Next
होळी, रंगपंचमीवेळी घ्या मुक्या प्राण्यांची काळजी
रासायनिक रंग प्राण्यांसाठी ठरू शकतात घातक
प्रशांत सिनकर
Tuesday, March 19, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:


धुळवड, रंगपंचमी साजरी करताना विविध रंगांची उधळण होतेच. परंतु अलीकडे बाजारात येणारे रंग पूर्णतः रासायनिक घटकांचे बनलेले असतात. अशा रंगांमुळे केवळ माणसांच्याच नव्हे, तर आजूबाजूला असणाऱ्या मुक्या जनावरांच्याही जिवावर बेतू शकते. याविषयी प्रबोधन करणारा हा लेख...
.................
होलिकोत्सव आणि धुळवडीचे वातावरण आता चांगलेच रंगले असून, गल्लीबोळांमध्ये बच्चेकंपनी एकमेकांना पाण्याचे फुगे मारून धमाल-मस्ती करताना दिसते; मात्र ही धमाल करताना पाळीव प्राणी आणि पक्षी यांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी माणसांबरोबरच प्राण्यांनाही रंग लावण्याचा आनंद घेत असाल, तर खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. हा रंग प्राण्यांच्या जिवावर उठणारा ठरू शकतो. 

प्राण्यांना रंग लावल्यास ते स्वतः त्यांच्या अंगाचा रंग चाटू शकतात. अशा वेळी रासायनिक रंगांमधील विषारी रसायने त्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असते. यामुळे त्यांच्या  पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय केसाळ प्राण्यांना लावलेला ऑइलपेंट सुकल्यानंतर जिभेने चाटताना त्यासोबत केस मुळासकट उखडून येण्याची शक्यता अधिक असते. यामुळे जखम होऊ शकते. तसेच पाण्याचा फुगाही मजेत मारला, तरीही तो त्यांच्या डोळ्यांना इजा होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

या सर्व गोष्टी लक्षात घेता, या दिवसांत आपल्या व प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असणारे रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक घटकांपासून बनवलेले रंग अथवा गुलाल वापरावा, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी करण्यात येते; मात्र रंगपंचमीच्या दिवशी बहुतांश लोक अजूनही रासायनिक रंगांचा वापर करतात. 

कृत्रिम रंगांमध्ये कपड्याचा रंग, मेटल अॅसिड, अल्कली पावडर, काचेची भुकटी इत्यादी रासायनिक घटकांचा समावेश असतो. हे पदार्थ प्राण्यांसाठी धोक्याचे ठरतात. रंगाचे पाणी पोटात गेल्यामुळे त्यांना अॅसिडिटी होऊ शकते, पचनक्रियेत अडथळा येऊन लिव्हरवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अशी माहिती ‘मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट’चे पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली. 

ऑइलपेंटने केस उपटण्याची शक्यता 
रंगपंचमीच्या दिवशी रंगवण्यासाठी जे काही दिसेल त्याचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे गुलाल, नैसर्गिक-रासायनिक रंगांबरोबर ऑइलपेंटही कित्येकदा फासला जातो; मात्र ऑइलपेंट म्हणजे सर्वांसाठी अवघड दुखणे असते. अंगावर तो सुकल्यानंतर काढणे म्हणजे मोठी कसरत असते. प्राण्यांच्या बाबतीत तर ऑइलपेंट चांगलाच घातक ठरतो. कुत्रा, मांजर, ससा अशा केसाळ प्राण्यांच्या अंगावर रंग सुकला, तर त्यांचे केस उपटून येण्याची शक्यता अधिक असते. अंग चाटताना हे केस उपटले जाऊन त्या ठिकाणी जखम होते. काही वेळा जखम चिघळून त्याचा त्रास या प्राण्यांना झाल्याच्या घटनाही घडतात. याची नोंद प्राणी अभ्यासक प्रतीक्षा तोडणकर यांनी घेतली आहे.

रंगाचे पाणी रस्त्यावर फेकू नका
आजकाल रंगपंचमीच्या दिवशी रंगांचे पाणी वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हे पाणी रस्त्यावर सांडते. होळीपर्यंत बऱ्यापैकी ऊन वाढलेले असते. अशा वेळी प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसलेले पाणी पितात. असे रंगाचे पाणी ते प्यायले, तर त्यांना त्रास होऊ शकतो. शिवाय मजेने मारलेला पाण्याचा फुगाही पक्षी आणि प्राण्यांसाठी धोक्याचा ठरू शकतो. फुगा डोळ्यांवर बसून डोळा निकामी होण्याचीही शक्यता अधिक असते, असे निरीक्षण प्रतीक्षा तोडणकर यांनी नोंदवले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search