Next
‘ठाण्यात उभे करणार पुस्तकांचे गाव’
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची ठाणे ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा
प्रशांत सिनकर
Wednesday, December 05, 2018 | 10:58 AM
15 0 0
Share this storyठाणे : ‘सातारा जिल्ह्यातील भिलारप्रमाणे ठाणे जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून, ठाण्यातील दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे,’ अशी घोषणा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली.

ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ‘ठाणे ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. चार व पाच डिसेंबर २०१८ रोजी होत असलेल्या या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. मराठी ग्रंथसंग्रहालयात प्रथमच दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.

या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक सु. हि. राठोड, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, उपाध्यक्ष अरुण म्हात्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती, कार्यवाह चांगदेव काळे, क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

नार्वेकर म्हणाले, ‘फ्लायओव्हर, मेट्रो ही विकासाची कामे म्हणजे ठाण्याची इंद्रिये आहेत; पण ग्रंथसंग्रहालयासारख्या वास्तू म्हणजे ठाण्याचा आत्मा आहेत. या वास्तूंमुळे ठाणेकर रहिवाशांना सांस्कृतिक भान मिळत आहे. इतर शहरांतही इंद्रियांची वाढ होते, पण ठाण्यात इंद्रियांबरोबर आत्म्याची वाढ होताना दिसते आहे. ठाण्याचा रहिवासी म्हणून विद्यार्थिदशेपासूनच ग्रंथसंग्रहालयात येत होतो. दादोजी कोंडदेव स्टेडियममधील साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलो; पण तेव्हा ग्रंथ विकत घेण्याची परिस्थिती नव्हती. आता या वास्तूत येऊन ग्रंथ विकत घेण्याची परिस्थिती निर्माण झालीय. आज तरुणांमध्ये वाचनाचे प्रमाण सकृतदर्शनी दिसत नसले, तरी मोबाइल, आयपॅड, ई-बुकच्या माध्यमातून आवड वाढलेली आहे. यामुळे तरुणांना पुन्हा एकदा वाचनाच्या गरजेकडे ओढण्यासाठी, जुन्या पद्धतीचा पुस्तकांचा सांस्कृतिक ठेवा नवीन पद्धतीने जपण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भिलारप्रमाणे ठाण्यात पुस्तकांचे गाव निर्माण करण्याचा प्रयत्न डीपीडीसी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येईल.’

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात साहित्य उत्सव साजरा होत असतो. यानुसारच ठाणे जिल्ह्यात ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यात प्रथमच दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. ठाण्यातील दुर्मीळ ग्रंथ डिजिटायझेशनद्वारे जतन करण्याचा प्रयत्न होत आहेच, त्याचबरोबर ठाण्यातील दुर्मीळ वस्तूंच्या जतनासाठी मुंबईच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’च्या धर्तीवर वस्तुसंग्रहालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.

या वेळी ‘ग्रंथांनी मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावर बोलताना लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे म्हणाले, ‘ आपल्या आयुष्याची सुरुवात बाराखडीच्या पुस्तकापासून होते, ती ज्ञानकोशांपर्यंत जाते. ग्रंथ आपल्यासोबत वाढतात, प्रवास करतात, आपल्याशी बोलतात. मौखिक परंपरेतून लिखाणापर्यंत झालेला ग्रंथांचा प्रवास आपल्याला समृद्ध करत जातो.’

साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांनी फक्त वाचन न करता लिहिण्याचाही प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. परिसंवादाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध विज्ञान लेखक अ. पां. देशपांडे म्हणाले, ‘ग्रंथांमुळे भाषा सुधारते. वैचारिक पातळी सुधारते. चरित्र वाचनामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो.’ प्रसिद्ध सूत्रसंचालिका वासंती वर्तक यांनी ग्रंथ आपल्याला चांगले जगायला, चांगले व्यक्त व्हायला, चांगले माणूस व्हायला शिकवत असल्याचे नमूद केले.

यानंतर अशोक बागवे, राजीव जोशी, सतीश सोळांकुरकर, भगवान निळे, साहेबराव ठाणगे, आदित्य दवणे, वृषाली विनायक, नितल वढावकर, संकेत म्हात्रे यांनी काव्यसंमेलनात भाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश आकेरकर यांनी केले. या वेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह अनिल ठाणेकर, महादेव गायकवाड, संजीव चुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

(भिलार या पुस्तकांच्या गावाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link