Next
राबणाऱ्या हातांसाठी संघर्ष करणारा नेता
BOI
Tuesday, January 29, 2019 | 03:19 PM
15 1 0
Share this article:

कोणे एके काळी मुंबईत फुटपाथवर झोपावे लागलेले जॉर्ज फर्नांडिस पुढे कामगारांच्या हक्कांसाठी मुंबई बंद करणारे पहिले कामगार नेते ठरले. पोखरण अणुचाचणी, कारगिलचे युद्ध, कोकण रेल्वे अशा देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या आणि रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात घडल्या. प्रत्येक घटकाच्या न्यायासाठी संघर्ष करणारा हा समाजवादी नेता प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या कामाचा, वेगळेपणाचा ठसा उमटवून गेला. २९ जानेवारी २०१९ रोजी, वयाच्या ८८व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
.........
सियाचेन ही जगातील सर्वांत उंचावर असलेली युद्धभूमी आहे. हाडे गोठवून टाकणाऱ्या तेथील वातावरणात भारतीय जवान पहारा देत असतात. जवानांना नेमके काय अनुभवावे लागते, हे स्वतःला कळण्यासाठी, त्याची प्रचीती येण्यासाठी तब्बल ३२ वेळा तिथे भेट देणारे संरक्षणमंत्री म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. १९९८ ते २००४ या कालावधीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये जॉर्ज संरक्षणमंत्री होते. २००३मध्ये त्यांनी सियाचेनला ३२व्यांदा भेट दिली. हा एक वेगळ्या प्रकारचा विक्रमच आहे. जवळपास दर सहा महिन्यांनी ते सियाचेनला जात. एवढेच नव्हे, तर जवानांना सियाचेनमध्ये किती कठीण परिस्थितीशी दोन हात करावे लागतात, याची कल्पना संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यावी, म्हणून त्यांनी त्यांचाही दौरा सियाचेनमध्ये आयोजित केला होता. ५० अंश सेल्सिअसहून अधिक तापमान असताना राजस्थानमधील वाळवंटी भागात, बर्फ पडत असताना काश्मीरमध्ये आणि अतिवृष्टी होत असताना ईशान्ये भारतातील लष्करी ठाण्यांना संरक्षण मंत्रालयातील नोकरशहांनी भेट द्यावी, असा त्यांचा आग्रह असायचा. 

लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करण्यापासून सुखोई विमानातून उड्डाण करण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी जॉर्ज यांनी केल्या, ज्या त्यांच्या आधीच्या संरक्षणमंत्र्यांनी केल्या नव्हत्या. संरक्षण खात्यासाठी अर्थसंकल्पात केली जाणारी तरतूद मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे कामही त्यांनीच पहिल्यांदा केले. पोखरणमधील अणुचाचणी (१९९८) आणि कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय - १९९९) या देशाच्या इतिहासातील दोन अत्यंत महत्त्वाच्या घटनाही फर्नांडिस यांच्याच संरक्षणमंत्रिपदाच्या काळातीलच. कॉफिन गेट अर्थात जवानांच्या पार्थिव देहांसाठीच्या शवपेट्यांच्या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला; मात्र नंतर बऱ्याच कालावधीने सीबीआयने ते या बाबतीत निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. 

२००० साली घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ‘तोपर्यंतचे सर्वोत्तम संरक्षणमंत्री’ असा मान त्यांना मिळाला. अर्थात, अशा मानांसाठी ते काम करतच नव्हते. त्यांच्या समाजवादी व्यक्तिमत्त्वाला कायम दिसे तो समाजातील अन्याय. सुरुवातीपासूनच त्यांच्या जीवनप्रवासात अनेक वळणवाटा आल्या. मंगळुरूमधील (त्या वेळचे मेंगलोर) एका मध्यमवर्गीय कॅथलिक कुटुंबात तीन जून १९३० रोजी जन्माला आलेले जॉर्ज सहा भावंडांत सर्वांत मोठे होते. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वकील व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती; मात्र त्यांना त्यात रस नव्हता, असे त्यांनी एकदा मुलाखतीत सांगितले होते. रोमन कॅथलिक धर्मगुरू होण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि १६व्या वर्षी ते बेंगळुरूमधील सेंट पीटर्स सेमिनरीत दाखल झाले. १९४६ ते १९४८ या कालावधीत सुमारे अडीच वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी ते तिथून बाहेर पडले. ‘चर्चच्या उक्ती आणि कृतीमध्ये खूप फरक आहे,’ असे त्यांनी नंतर एकदा सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मेंगलोरमधील हॉटेल्स, रेस्तराँ आणि वाहतूक क्षेत्रातील अन्याय झालेल्या कामगारांना एकत्र करायला सुरुवात केली. 

