Next
सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या!
BOI
Tuesday, August 14, 2018 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

Dipcadi concanense

एकदांडी
वनस्पतीला बहर आल्यामुळे सध्या कोकणातील काही ठिकाणच्या पठारांवर स्वर्ग पृथ्वीवर आल्याचा भास होतो आहे. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या अस्तित्वाची ठिकाणे झपाट्याने कमी होऊ लागली आहेत. या नैसर्गिक ठेव्याचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, ते काम सामान्य नागरिकही करू शकतात. एकदांडी संवर्धनासाठीच्या संशोधन प्रकल्पात काम केलेले डॉ. अमित मिरगळ यांनी त्या संशोधनातील काही आश्चर्यपूर्ण निरीक्षणे नोंदवली असून, त्यांचा संवर्धनासाठी उपयोग होईल. त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला हा लेख...
.............


एकदांडी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव दीपकॅडी कोंकनेन्स (Dipcadi concanense) असे असून, तिचे अस्तित्व फक्त कोकणात आणि तेही केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मर्यादित ठिकाणी नोंदवले गेले आहे. दोन वर्षापूर्वी याच वनस्पतीचे नवीन अस्तित्व गोव्यातील मोपा विमानतळानजीक अधिक अस्तित्व म्हणून नोंदवण्यात आले. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचे अस्तित्व दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण फक्त २३ ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी १९ ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यातील असून, उरलेली पाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली (देवरुख), रत्नागिरी विमानतळ, जैतापूर, सागवे, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) ही या वनस्पतीच्या आढळाची प्रमुख ठिकाणे आहेत. या प्रजातीचे अस्तित्व कोकणातील ३१.३७५ हेक्टर क्षेत्रावर आढळले आहे. सिंधुदुर्गातील तळेरे येथे असलेले या वनस्पतींचे अस्तित्व यंदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुदैवाने, याचे माती उत्खननानंतर काही कंद रस्त्यापासून दूर म्हणजे आतील भागावर जगले असल्याचे निरीक्षण स्थानिक नागरिकांनी नोंदविले आहे; ही चांगली गोष्ट असली, तरी ते नष्ट होण्याचा धोका पूर्णपणे संपला आहे, असे म्हणता येत नाही.वनस्पतीचे जीवनचक्र आणि वैशिष्ट्ये
या प्रजातीचे एकूण जीवनचक्र पावसाळ्याच्या चार महिन्यांचे म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत असते. मे महिन्याच्या शेवटी पावसाळी ढग जमायला सुरुवात झाली, की या कंदवर्गीय वनस्पतीला पाने फुटायला सुरुवात होते. कातळावर या वनस्पतीची गवतासारखी पाने इतर वनस्पतींच्या तुलनेने अगोदरच वाढतात. त्या वेळी अन्य चारा कमी असल्याने गुरे ही पाने खातात; मात्र पावसाळा सुरळीत चालू झाला, की गुरांना खायला चारा उपलब्ध होतो आणि मग ती या वनस्पतीकडे दुर्लक्ष करतात. पुढे हळूहळू या वनस्पतीला एक दांडी येते आणि मग कळ्या येतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक ते १६च्या संख्येने फुले उमलायला सुरुवात होते. एका दांडीवर फुले येत असल्याने स्थानिक नागरिक या वनस्पतीला एकदांडी  किवा डोकाचे फूल या नावाने ओळखतात. हा बहर पुढे दोन महिन्यांपर्यंत टिकतो. संपूर्ण पठार या कालावधीमध्ये सुशोभित होऊन जाते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत या पठारांवर पांढरी नक्षी पसरल्याचा भास होतो. काही ठिकाणी या फुलांचा वापर गजरे, हार आणि वेण्या बनवण्यासाठीही केला जातो. रत्नागिरी, देवरुख आणि देवगडच्या बाजारपेठेत ही फुले विक्रीलाही आलेली दिसतात. म्हणजे या वनस्पतीमुळे या भागात या काळात छोटासा व्यवसायच उपलब्ध होतो. पावसाळा संपताच सर्व पाने सुकून मरून जातात; कंद मात्र पुढील पावसाळा येईपर्यंत जमिनीत जिवंत राहतो.एका दांडीवर एकाच वेळी दोन ते तीन फुले उमलतात आणि बाकी सर्व कळ्या असतात. त्यामुळे कळी आणि फुले यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. पांढरी शुभ्र आणि सुवासिक असणारी ही फुले उमलण्याची क्रिया सायंकाळी चार वाजल्यापासून साधारण सात वाजेपर्यंत सुरू असते. उमललेल्या फुलांमध्ये परागीकरणाची प्रक्रिया होत असते. दुसऱ्या दिवशी नवीन कळ्या उमलेपर्यंत आधीच्या फुलांमधील परागीकरण पूर्ण झालेले असते. या फुलांमध्ये दोन्ही प्रकारचे म्हणजे स्वयं आणि परपरागीकरण (सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन) या रात्रीत होत असते.

