Next
शास्त्रीय संगीत : भारतीय संगीताचा आत्मा
BOI
Tuesday, September 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


अभिजात शास्त्रीय संगीत, म्हणजेच रागसंगीत हे भारतीय संगीताचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य मानलं जातं. या रागसंगीतातील ‘ख्याल’ गायकीमुळे जागतिक संगीतविश्वात भारतीय संगीताला स्वत:ची अशी सर्वांपेक्षा निराळी ओळख लाभली. गायन आणि वादन या दोन्ही रूपांत रागसंगीताला सर्वत्र लोकप्रियता मिळाली.... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या ‘शास्त्रीय संगीत’ आणि ‘ख्याल गायकी’बद्दल...
...........
उस्ताद अमीर खुस्रोख्याल गायकीची आपल्या रसिकांना झालेली ओळख ही फार जुनी नाही, तशी नवीनच. साधारण चारशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. सोळाव्या शतकातील गायक उस्ताद अमीर खुस्रो हे ख्याल गायकीचे जनक मानले जातात. त्यांच्यामुळे रसिकांना ख्याल गायकीचा परिचय झाला. त्यापूर्वी आठव्या शतकापासून भारतात धृपद गायकी प्रचलित होती. संस्कृतप्रचुर शब्दरचना असलेल्या धीरगंभीर धृपद गायकीचा परिचय असलेल्या रसिकांना ख्याल गायकीतलं वेगळेपण भावलं. ख्यालामधल्या बोलीभाषेतल्या हिंदी शब्दरचना आणि त्यांतील भावभावना आपल्याशा वाटल्या. विलंबित ख्याल - द्रुत ख्याल यांच्या साह्यानं रागातून तयार होणारी स्वरशिल्पं रसिकांना आवडू लागली आणि अल्प काळातच ख्याल गायन - वादन लोकप्रिय होऊ लागलं.

‘खयाल’ या उर्दू शब्दापासून ‘ख्याल’ हा शब्द प्रचलित झाला. खयाल म्हणजे विचार करणे आणि सादरीकरणामध्ये गायक - वादकाच्या विचारशक्तीमुळे खुलतो तो ख्याल. रागाच्या बंधनात राहूनही, विचारांचा मुक्तपणा दाखवता येतो तो ख्याल. रागाचे मूळ नियम कायम ठेवून, प्रत्येक वेळी आपल्या बुद्धिकौशल्याने निरनिराळा नटवता येतो, तो ख्याल. राग सादर करताना प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा विचार त्यामागे असल्यामुळे रागाच्या चौकटीत राहूनही, प्रत्येक कलाकाराला आपल्या पद्धतीनं मांडणी करण्याची मुभा असल्यानं प्रत्येक कलाकाराच्या प्रतिभेनुसार एकच राग निरनिराळ्या ढंगात सादर केला जातो. यामुळेच ख्यालगायनात कलाकाराची कल्पनाशक्ती आणि प्रतिभासामर्थ्य यांना महत्त्व असतं. म्हणजेच कुणा चित्रकाराला जास्वंदाच्या फुलाच्या एका पाकळीतून गणेशाचं रूप दाखवता येतं, तर कुणाला नुसत्या सोंडेच्या आकारातून ते दाखवता येतं. कुणाला ॐकार रूपात गणेश दिसतो, तर कुणाला लंबोदर स्वरूपात दाखवावासा वाटतो. कोणत्याही रूपात दाखवला गेला, तरी बघणाऱ्याला लगेच जाणवतं ते त्यातील गणेश रूप.. अगदी तसंच. 

एकाच विषयावर अनेक वक्ते आपल्या अनुभवसंपन्न विचारांनी उत्कृष्ट भाषण करतात. ज्यांचा जितका अनुभव जास्त, विचार सखोल, तितका वेळ ते समर्थपणे बोलू शकतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवू शकतात. त्यात प्रत्येकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य जाणवतं, त्याचप्रमाणे प्रत्येक कलाकार स्वत:च्या विचारांनी राग सजवत असल्यानं, त्यातल्या स्वत्वाला (इंडिव्हिज्युअॅलिटी) महत्त्व प्राप्त होतं. त्यात एक प्रकारची उत्स्फूर्तता (स्पॉन्टॅनिअस एक्स्प्रेशन्स) असते, जिवंतपणा असतो. त्यामुळे अगदी एकाच कलाकाराचा, तोच राग निरनिराळ्या मैफलीत, प्रत्येक वेळी निराळा आनंद देऊन जातो. तसंच एकच राग निरनिराळ्या कलाकारांनी सादर केलेलाही श्रोत्यांना ऐकायला आवडतो. 

