Next
विराट विक्रम!
‘आयसीसी’चे सगळे सर्वोच्च वार्षिक पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू
BOI
Tuesday, January 22, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली :
नुकताच ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय मिळविलेल्या आणि गेला काही काळ ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे, त्या कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ‘आयसीसी’कडून देण्यात येणारे यंदाचे सगळे सर्वोच्च वार्षिक पुरस्कार त्याला मिळाले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवसीय, कसोटी या दोन्ही प्रकारांतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या किताबासह क्रिकेटर ऑफ दी इयर हा किताबही त्याला जाहीर झाला आहे. त्याशिवाय ‘आयसीसी’ने २०१८मधील कामगिरीनुसार निवडलेल्या दोन्ही प्रकारांतील ‘टीम ऑफ दी इयर’चा कर्णधार म्हणूनही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्रिकेटपटू हा पुरस्कार भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला जाहीर झाला आहे. 

सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावाने दिला जाणारा आयसीसी क्रिकेटर ऑफ दी इयर या किताबासाठी यंदा निवड समितीने एकमताने विराटची निवड केली. हा किताब विराटला सलग दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. तसेच, एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारांतील ‘प्लेअर ऑफ दी इयर’ हा किताबही त्याला जाहीर झाला आहे. हे तिन्ही किताब एकाच वर्षी मिळविणारा विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. 

एक जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतील कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. या कालावधीत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहा कसोटी सामन्यांत विजय मिळविला, तर सात सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला. नऊ एकदिवसीय सामन्यांत भारत विजयी झाला, तर चार सामन्यांत भारत पराभूत झाला आणि एक सामना बरोबरीत सुटला. 

विराटने वर्षभरातील १३ कसोटी सामन्यांत ५५.०८च्या सरासरीने १३२२ धावा केल्या आणि त्यात पाच शतकांचा समावेश होता. १४ एकदिवसीय सामन्यांत त्याने १३५.५५च्या सरासरीने १२०२ धावा स्वतःच्या खात्यात जमा केल्या. त्यात सहा शतके होती. १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत त्याने २११ धावा केल्या. 

विराट हा २०१८मध्ये क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह केवळ दोन जणांनी कसोटी क्रिकेटमध्ये वर्षभरात एक हजारहून अधिक धावा केल्या असून, एकदिवसीय प्रकारात विराटसह केवळ तीन जणांनीच वर्षभरात एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. 

२००८मध्ये मलेशियात झालेल्या ‘आयसीसी’च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून दिल्यानंतर विराट चर्चेत आला होता. एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांतील त्या वर्षीचा तो सर्वोत्कृष्ट बॅट्समन ठरला होता. तिथपासून त्याची घोडदौड सुरूच आहे. सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम त्याने मोडले आहेत. 

‘आयसीसी’च्या संघात भारतीय
‘आयसीसी’च्या कसोटी संघात विराट कोहलीसह यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तीन भारतीयांचा समावेश आहे. ‘आयसीसी’च्या एकदिवसीय संघात विराट कोहलीसह, रोहित शर्मा, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या चार भारतीयांचा समावेश आहे. 

अन्य ठळक नोंदी
२०१८मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवले, तो चाहत्यांच्या सर्वाधिक पसंतीचा क्षण ठरला आहे.

कुमार धर्मसेना हे यंदाचे सर्वोकृष्ट पंच ठरले आहेत. न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विल्यमसन याला आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाला आहे. तसेच, यंदा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिंच याने ७६ चेंडूंमध्ये केलेली १७२ धावांची खेळी टी-ट्वेंटीमधील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search