१९४९मध्ये ते मुंबईला आले. तिथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. नोकरी नसतानाच्या काळात काही रात्री तर त्यांनी अक्षरशः चौपाटीवर किंवा फुटपाथवर झोपून काढल्या. काही काळ त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रूफ-रीडर म्हणून नोकरीही केली. दरम्यानच्या काळात कामगार नेते प्लासिड डिमेलो आणि समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्याशी त्यांची गाठ पडली. या व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. छोट्या उद्योगांतील कामगारांच्या हक्कांसाठी ते लढू लागले आणि त्यातूनच त्यांच्या नेतृत्वाला आकार मिळाला. 

नंतरच्या दोन दशकांत ‘स्ट्रायकिंग जॉर्ज’ (बंदसम्राट) अशीच त्यांची ओळख बनली. १९५०च्या दरम्यान ते मुंबईतील प्रमुख कामगार नेते म्हणून उदयाला आले. मुंबईला ‘बंद’ करणारे ते पहिले कामगार नेते ठरले. कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संप करण्यात आले. त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते दोनदा निवडून आले. १९६७मध्ये त्यांनी संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून निवडणूक लढवली आणि स. का. पाटील या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला हरवून पहिल्यांदा खासदार झाले. नंतर ते एकूण नऊ वेळा खासदार झाले.

१९७४मध्ये ते ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशनचे अध्यक्ष असताना देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप २० दिवस चालला होता. त्या वेळी अन्य अनेक संघटना आणि युनियन्सचा पाठिंबा त्यांना मिळाला होता. त्या वेळी सरकारला गुडघे टेकायला लागले होते. वर्षभरानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीसाठी हेही एक कारण होते, असे म्हटले जाते. 

आणीबाणीच्या कालावधीत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर ते मुंबईत भूमिगत झाले. नंतर गुप्तपणे बडोद्याला गेले. तेथे समविचारी व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन इंदिरा गांधींचा पराभव करण्यासाठीच्या धोरणांसंदर्भात चर्चा करण्यात आली. (कोणालाही इजा होऊ न देता) इंदिरा गांधींच्या सभांआधी सभास्थळी काही स्फोट घडवून आणून इशारा देण्याचे ठरवण्यात आले. मात्र १९७६मध्ये ‘बडोदा डायनामाइट केस’मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची मुक्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी इंदिरा गांधींशी संपर्क साधला होता. त्यापुढे जानेवारी १९७७मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. जनता पार्टी आणि सहकारी पक्ष सत्तेवर आले. मोरारजी देसाई पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले. तिहार तुरुंगातून निवडणूक लढवलेले, प्रचारासाठी एकदाही मतदारसंघात जाऊ न शकलेले जॉर्ज फर्नांडिस बिहारमधील मुझफ्फरपूरमधून निवडून आले. त्यानंतर ते केंद्रीय उद्योगमंत्री झाले. खासदारकीच्या या कार्यकाळात त्यांनी मुझफ्फरपूरमध्ये दूरदर्शन केंद्र, कांती औष्णिक विद्युत केंद्र आणि लिज्जत पापड फॅक्टरी सुरू केली. महिला सबलीकरणावरही त्यांचा भर होता. नोव्हेंबर २०१४मध्ये कांती औष्णिक विद्युत केंद्राला फर्नांडिस यांचे नाव देण्यात आले. 