परागीकरण करणारे फुलपाखरूएकदांडीच्या अभ्यासादरम्यान, या वनस्पतीचे परपरागीकरण घडवून आणणारी दोन निशाचर फुलपाखरे अभ्यासली गेली. नेफेले अस्पेरा (Nephele aspera) आणि स्फिन्क्स लिन्गुस्त्री (Sphinx lingustri) अशी या फुलपाखरांची शास्त्रीय नावे आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या फुलपाखरांचा परागीकरण प्रक्रियेचा कालावधी फक्त २५ मिनिटे म्हणजे सायंकाळी अंधार होण्याआधी १५ मिनिटांपासून ते अंधार पडल्यावर १० मिनिटांपर्यंतच असतो. या २५ मिनिटांच्या कालावधीमध्ये एक फुलपाखरू साधारण ८०-९० फुलांना भेट देते आणि त्यातून पुढे परागीकरण होत असते. परागीकरण पूर्ण होताच पुढे बीजनिर्मिती होते. या दरम्यान या वनस्पतीमध्ये बरेच बदल घडत असतात. पुढे बिया जमिनीवर पडतात आणि लगेचच रुजतात. हळूहळू त्यांना फुटवा येतो आणि पुढे त्यापासून छोटासा कंद तयार होतो. तोपर्यंत पावसाची तीव्रता कमी होत जाते. पुढे पाऊस संपला, की हे कंद वर्षभर जमिनीतच पडून राहतात आणि पुढील पावसाची वाट पाहतात. कळी उमलल्यापासून ते बीज रुजेपर्यंतच्या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. 

प्रदेशनिष्ठ प्रजाती आणि संशोधन
वनस्पतींच्या आढळानुसार त्यांचे विविध प्रकार पडतात. यामध्ये भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या, तुरळक, प्रदेशनिष्ठ, उच्च प्रदेशनिष्ठ आणि दुर्मीळ या प्रकारांचा समावेश होतो. एकदांडी ही प्रजाती फक्त कोकणात आढळत असल्याने उच्च प्रदेशनिष्ठ या प्रकारात तिचे वर्गीकरण केले जाते. तिच्या अस्तित्वाची ठिकाणे तुरळक आहेत; मात्र ज्या ठिकाणी ती आढळते, तेथे ती भरपूर प्रमाणात असते. या प्रजातीचा शोध १८५० साली डाल्झेल या शास्त्रज्ञाने रत्नागिरी येथे लावला. त्या वेळी ‘उरोपेटालोन कोन्कनेन्स’ असे शास्त्रीय नाव तिला दिले गेले. नंतर १८७०मध्ये या प्रजातीला ‘दीपकॅडी कोंकनेन्स’ या नावाने संबोधले गेले. पुढे जवळपास १२३ वर्षे या प्रजातीचे अस्तित्व कोणीही न नोंदल्याने या प्रजातीला ‘कदाचित नष्ट झालेली’ प्रजाती म्हणून घोषित केले. परंतु १९८८मध्ये रत्नागिरीतील शिवाजीनगर भागात मिस्त्री आणि अल्मेडा या शास्त्रज्ञांना या वनस्पतीचे अस्तित्व आढळले. अस्तित्व आढळले ही चांगली गोष्ट असली, तरीही ती वनस्पती धोक्यातच असल्याचे मिश्रा आणि सिंग या शास्त्रज्ञांनी नमूद केले. २०११ साली नवी दिल्लीतील (केंद्र सरकार) जैवतंत्रज्ञान विभागाने ही प्रजाती दुर्मीळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे ओळखले आणि ‘स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम’मध्ये (प्रजाती संवर्धन कार्यक्रम) प्राधान्याच्या यादीत तिचा समावेश केला. पुढे या विभागाकडूनच या प्रजाती संवर्धनासाठी २६ लाख रुपये अनुदानाचा प्रकल्प दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनशास्त्र महाविद्यालयाला मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाच वर्षांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. मी स्वतःही (डॉ. अमित मिरगळ) या प्रकल्पात सहभागी होतो. या कालावधीतील संशोधनानंतर ही धोक्याच्या मार्गावर असणारी प्रजाती (Near Threatened) असल्याचे घोषित करण्यात आले. 

