छताच्या तळभागातून जाण्याची सोय असावी. आकाशाच्या दिशेने निमुळत्या होत गेलेल्या दगडी छताच्या बाह्यपृष्ठ पटलाचा आधार घेऊन काही भाग हत्ती, मोर व फुलाच्या आकारात सुशोभित करण्यात आला आहे. हा आकार व त्यावरील कलाकुसर मूळ वास्तूशी जुळत नाही. तो भाग नंतरच्या काळात जोडला गेला असावा, अशी शंका बांधकाम साहित्य, बांधणी व विजोड शैलीतून दिसून येते! असे का असावे, याचा अंदाज लागत नाही! 

२०१५मध्ये फाउंटनचे पुनरुज्जीवन आणि लोकार्पण झाले. पुनरुज्जीवीत वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख नवीन कोनशिलेतील माहितीतून समजतो. या सौंदर्यपूर्ण पुरातन इमारतीचे पुनरुज्जीवन, संवर्धन वास्तुविशारद राहुल चेंबूरकर यांनी केले आहे. मुंबई महापालिकेने या पुरातन इमारतीला ‘ग्रेड २-अ’चा दर्जा देऊन गौरवले आहे.

बैलगाड्यांतून केल्या जाणाऱ्या जड मालवाहतुकीची जागा आता तीन चाकी रिक्षावजा वाहनांनी घेतली आहे. फाउंटनच्या आजूबाजूस असलेल्या एकंदर गर्दीमुळे परिसरात एक स्क्वेअर फूटही मोकळी जागा दिसणे अवघड होते. सीलबंद बाटल्यांतून हवे तेव्हा हवे तेवढे पाणी आता उपलब्ध आहे. तरीही पाणपोईतील पाणी पिणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, अशी माहिती पाणीवाटप करणाऱ्या व्यक्तीने दिली.फाउंटनभोवतालचा रस्ता सर्व प्रकारची वाहने व माणसांनी दिवसभर गजबजलेला असतो. एकेकाळी अवजड सामानाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची जागा आता रिक्षा व छोट्या टेम्पोंनी घेतली आहे. या रस्त्यावर ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ एका जागेवर उभे राहणे अशक्य आहे. या सत्यतेचा अनुभव मी माझे मित्र राजेश मोदींसोबत घेतला आहे. त्यांनी इमारतीचे सर्वेक्षण व छायाचित्रे काढताना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार.सर्वेक्षण करताना खटकलेल्या काही गोष्टी अशा - वास्तविक पाहता मूळ रचनेत घडीव दगडात बनवलेल्या कोनाड्यातून नलिकेद्वारे पाणी पिण्याची व्यवस्था असल्याचे दिसून येते. प्यायल्यानंतर उरलेल्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याचा मार्ग बंदिस्त नलिकेदारे थेट तिन्ही कुंडांत नेऊन तेथे पाणी साठवण्याची सोय असावी. असे पाणी पशू-पक्ष्यांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ती रचना होती. अशा पूर्वापार पद्धतीला काटशह देऊन आता अर्ध्या उघड्या असलेल्या रांजणातील पाणी तांब्याच्या भांड्यातून दिले जाते. बहुतांश लोक अर्धेअधिक पाणी फेकून देतात. त्यामुळे, आजूबाजूची जागा सतत ओली व अस्वच्छ राहते. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

वाहने चोरीस जाऊ नयेत, म्हणून नंदीच्या गळ्यात लोखंडी साखळी अडकवणे, तसेच पुरातन इमारतीचे सीमांकन निश्चित करणारे काही घडीव दगड अस्ताव्यस्त पडल्याचे चित्र व्यथित करणारे आहे. किरकोळ वस्तूंची विक्री करणारे विक्रेते या दगडाचा व जागेचा वापर विविध प्रकारे करताना दिसतात.

पाणपोईजवळ असलेला फलक

सर्वेक्षण करताना स्थानिकांबरोबर साधलेल्या संवादातून मनात काही विचार आले. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक शौचालयाची इमारतदेखील याच पाणपोईजवळ बांधली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणाऱ्या मुंबई महापालिकेने लावलेल्या फलकाखाली मांडलेल्या दृश्यातून स्थानिक व कामधंद्यानिमित भेट देणाऱ्या नागरिकांना आवश्यक असलेल्या व्यवस्थेच्या पूर्ततेतील विरोधाभास दिसून येतो. थोडक्यात, या परिसरात शिस्तीचा अभाव आहे. एकेकाळी परिसराचे सौंदर्य खुलवणाऱ्या व सामाजिक गरजेची पूर्तता करणाऱ्या व उदात्त भावनेतून समाजसेवी व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या समाजोपयोगी इमारतीच्या परिसराचे वर्तमान रूप वाईट आहे. काळानुरूप निस्तेज झालेल्या पुरातन वास्तूचे पुनरुज्जीवन झाले खरे; परंतु उद्देश साध्य झाला नाही. मग पुनरुज्जीवन करून नेमके काय साधले, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणूनच या परिसराचे चित्र बदलणे गरजेचे आहे! वास्तूच्या पुनरुज्जीवनाबरोबरच आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यही अबाधित राखणे आवश्यक आहे, याची संबंधित घटकांनी नोंद घेणे आवश्यक आहे. 

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(आणखी काही पुरातन वास्तूंचे सौंदर्य उलगडून दाखवणारे चंद्रशेखर बुरांडे यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
संजय आढाव About 307 Days ago
लेख आवडला.
0
0
मनमोहन चोणकर About 312 Days ago
आपण या वास्तूचे अतिशय परखडपणे परीक्षण केले आहेत अश्या हेरिटेज वास्तूचे जतन व संरक्षण करणे महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे असे मला वाटते
1
0

Select Language
Share Link
 
Search