१९८८मध्ये जनता पार्टीपासून तयार झालेल्या जनता दलात फर्नांडिस यांनी प्रवेश केला. १९८९-९० या कालावधीत ते व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. मेंगलोर आणि मुंबई या दोन बंदरांना जोडणाऱ्या कोकण रेल्वेचे स्वप्न बॅ. नाथ पै यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासोबतच मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचाही ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. कोकण रेल्वे ही स्वतंत्र भारतातील रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत मोठी घडामोड ठरली. फर्नांडिस यांची मातृभूमी असलेले मंगलोर म्हणजे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारी पट्ट्याचे एक टोक. या किनारी मार्गावरून रेल्वे वाहतूक असावी, असे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात फर्नांडिस यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘रेल्वेमंत्री म्हणून जॉर्ज यांनी अत्यंत धोरणात्मक निर्णय घेतले आणि निधीसाठी वैशिष्ट्यपूर्ण धोरण राबविले. त्यांचे ध्येय आणि दूरदृष्टी यांमुळेच देशाला हा अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वेमार्ग मिळाला. या मार्गामुळे प्रवासाचे अंतर ६५० किलोमीटरने आणि १२ तासांनी कमी झाले. कोकण रेल्वे हे फर्नांडिस यांचे खूप मोठे काम आहे,’ असे कोकण रेल्वेचे पहिले अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन म्हणतात. त्यांची या प्रकल्पासाठी निवड फर्नांडिस यांनीच केली होती.

१९९४मध्ये त्यांनी समता पार्टी स्थापन केली. पुढे भाजपसोबत हा पक्ष सत्तेत राहिला. भाजपच्या १३ दिवस, १३ महिने आणि पाच वर्षांच्या सरकारच्या काळात हा पक्ष त्यांच्यासोबत होता. पुढे २००३मध्ये जनता दलाचे विभाजन होऊन धर्मनिरपेक्ष जनता दल आणि संयुक्त जनता दल असे दोन पक्ष झाले. समता पार्टीचे संयुक्त जनता दलात विलीनीकरण करण्यात आले. 

अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांसारख्या काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य म्हणूनही जॉर्ज यांनी काम केले होते. 

शिकण्याची आस, कष्टांची तयारी आणि साधी राहणी ही जॉर्ज फर्नांडिस यांची वैशिष्ट्ये. पत्रकारिता आणि लेखन याचीही त्यांना आवड होती. कोकणी ही त्यांची मातृभाषा होती. त्या भाषेतील ‘कोकणी युवक’ या मासिकाचे ते संपादक होते. त्यानंतर इंग्लिश आणि कन्नड नियतकालिकांचे संपानही त्यांनी केले. इंग्लिश आणि हिंदीवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठी आणि उर्दू भाषा ते तुरुंगवासात असताना शिकले, तर सेमिनरीत असताना लॅटिन भाषा शिकले. कोकणी, इंग्लिश, हिंदी, तुळू, कन्नड, मराठी, तमीळ, उर्दू, मल्याळम आणि लॅटिन अशा एकूण दहा भाषा त्यांना बोलता येत. ‘जॉर्ज फर्नांडिस स्पीक्स’ हे त्यांचे आत्मचरित्र १९९१मध्ये प्रसिद्ध झाले. समाजवादावरही त्यांनी काही पुस्तके लिहिली होती. 

अक्षरशः शून्यातून विश्व उभे करणाऱ्या आणि समाजातील अन्याय दूर करण्यासाठी लढलेल्या या नेत्याला आदरांजली!

‘जॉर्ज : नेता, साथी, मित्र’ (संपादक : रंगा राचुरे, जयदेव डोळे) या हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या संपादकीयातील दोन उद्धृतांनी लेखाचा समारोप करत आहोत.  

‘जॉर्ज यांनी वेगळी कामगार संघटना काढली, स्वतंत्र राजकीय पक्ष काढला; मात्र कोंडाळे, पंथ आणि व्यक्तिस्तोम यांच्या कचाट्यात ते कधी अडकले नाहीत. इतरांचे नेतृत्व बाजूस सारूप त्यांनी स्वतःचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न कधी केला नाही. ज्या विचारांचा एकदा पत्कर केला, त्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे हा त्यांचा विशेष.’

‘कामगार चळवळ अर्थवादी म्हणजे निव्वळ अर्थकेंद्री झाल्याचा निष्कर्ष अनुभवांती काढून जॉर्ज त्यांच्या मूळच्या कार्यापासून दूर गेले. तोवर कामगार प्रश्नांसाठी संसदीय राजकारण असा त्यांचा हेतू होता.’ 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pradeep Pandit Deshpande About 196 Days ago
Eagar to join
0
0

Select Language
Share Link
 
Search