कोवळ्या बिया खाणारी अळीमानवी हस्तक्षेप, व्यावसायिक बांधकाम आणि रस्ता रुंदीकरण हे या वनस्पतीच्या अस्तित्वाला असलेले प्रमुख धोके या अभ्यासादरम्यान नोंदवण्यात आले. दरम्यान, या संशोधनाचा आणि संवर्धनाचा भाग म्हणून आमच्या टीमने या प्रजातीचे कंद रत्नागिरी तालुक्यापासून दूर असलेल्या दापोली तालुक्यात लावून पाहिले. मातीस भौगोलिक परिस्थिती सारखी असलेल्या, परंतु या वनस्पतीचे नैसर्गिक अस्तित्व नसलेल्या ठिकाणी ही लागवड करण्यात आली. पाच वर्षांमध्ये दापोलीतील विविध पठारांवर या प्रजातीचे बीजरोपण करण्यात या टीमला यश आले आहे. अनेक पर्यावरण मित्र, वनस्पती अभ्यासकांनी, संशोधकांनी, तसेच प्रसिद्धी माध्यमांनी या कामाचे कौतुक केले. कृषी विद्यापीठातील जैवविविधता पार्कमध्ये या प्रजातीला फुलोराही आला. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने या संशोधनाला एक वेगळेच महत्त्व आहे. परंतु हीच परिस्थिती दापोलीतील इतर पठारांवर जास्त काळ टिकून राहील, याची शाश्वती नाही. 

भक्ष्याची वाट पाहणारा कोळीइतर पर्यावरणाविषयक उपयोग
या प्रजातीच्या फुलांवर आणि फळांवर एकूण १६ प्रजातीचे कोळी आढळून आले. या फुलांवर आकर्षित होऊन येणाऱ्या विविध कीटकांवर या कोळ्यांचे जीवन अवलंबून असते. विविध कीटकांना मारून आपली उपजीविका करणारे हे कोळी आपली अंडी इथेच घालतात आणि मग नवीन पिढीला जन्म देतात. तसेच या फुलांचे परागीकरण करण्यास कारणीभूत असलेल्या निशाचर फुलपाखरांची अंडी आणि त्यातून तयार होणाऱ्या अळ्याही या नवीन व कोवळ्या बियांवर अवलंबून असतात. कोवळ्या बिया खाऊन या अळ्यांचे रूपांतर पुढे फुलपाखरांत होते आणि त्यांची नवीन पिढी तयार होते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सर्व फळे गळून पडतात आणि मग फक्त दांडी शिल्लक राहते. अशा वेळी बऱ्याच फुलपाखरांच्या अळ्यांचे वास्तव्य या दांडीवर अवलंबून असते. या दांडीवरच या अळ्यांचे फुलपाखरात रूपांतर होते. त्यामुळे हेही प्रजातीचे महत्त्व आहे.