त्यानंतर महत्त्व असतं ते कलाकाराच्या रियाजाला. कलाकाराचा रियाज जेवढा अधिक, तेवढी त्या रागावर त्याची हुकुमत दिसून येते. मग तो गायक असो वा वादक. तो राग प्रभावीपणे मांडला जातो आणि श्रोत्यांच्या काळजाला भिडतो. सच्चे सूर हृदयापर्यंत पोहोचतातच. मग ऐकणाऱ्याला शास्त्रीय संगीताचं ज्ञान असो वा नसो, संगीताचा रसास्वाद घेताना त्याला काही फरक पडत नाही.

राग ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेल्या धृपद गायनातही होती; पण धृपदाची भाषा उच्च दर्जाची होती. विषय ईश्वर स्तुती, पराक्रमाचं वर्णन असे होते. सादरीकरणाची शैली वेगळी होती. त्या मानाने ख्याल गायनात आलेल्या बंदिशींची भाषा साधी, सोपी, विषय रोजच्या जीवनातले, सादरीकरण श्रोत्यांना आवडेल असं होतं. स्वरांमधून व्यक्त होणारे भाव, अधिक स्पष्ट आणि गहिरे करण्याचं काम बंदिश (गीत) करत असते. त्यामुळे बंदिशीसह झालेलं रागाचं सादरीकरण अधिक परिणामकारक होतं. म्हणूनच प्रात:काळच्या धीरगंभीर वातावरणात ‘जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले’ या शब्दांच्या साहाय्याने ‘भैरव’ राग अधिक खुलतो, तर रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी ‘बागेश्री’च्या आलापातून व्यक्त होणारा विरह व्याकूळ भाव, ‘सखी मन लागे ना’ या बंदिशीच्या आधारे अधिकच उत्कट होतो. या बंदिशींमध्ये राग स्वरूपाचं प्रतिबिंब दिसत असल्यानं, ही रागस्वरूपं जशीच्या तशी जतन करून पुढच्या पिढीत पोहोचवण्याचं कार्य या बंदिशी करतात. 

उस्ताद अमीर खुस्रो आणि त्यांचे गुरूया बाबतीत दोन पिढ्यांमधील सेतू बनण्याचं काम करते ती गुरू-शिष्य परंपरा. संगीत ही गुरुमुखी विद्या असल्यानं, गुरूशिवाय पर्याय नाही. अनेक दिग्गज गायक, वादक कलाकारांनी, जसं या रागसंगीताला अधिकाधिक संपन्न, समृद्ध व लोकप्रिय केलं, तसंच मोठ्या कष्टानं, मेहनतीनं मिळवलेली ही विद्या आपल्या शिष्यांच्या हाती सुपूर्द केली आणि ही परंपरा चारशे वर्षं अखंडित ठेवली आणि साहित्यातील अक्षरवाङ्मयाप्रमाणे या अभिजात ख्याल गायकीला संगीताच्या क्षेत्रात अढळ स्थान मिळालंय.

या प्रत्येक रागाच्या स्वरूपाचं वेगळेपण श्रोत्यांना हळू हळू कळू लागलं. चिरपरिचयानंतर अनेक राग रागिण्यांची रूपं श्रोत्यांच्या मनावर राज्य करू लागली. तोडी, ललित, भैरव, जौनपुरी, भीमपलास, मारवा, पूरिया-धनाश्री, यमन, बिहाग, केदार, मालकंस दरबारी, सोहनी असे दिवस रात्रीच्या वेगवेगळ्या प्रहरात गायले जाणारे अनेक बेसिक राग पुढे श्रोत्यांना वर्षानुवर्षं मोहवत आले. इतकंच नाही, तर या रागांवर आधारित असलेली अनेक हिंदी-मराठी चित्रपटगीतं आणि संगीत नाटकातील नाट्यगीतं अजरामर झाली आणि कानसेन रसिकांसाठी ती त्या त्या रागाची ओळख बनली. या राग संगीताच्या वृक्षाच्या आधारे उपशास्त्रीय  संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत अशा अनेक गीतप्रकारांच्या स्वरवेली बहरत असल्यानं, या रागसंगीताची मोहिनी सर्वांवर आचंद्रसूर्य राहील यांत तिळमात्र शंका नाही. 

पुढे किती विविध अंगांनी आपण भारतीय रागसंगीताबद्दल संवाद साधणार आहोत त्याची तुम्हाला कल्पना आली असेल... पुढच्या भेटीत जाणून घेऊ या हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत पद्धतींबद्दल... तोपर्यंत रमून जा सुरांच्या विश्वात...... सुरेल शुभेच्छा....!!!       
   
- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मधुवंती पेठे यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link