Next
सचिनसोबत विराटचाही मेणाचा पुतळा; ‘वर्ल्ड कप’च्या पूर्वसंध्येला ‘लॉर्डस्’वर अनावरण
BOI
Thursday, May 30, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:लंडन :
आपल्या तडाखेबंद बॅटिंगने अनेक नवे विक्रम प्रस्थापित करून जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयात स्थान मिळविलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने जगप्रसिद्ध अशा मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियममध्येही मानाचे स्थान मिळविले आहे. आजपासून (३० मे २०१९) सुरू होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला, क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडनमधील लॉर्डस् क्रिकेट मैदानावर त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमांचा पाठलाग करणारा विराट कोहली आता मेणाच्या पुतळ्याच्या रूपानेही सचिनसोबत आला आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्समध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार असून, या कालावधीत लंडनमधील मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियममध्ये विराट कोहलीचा पुतळा पर्यटकांना पाहता येणार आहे. सचिनसोबतच विक्रमादित्य धावपटू उसेन बोल्ट, ब्रिटिश अॅथलीट मो फाराह यांसारख्या क्रिकेटपटूंचे मेणाचे पुतळे या संग्रहालयात आहेत. 

विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम बॅट्समन समजला जातो. त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील ११ हजार धावांचा टप्पा या स्पर्धेत पूर्ण होण्याची शक्यता असून, काही शतकेही त्याच्या खात्यावर जमा होतील. सध्या त्याच्या शतकांची संख्या ४१ आहे. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची विराट कोहलीची ही तिसरी वेळ असली, तरी कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच्या कामगिरीमुळे आणि कुशल नेतृत्वामुळे भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळू शकते, असे त्याच्या चाहत्यांना वाटते.

त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठीच मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियममध्ये त्याचा पुतळा बसविण्यात आला आहे. भारतीय संघाच्या गणवेशात असलेली त्याची प्रतिमा पुतळ्यात साकारण्यात आली असून, पुतळ्यासाठी ग्लोव्ह्ज आणि शूज विराटने स्वतःच दिले आहेत. 

‘विराटला प्रत्यक्ष खेळताना पाहणे त्याच्या चाहत्यांना आवडतेच; पण त्यासोबत मेणाच्या पुतळ्याच्या रूपात त्याला पाहणेही त्यांना नक्कीच आवडेल,’ असा विश्वास लंडनमधील ‘मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियम’चे सरव्यवस्थापक स्टीव्ह डेव्हिस यांनी व्यक्त केला आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

हेही जरूर वाचा ः

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search