Next
चौकटीतलं राज्य
BOI
Thursday, November 22, 2018 | 03:10 PM
15 0 0
Share this story

रामविजय परब यांनी लिहिलेलं ‘चौकटीतलं राज्य’ हे नाटक ५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या पाचव्या दिवशी (२१ नोव्हेंबर २०१८) सादर झालं. पालीतल्या नेहरू युवा कलादर्शन नाट्यमंडळानं ते सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
........
कथानकातली काल्पनिक पात्रं रंगभूमीवर जिवंतपणे सादर करून रसिकांची मनं रिझवणारा कलाकार वैयक्तिक जीवनात मात्र रागलोभाला बळी पडून प्रसंगी संसाराचा विस्कोट करतो. ‘चौकटीतलं राज्य’ या रामविजय परबलिखित नाटकात २० वर्षं रंगभूमीची सेवा करणाऱ्या श्रीधर करंदीकर या रंगकर्मीचं असंच झालंय.

‘झिलमिल सितारों कार आँगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा’ या गीताच्या धुंदीत प्रेमाला विवाहाचं रूप देऊन श्रीधर आणि  केतकी यांनी संसार थाटलाय. मुन्नू नावाचं पुत्ररूपी फूल त्यांच्या संसारवेलीवर उमललंय; पण अलीकडे काही तरी चुकू लागलंय. अभ्यास करता करता गणित सोडवता येत नाही, म्हणून मुन्नू कुरबुर करू लागतो, तेव्हा ‘बेरीज चुकतेय’ असं केतकी स्वतःशीच पुटपुटू लागलीय. सायंकाळी सहा वाजल्यापासून तिची वाट पाहत गॅलरीत उभं राहण्याची आणि तिला उशीर होतोय म्हणून चरफडत बसण्याची श्रीधरला - श्रीला - सवयच लागलीय. दोघांचा संवाद थांबलाय!

श्री स्वतःची नाटकं बसवण्यात गुंतलेला. केतकी बँकेत नोकरी करून संसार सांभाळते. मुन्नूला शाळेत सोडण्याचं नि परत आणण्याचं काम मीरा ही मोलकरणी करते. श्रीचा मित्र विकास आणि नाटकात भूमिका करणारी माणसं अधूनमधून येत असतात. नाटकांच्या तालमीही करतात. नाटकांच्या संहिता लिहिणारा विकास अधिक जवळचा. आपल्या संसाराची घडी मोडत चाललीय, याचं दुःख केतकी विकासला सांगते. विकासलाही ते दिसत असतंच. तो श्रीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो; पण उपयोग शून्य!

आई-वडिलांमध्ये विसंवाद असला, तरी मुलगा मुन्नू दोघांचाही लाडका; पण त्याची त्या प्रेमानं होणारी रस्सीखेच टळत नाही. शेवटी मुन्नूला हॉस्टेलमध्ये ठेवतात.

विसंवाद वाढत असतो. संवाद झालाच, तर गरमागरम शब्दाशब्दीच्या रूपानंच होतो. नेमकं काय, केव्हा घडलंय ते विकासला दोघंही एकेकटे असताना सांगत असतात. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून त्यांचं पूर्वायुष्य प्रेक्षकांपुढे उलगडत जातं. आठ वर्षांपूर्वी ‘प्रेम की गली में’ छोट्याशा घरात राहण्याची स्वप्नं रंगवणाऱ्या या जोडप्याच्या आनंदात मिठाचा खडा पडलेला असतो. लग्नाच्या वाढदिवशी श्री तिची वाट पाहत असतो; पण ती खूपच उशिरा येते. त्या दिवशी केतकीला नाट्य स्पर्धेत अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यानं ऑफिसात पार्टी होते आणि ऑफिसमधला रंगकर्मी अविनाश तिला सिनेमाला घेऊन जातो. हे समजल्यानं श्रीची स्वाभाविक चिडचिड होते. त्याच वेळी इतकी वर्षं रंगभूमीवर वावरूनही त्यानं काय मिळवलं, या केतकीच्या प्रश्नानं तो डिवचला जातो. दुरावा वाढतच जातो.

काळाच्या ओघात केतकीला आपल्या चुकीची जाणीव होते; पण श्री घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेला. केतकीची प्रकृतीही ढासळते. ती रुग्णालयात दाखल होते. सर्व जण भेटतात; पण श्री जात नाही. मुलगा मुन्नूही त्याच्यापासून मनानं दूर होण्याच्या टप्प्यावर येतो. ती वाट पाहत असते; पण श्रीचा दुखावलेला अहंकार कितीही फुंकरा घातल्या, तरी शांत होत नाही. शेवटी रुग्णालयातच ती अखेरचा श्वास घेते. 

... आणि श्री स्वतःच्या अहंकारानं स्वतःच तयार केलेल्या चौकटीत राहून एकटा पडतो.

पाली इथल्या नेहरू युवा कलादर्शन नाट्यमंडळानं हे नाटक सादर केलं. जयप्रकाश पाखरे यांचं दिग्दर्शन आणि पात्रांचं सादरीकरण चांगलं झालंय. प्रवीण धुमक यांचं नेपथ्य नेटकं. शाळकरी मुलाचं वेळापत्रक भिंतीवर लावण्याचा बारकावा लक्षात घेण्याजोगा. प्रकाशयोजना आणि ध्वनियोजनेत सुधारणेला वाव आहे. श्री आणि केतकी यांच्या भूमिका प्रभावी झाल्या आहेत; पण महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या विकासने मात्र आवाजाची पातळी आणि एकूणच देहबोलीच्या मर्यादा नाटकातल्या अन्य पात्रांबरोबर जुळवून घ्यायला हव्या होत्या. या नाटकात मुन्नू या आठ-नऊ, फार तर दहा वर्षांच्या मुलाची उपस्थिती अगदी काही मिनिटं वगळता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. मुन्नूची भूमिका विराज संजय रांगणेकर या सातवीत शिकणाऱ्या मुलानं अत्यंत मनोवेधक रीतीने पार पाडलीय. मध्यमवर्गीय कुटुंबातला चागलं वळण लावलेला मुलगा म्हणू तो रंगमंचावर वावरतो. त्याचं आई-वडिलांवरचं प्रेम, त्याचे बालसुलभ हट्ट, त्याचं रुसणं आणि त्याची घुसमट या सगळ्या भावना विराजनं कमालीच्या ताकदीनं प्रकट केल्या आहेत.

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(२२ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात वाजता संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कला मंच या संस्थेतर्फे ‘नटरंग’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link