Next
श्री देव भैरीबुवाची होळी पारंपरिक पद्धतीने उभी
फाका, ढोल-ताशांचा गजर आणि हजारोंची उपस्थिती
BOI
Friday, March 22, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीची होळी उभी करताना मानकरी आणि ग्रामस्थ. (सर्व छायाचित्रे : परेश राजिवले))

रत्नागिरी : ‘हुरा रे हुरा... आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे होलिओ.....’ अशा फाका ठोकत ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत गुरुवारी (२१ मार्च) रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीची सुरमाडाची होळी पारंपरिक पद्धतीने झाडगाव येथील सहाणेच्या प्रांगणात उभी राहिली.

देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, गावकरी-ग्रामस्थ, गुरव मंडळी यांच्या सहकार्याने श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा २० मार्चपासून सुरू झाला. भैरीबुवाची होळी यंदा शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलजवळ वाय. डी. जोशी यांच्या कंपाउंडमधून आणण्यात आली. सर्वांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास होळी उभी राहिली. या वेळी पुजाऱ्यांनी पालखी आणि होळी यांची पूजा केली; तसेच होळीजवळ मानाचे विडे मांडून भक्तांनी आणलेले नारळ, तोरणे होळीजवळ ठेऊन नवस, गाऱ्हाणी घालण्यात आली.



२२ ते २४ मार्चला दुपारी एक वाजेपर्यंत श्रीदेव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. २२, २३ व २४ मार्चला रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीने पालखी नाचविण्यात येणार आहे. २४ मार्चला दुपारी १२ वाजता पालखी मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरून उठेल व झाडगावमार्गे श्री देवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिरमार्गे दांडा फॅक्टरीच्या मागील बाजूने मुरुगवाड्यातून पंधरा माडापर्यंत जाऊन परत मागे फिरेल व रात्री साधारण ८.३० वाजेपर्यंत झाडगाव सहाणेवर येणार आहे. त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.



२५ मार्चला (फाल्गुन पंचमी) रंगपंचमीच्या दिवशी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजता सहाणेवरून उठेल व पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेऊन झाडगाव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगाव नाक्यावरून गाडीतळ येथे ३.३० वाजेपर्यंत येईल. पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता आणि तेथून पुढे शहर पोलीस ठाण्यात पोहचेल. पुढे धनजी नाक्यावरून, राधाकृष्ण नाक्यावर सायंकाळी ६.३० वाजता येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सायंकाळी सात वाजता, तर मारुती आळी, गोखले नाक्यावरून, ढमालणीच्या पारावर रात्री नऊ वाजता पालखी येईल. तेथून विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री १० वाजता पालखी येईल. पुढे खालची आळीमार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री ११.३० वाजेपर्यंत येईल. रात्री १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. नंतर धुपारती व गावाचे गार्‍हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search