Next
मराठी आरमाराच्या इंग्रजांवरील विजयाची गाथा रंगमंचावर
‘दर्याभवानी’ नाट्यप्रयोग २४ ऑगस्ट रोजी पुण्यात
BOI
Tuesday, August 20, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने इसवी सन १६८० मध्ये खांदेरी बेटासाठी इंग्रजांशी दिलेल्या ऐतिहासिक सागरी लढ्याचा थरार आता रंगभूमीवर अनुभवता येणार आहे. ‘दर्याभवानी’ या नाटकाद्वारे ही ऐतिहासिक घटना मराठी रंगभूमीवर साकारण्यात आली असून, येत्या शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

खांदेरी बेट

मुंबई आणि अलिबागच्या दरम्यान असलेले खांदेरी बेट इसवी सन १६८०मध्ये श्री शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले. इंग्रज विरुद्ध मराठे अशा झालेल्या या सागरी युद्धाचा थरार चाळीस कलाकारांनी रंगमंचावर साकार केला आहे. मुंबईतील उर्विजा थिएटरचे कालिका विचारे आणि संदीप विचारे यांनी याची निर्मिती केली आहे. 

या महानाट्याचे लेखन आणि गीत लेखन संदीप विचारे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर, तर संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांचे आहे. यातील गाणी आदर्श शिंदे, (गोंधळ), नंदेश उमप (पोवाडा), प्रा. गणेश चंदनशिवे (वासुदेव गीत) यांनी गायली आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे.

या नाट्याचे नायक मायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. इ. स. १६८०च्या सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्या दृष्टीने राजांच्या वेगाने हालचालीही सुरू झाल्या. मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची यामागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उंदेरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले. कॅप्टन विलियम मिन्चीन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रान्डबरी, फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रिंगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. मायनाक भंडाऱ्यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला.

या युद्धात इंग्रजांना मदत करण्याकरिता जंजिऱ्याचा सिद्दीही येतो. या दोघांच्या म्हणजे सिद्दी आणि इंग्रज यांच्या आरमाराला थळच्या समुद्रात मायनाक भंडारी आणि दौलतरावांच्या नेतृत्वाखाली मराठे पाणी पाजतात आणि विजयश्री खेचून आणतात.. हा सर्व थरार दर्याभवानी नाटकाद्वारे रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. 

‘ऐतिहासिक नाटक मोठ्या संचात रंगभूमीवर आणणे हे आव्हान असून आम्ही ते यशस्वीपणे पेलले आहे. स्वराज्याच्या इतिहासातील एक अद्भुत समरप्रसंग रसिकांना पाहायला मिळणार आहे,’ असे संदीप विचारे यांनी सांगितले. ‘ऐतिहासिक नाटकांची निर्मिती ही दुर्मीळ बाब असल्याने रसिकांना बऱ्याच दिवसांनी ते पाहायला मिळणार आहे,’ असे या नाटकाचे पुण्यातील आयोजक ‘मनोरंजन’ संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.

(खांदेरी-उंदेरीविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 25 Days ago
Is there documenyary evidence for the event ? The bibliography ? Which libraries ?
0
0

Select Language
Share Link
 
Search