त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मधमाश्याही या आकर्षक फुलांवर अवलंबून असल्याचे दिसले. दिवसभरात विविध प्रकारच्या मधमाश्या या फुलांवर मध गोळा करण्यासाठी भेट देताना आढळल्या. या फुलांतून येणारा सुगंध त्यांना आकर्षित करत असावा. अशा प्रकारे ही प्रजाती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पर्यावरण संवर्धनामध्ये आपला ठसा उमटवत असते. याच प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले, तर हे सर्व जीवनचक्रच उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.

रोपवाटिकेत तयार झालेली एकदांडीची रोपेसंवर्धनासाठी काय करता येईल?
कोकणात, विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच कातळ पठारे फुलायला सुरुवात होते. विविध प्रकारच्या गवतवर्गीय आणि क्षुपवर्गीय वनस्पती उगवायला सुरुवात होते. पुढे त्याच वनस्पतींना फुलोरा येऊन ही पठारे नयनरम्य रूप धारण करतात. या कालावधीत कातळ पठारांवर एकदांडीच्या फुलांची पांढरी शुभ्र नक्षी पर्यटकांना आकर्षित करू शकते. त्यासाठी शिस्तबद्ध पर्यटन प्रकल्प उभारता येऊ शकतो. पर्यटकांची संख्या जास्त झाली, तरीही पुन्हा ही प्रजाती धोक्यात येऊ शकते. गेल्या दोन-तीन वर्षात या फुलांची संख्या कमी झाल्याचे आढळले. याचे प्रामुख्याने समोर आलेले कारण म्हणजे पावसाचे बदललेले वेळापत्रक, प्रजातीबद्दलची अपूर्ण माहिती, वाढते बांधकाम आणि रस्त्याचे रुंदीकरण. या प्रजातीच्या संवर्धनासाठी जनजागृती होणे फार गरजेचे आहे. या फुलांचा उपयोग स्थानिक नागरिकांनी कातळ पठारावर लँडस्केप आणि गार्डन विकसित करण्यासाठी केला तर चांगले होईल. 

या फुलांची छोट्या प्रमाणावर लागवड आणि रोपवाटिकाही तयार केली जाऊ शकते. ही फुले दिसायला मोहक आणि सुवासिक असल्याने त्यांचा उपयोग हार, गजरे आणि वेण्यांसाठी केला जातो. त्यामुळे या वनस्पतीची लागवड केली, तर या फुलांपासून गजरे, वेण्या बनवण्याचा छोटा रोजगार उपलब्ध होईल आणि मुख्य म्हणजे या प्रजातीचे संवर्धन होण्यास हातभार लागेल. या सुंदर वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात असल्याने संवर्धनाचे हे प्रयत्न त्या त्या भागातील नागरिकांनी, निसर्गप्रेमींनी करायला हवेत. बांधकाम किंवा विकासकामे करताना या आणि अशा काही वनस्पतींचे अस्तित्व तेथे असल्यास त्यांची दुसरीकडे लागवड करण्याची काळजी घेतली जायला हवी. 

डॉ. अमित मिरगळ
एवढा मोठा इतिहास असलेली कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती केवळ कोकणातूनच नव्हे, तर जगाच्या नकाशातूनही कायमची नष्ट होण्याच्या धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे निसर्गाचा हा अनमोल आणि सुंदर ठेवा जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करू या!

संपर्क : डॉ. अमित मिरगळ
मोबाइल : ९५४५५ ५५२३४, ९४०५८ ९१९२१
ई-मेल : amitmirgal84@gmail.com
(लेखक सध्या रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात अध्यापन करतात.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 141 Days ago
Kew Gardens in London might become interested in its preservation .
0
0
makarand About
छान अाणि उपयुक्त माहिती मिळाली. रत्नागिरीजवळील काेळंबे परिसरामध्येही ही वनस्पती माझ्या पाहण्यात अाली अाहे.
0
1

Select Language
Share Link
 
Search