पुणे : ग्रीक पुराणकथांमध्ये उल्लेख असलेला, भूमध्य समुद्रातील एका बेटावर वसलेला ‘सायप्रस’ हा देश हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या पुरातन वास्तू आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. ग्रीक संस्कृती आणि इतिहास जपणाऱ्या या सुंदर देशाची भ्रमंती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. घरबसल्या सायप्रसची सफर करण्याची संधी ‘टेन डेज सायप्रस’ या ‘ट्रॅव्हल एक्सपी’वरील मालिकेद्वारे मिळणार आहे.
यामध्ये दहा हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या, जगातील सर्वात जुन्या अशा वीस शहरांमध्ये ज्याचा समावेश आहे, अशा लारनाका शहरासह गेली अकराशे वर्षे सायप्रसची राजधानी असलेल्या निकोशियाची सफर घडणार आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन घरे व अवशेष जतन केलेले फिकार्दू हे गाव आणि ट्रूडूज डोंगररांगा, या भागात ‘युनेस्को’ने जतन करून ठेवलेली पुरातन चर्चेस यांचे विलोभनीय दर्शनही यामध्ये होईल.
पॅफोज येथील सुंदर समुद्रकिनारे, ग्रीक पुराणकथा आणि रोमन तत्वज्ञान यांची माहिती देणारे पॅफोज पुरातत्व पार्क, लिमासोल या ऐतिहासिक शहराचा फेरफटका आणि भूमध्य सागरातील ‘काईट सर्फिंग’ यासह अकामाज नॅशनल पार्क आणि सायप्रसमधील प्रसिध्द गाढवांच्या अभयारण्यात फेरफटकाही घडणार आहे. त्याशिवाय खाद्यप्रेमींना सायप्रसमधील विविध ठिकाणांची व खाद्यपदार्थांच्या चवींची सफरही घडणार आहे.
याबाबत सायप्रसचे उच्चायुक्त एजिस लॉयझू म्हणाले, ‘या कार्यक्रमातून सायप्रसमधील शहरांचा इतिहास व संस्कृती, तसेच तेथील सुंदर समुद्रकिनारे यांचा अविस्मरणीय अनुभव दर्शकांना मिळेल. सायप्रसमधील जीवनशैली ते यातून अनुभवतील, असा मला विश्वास वाटतो.
‘ट्रॅव्हल एक्सपी’च्या अॅंकर ब्रिटीश टेलिव्हिजनवरील सुप्रसिध्द सादरकर्त्या आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ सब्रिना चॅकिसी ही पाच भागांची मालिका सादर करणार आहेत. १२ ऑगस्टपासून हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे’, असे ट्रॅव्हल एक्सपीच्या संचालिका निशा छोतानी यांनी सांगितले.