Next
‘शास्त्रीय नृत्य संवर्धन’तर्फे ‘डान्स सीझन’ला सुरुवात
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डान्स सीझन २०१९’ला आजपासून (२० एप्रिल) सुरुवात झाली. आज बालगंधर्व रंगमंदिराजवळील ओंकारेश्वर मंदिर येथे ‘संतवाणी’ कार्यक्रम झाला. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ आणि रामदास स्वामी या महाराष्ट्रातील संतांच्या कार्याचा आणि जीवनाचा आढावा नृत्याविष्काराच्या माध्यमातून घेण्यात आला.

यामध्ये ‘नुपूरनाद’ या भरतनाट्यम् संस्थेतर्फे संत नामदेव, ‘नादरूप’ कथ्थक संस्थेतर्फे संत जनाबाई, स्वरदा नृत्यालयातर्फे संत एकनाथ, ‘नृत्यभारती’ कथ्थक संस्थेतर्फे रामदास स्वामी, कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे संत तुकाराम आणि ‘नृत्यभारती’तर्फे संत ज्ञानेश्वर यांच्यावरील नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन, ‘नृत्यभारती’च्या नीलिमा आध्ये यांच्यासह पुण्यातील कलाकार या वेळी उपस्थित होते.


भारतीय शास्त्रीय नृत्य कलेचे संगोपन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुणे शहरातील शास्त्रीय नृत्याच्या सर्व शैलींच्या कलाकारांनी एकत्र येत शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून या वर्षीपासून ‘डान्स सीझन’चे आयोजन केले जाणार असून, पहिला ‘डान्स सीझन’ २० ते ३० एप्रिल २०१९ दरम्यान पुण्यात होणार आहे. या सीझनची सुरुवात ‘संतवाणी’ या कार्यक्रमाने झाली.

या डान्स सीझनचे औचित्य साधत पुढील दहा दिवस शहरातील विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या उपक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील शास्त्रीय कलेच्या सर्व शैलीतील कलाकार या निमित्ताने एकत्र येत हे दहा दिवसांचे कार्यक्रम करणार आहेत. दहा दिवस होणारे सर्व कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत.


आजच्या पहिल्या दिवशी पुणे शहरातील विविध उद्यानांमध्ये आज नृत्यविषयक निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यात २००हून अधिक नृत्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘व्हाय डू आय डान्स?’ (मी नृत्य का करते/ करतो?) असा या निबंध स्पर्धेचा विषय होता. या वेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. 

३० एप्रिलला ईशान्य मॉल येथील क्रेटा सिटी या ठिकाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नृत्याशी संबंधित तब्बल २९ संस्थांचे प्रतिनिधी आपली नृत्य कला सादर करतील. या वेळी कला क्षेत्राशी निगडीत अनेक कलाकार उपस्थित असतील. या कार्यक्रमाने यावर्षीच्या ‘डान्स सीझन’चा समारोप होईल. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search